रजनी पांडव 'तुम्ही काय केलंत?' हा २४ मार्चच्या मैफल पुरवणीमध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. १४ एप्रिलच्या पुरवणीमध्ये लीला काळूसकर यांचा लेख वाचला आणि मलाही माझी तिसरी इनिंग सांगावीशी वाटली. यजमानांची बँकेतील नोकरी आणि बदली होत असल्यामुळे आमचे १०-१२ गावी राहणे झाले. खूप चांगली माणसे भेटली. २०००मध्ये ह्यांनी चार वर्षे आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आम्ही पुण्याला आलो. स्वत:चे घर घेऊन पुण्याचे झालो. मुलांची लग्न झाली. मुलगी पुण्यातच आहे, मुलगा परदेशात स्थायिक झालेला. घरात आम्ही दोघेच. वेळ भरपूर. आता काय करायचे? रिकाम्या वेळाचे काय, हा प्रश्न होता. संसाराच्या व्यापात मागे राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली. पुण्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, परिसंवाद, नाटके, सिनेमा, ग्रंथालय, महिला मंडळ, भिशी, पौरोहित्य हे सारे पाहण्याची व अनुभवण्याची संधी मिळाली. वृत्तपत्र, मासिके, कादंबऱ्या वाचता वाचता लिहिण्याची ऊर्मी आली. पंचवीस-तीस वर्षे बदलीच्या गावांना भेटलेली अनेक माणसे अनुभवली, ती वाचता आली. तेच कथा रूपात व ललित लेखनाच्या रूपाने शब्दांत उतरले. त्याचा कथासंग्रह प्रसिद्ध केला. हे पुस्तक प्रकाशित होण्यामध्ये माझ्या यजमानांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच मला लिहिण्यास प्रोत्साहन दिले. लेखनातील चुका सुधारल्या. मला लिहिते केले. मासिकाच्या स्पर्धेसाठी कथा पाठवायचे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता असा एक रकाना असायचा. मॅट्रिक (पूर्वीची अकरावी) असे त्या रकान्यामध्ये लिहिण्याचा कमीपणा वाटू लागला. मग वयाच्या साठाव्या वर्षी मी बीए. केले. तेव्हाही ह्यांची मोलाची साथ मिळाली. त्या काळात मी जो स्वयंपाक केला, तो त्यांनी निमूटपणे खाल्ला. मला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून घरातील बरीचशी कामे करण्यास हातभार लावला. ज्या दिवशी बीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता, त्या दिवशी मी बाहेर गेले होते. ह्यांनी ऑनलाइन निकाल पाहिला. घरात मोठा बुके आणून ठेवला. दिव्यांची रोषणाई करून पेढेही आणून ठेवले होते. हे स्वागत मला खूप भावले. खूप समाधान वाटले. अभ्यासाची गोडी लागली. मराठी विषय घेऊन एमए. केले. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. भरपूर लिखाण केले. परदेश प्रवास केला. मला लेखन, वाचन करण्यास मनापासून आवडते. घरातील कामे, स्वच्छता, नवीन पदार्थ करून पाहणे, संध्याकाळी सोसायटीमधील मैत्रिणींशी गप्पा, चर्चा होतात. नंतर शेजारच्या बागेत चालण्यासाठी जाते. या सर्व व्यापात दिवस आनंदात जातो. अधूनमधून मुलीकडे जाते. कधी तिच्या सवडीप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये जातो. एकूणच तिसरी इनिंग मस्त चालली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट