आपल्याकडे घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे, अशा चर्चा नेहमी कानांवर पडतात. म्हणून आपलं एकमेकांशी जमेल का हे जोडप्याला आधीच जाणून घेता आलं तर? म्हणजे भविष्यात होणारे वाद टळू शकतील. म्हणूनच लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी लग्नाआधी कौन्सेलिंग करून घेण्याकडे भावी वधू-वरांचा कल वाढतोय. हे प्रमाण यंदा ३० टक्क्यांनी वाढलं असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
लग्नानंतर एकमेकांना समजून घेताना वाद, भांडणं होण्यापेक्षा आधीच एकमेकांच्या सवयी, कमिटमेंट, जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी हे कौन्सेलिंग केलं जातं. या ३० टक्के वाढलेल्या प्रमाणामध्ये २० टक्के मुलं-मुली हे पालकांच्या आग्रहास्तव कौन्सेलिंग करुन घेण्यासाठी येतात. तर उर्वरीत १० टक्के स्वत:हून कौन्सेलिंगची तयारी दर्शवतात. कित्येकजण करिअर किंवा इतर कारणांमुळे लग्न करण्यास तयार नसतात. अशांची मतं बदलण्यासाठी या कौन्सेलिंगची मदत होते. याशिवाय, यंदा लग्नाच्या मौसमात दिसणाऱ्या आणखी काही ट्रेंडविषयी...
रुखवतात पुस्तक
रुखवतामध्ये पुस्तकं मांडण्याचा ट्रेंड सध्या बघायला मिळतोय. तसंच अशा रुखवतामध्ये ‘वधू-वरांना आहेर द्यायचा असल्यास एखादं पुस्तक द्या’ अशी सूचनाही लावली जातो.
आहेर लाखमोलाचा
सामाजिक भान जपण्याच्या दृष्टीने एखादी दानपेटी ठेवली जाते. वधू-वराला मिळणारी आहेराची रक्कम नंतर एखाद्या समाजसेवी संस्थेला दिली जाते. त्याशिवाय आहेर म्हणून एखाद्या ग्रंथालयाचं सदस्यत्व देण्याचाही ट्रेंड आहे.
रुमालावरची पत्रिका
लग्नात हौसेनं वाटल्या जाणाऱ्या पत्रिका नंतर मात्र रद्दीत जातात. त्यामुळे यंदा रुमाल पत्रिका नव्यानं आल्या आहेत. पत्रिकेत जो मजकूर असतो तो रुमालावर छापला जातो. लग्न झाल्यानंतर तो रुमाल धुवून आपण परत वापरु शकतो. याशिवाय पत्रिकेतून एखादा सामाजिक संदेशही दिला जातो.
फोटोशूटची कमाल
प्री वेडिंग फोटोशूट तसंच प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्याचंही प्रमाण वाढलंय. यामध्ये मुख्यत्वे डेस्टिनेशन फोटोशूट केलं जातं. पाण्याखाली किंवा पाळीव प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा ट्रेंड बघायला मिळतोय.
डाएट जेवण
हल्ली प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झाला असल्यामुळे लग्नाच्या मेन्यूमध्येही डाएट फूड पाहायला मिळतंय. यासाठी खास डाएटिशनना बोलावलं जातं. यंदाच्या बऱ्याच लग्नांमध्ये पित्ताचा त्रास दूर करणाऱ्या सोलकढीला आणि कोकम सरबताला स्थान मिळालं आहे.
टॅटूची चलती
लग्नाआधी मिनिमल, म्हणजे छोट्यात छोटा टॅटू काढला जातो. यामध्ये लग्नाची तारीख, एकमेकांचं नाव किंवा एकमेकांच्या वाढदिवसाची तारीख टॅटूद्वारे काढली जाते.
एकमेकांना समजून घेण्यासाठी
लग्नानंतर एकमेकांशी पटत नाही म्हणून घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा, आधीच एकमेकांना समजून घेण्यासाठी ‘प्री वेडिंग कौन्सेलिंग’ केलं जातं. काही जोडपी यासाठी स्वत:हून तयार होतात. तर काही जणांना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तयार करावं लागतं. याची मदत सध्या अनेकांना होतेय हे मात्र नक्की.
गौरी कानिटकर, मॅरेज कौन्सेलर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट