प्रत्येकाची आयुष्यात काही ना काही स्वप्नं असतात. आपल्याला काय करायला आवडतं , किंवा आपला आनंद कशात आहे, हे जाणून घेऊन करिअर घडवणं. असं केलं तर कामाचं ओझं न वाटता त्याचा आनंद घेता येतो. परंतु, अशा आवडीच्या क्षेत्रातच करिअर घडवण्याचा निर्णय योग्य वेळी घेणं फार कमी जणांना जमतं.
लहानपणापासूनच वक्तृत्वकलेची आवड असलेला शिवम हा शाळेत वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी बक्षीस मिळवायचा. दररोज रेडिओ ऐकण्याच्या सवयीमुळे रेडिओ जॉकीचा सतत कानांवर पडणारा आवाज शिवमला खुणावत होता. आपणही रेडिओ जॉकी बनायचं आणि लोकांशी मनसोक्त गप्पा मारायच्या असा पक्का निश्चय वयाच्या तेराव्या वर्षीच शिवमने केला होता.
बारावीनंतर शिवमने ओरियंटल एज्युकेशन सोसायटी, सानपाडा या कॉलेजमध्ये बीएमएमचं (बॅचलर ऑफ मास मीडिया) शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा शिवम सध्या एका रेडिओ स्टेशनमध्ये आरजे ट्रेनी म्हणून नोकरी करतोय. शिक्षणाचा व स्वतःचा खर्च उचलण्यासाठी, तसंच घरखर्चाला हातभार लावण्यासाठी शिवमनं शिक्षण घेता-घेता नोकरी करण्यास सुरुवात केली.
शिवमच्या या निर्णयाला सुरुवातीला घरच्यांचा पाठिंबा नव्हता. परंतु, आपल्या मुलाची या क्षेत्रातली गोडी आणि प्रगती पाहून त्यांनी शिवमला पूर्ण पाठिंबा दिला आहे. याशिवाय, लिखाण, नृत्य, गायन अशा विविध कलांमध्येही तो पारंगत आहे. आजपर्यंत अनेक कलाकारांच्या मुलाखती त्यानं घेतल्या आहेत. ‘रॅप गाणी’ लिहून ती सादर करणं हा शिवमचा आवडता छंद आहे. उत्तम आरजे बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने शिवमची वाटचाल अविरत सुरू आहे.
संकलन – मंदार खांबेटे, सीएचएम कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट