गेल्या काही वर्षांत लहान मुलांमधील क्लीनिकल डिप्रेशनचं प्रमाण वाढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येतंय. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम चिमुकल्यांच्या निष्पाप बालमनावरही होताना दिसत आहे. अशावेळी 'चिल्ड्रेन्स डे'निमित्त प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ राजेंद्र बर्वे यांनी बच्चे कंपनीला जाणवणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी पालकांना सुचवलेल्या काही टिप्स:
- कुटुंबामध्ये विश्वास निर्माण करण्याकरता मोकळा अवकाश असू द्या.
- अभ्यासाव्यतिरिक्त मुलांशी सर्वसामान्य अनुभव, छोटे-मोठे सुख-दुःखाचे प्रसंग शेअर करा.
- 'चुकू नका' हे सांगण्यापेक्षा मोकळा संवाद असू द्या.
- मुलांशी बोलताना ओपन एंडेड म्हणजेच अधिक वर्णनात्मक प्रश्न विचारा. यातून संवाद हा हो/नाही यापलीकडे जाऊ शकेल. खोटं बोललास का असं विचारल्यास हो किंवा नाही असं उत्तर मिळेल. त्याऐवजी नेमकं काय बोललास हे मुलाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
- 'खोटं का बोललास?' ऐवजी मुलाला 'काय-काय घडलं ते सांग' असा प्रश्न विचारात जा.
- मुलाकडून चूक वदवून किंवा कबूल करून घेण्याऐवजी त्यांना त्यांचे अनुभव शेअर करण्याची संधी द्या.
- मुलाला वाईट वाटत असेल किंवा रडू येत असेल तर 'काय झाल्यामुळे अशी भावना मनात येतेय' हे विचारा.
- 'एकटं राहू द्या' असं मूल म्हणत असेल तर 'शांत झाल्यावर बोलू' असं म्हणत त्याला वेळ द्या.
- मुलाच्या वागण्यात बदल झालेला जाणवत असेल तर त्याबद्दल शांतपणे प्रेमानं चौकशी करा.
- चांगला अथवा वाईट असा कुठलाही टॅग मुलांना लावू नका. 'खोटारडा म्हणण्याऐवजी तू खरं सांगितलं नाहीस' अशा प्रकारचा संवाद साधा.
शब्दांकन: मृण्मयी नातू
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट