तो तिला 'आय लव्ह यू' असे म्हणाला. शाळेत चर्चेचा विषय झाला. होणारच होता; कारण ते दोघेही सहावीमध्ये होते. आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या त्याला त्या भावनेचा नक्की अर्थ माहीत होता का? त्याची खरेच चूक झाली होती का? मुख्याध्यापिकांनी हे प्रकरण समजुतीने हाताळले आणि प्रश्न सुटला. डॉ. आनंद गोडसे तशी ही घटना सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडणारी होती. सायली आणि स्नेहा या सहावीतल्या मैत्रिणी एकमेकींमध्ये कुजबुज करत होत्या. आता यामध्ये वेगळे काय, असा प्रश्न पडेल; परंतु यावेळी थोडा अवघड प्रश्न या दोघींसमोर आला होता. त्याचे कारण असे, की हा प्रश्न त्यांना समजायच्या, उमजायच्या आतच त्याची त्यांच्या वर्गामध्ये प्रचंड चर्चा झाली होती. त्यांच्याच वर्गातील त्यांचा मित्र निखिल हा सायलीकडे येऊन तिला 'आय लव्ह यू' असे म्हणाला. सायलीसाठी हा प्रसंग फारच कठीण झाला; कारण त्यादिवशीनंतरचे काही दिवस तिच्या मैत्रिणी किंवा इतर मुले-मुली याच घटनेची चर्चा करत होते. सायली आणि स्नेहा या घटनेविषयी एकमेकींशी बोलल्या, तेव्हा सायलीला थोडी उत्सुकतेने आणि दुसऱ्या बाजूला काळजीने स्नेहा विचारत होती, 'याचा नेमका अर्थ काय असतो?' या वयात त्यांना नुकतेच कळू लागले होते, की हे मैत्रीपेक्षा काहीतरी निराळे आहे. या वयातील मैत्रीही नव्याने फुलणारी असते. तसे पाहिले, तर मैत्री ही संकल्पना स्नेहा आणि सायली खूप लहानपणापासून अनुभवत आल्या आहेत. त्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी जशा बालवाडीत, पाळणाघरात जाऊ लागल्या, तशा त्या इतर मुला-मुलींबरोबर खेळू लागल्या. त्यातही आपण कोणत्या मित्र-मैत्रिणींशी जास्त खेळतो, गप्पा मारतो या आवडीनिवडी होत्याच. तिसऱ्या-चौथ्या वर्षी मुले-मुली सहजतेने एकत्र खेळत होती. हळूहळू मुले मुलांबरोबर आणि मुली मुलींबरोबर अधिक मिसळू लागली. या वयात, म्हणजे साधारण चौथ्या वर्षापासून ते दहाव्या-अकराव्या वर्षापर्यंत या दोघीही आजूबाजूच्या घटनांचे सूक्ष्मतेने निरीक्षण करत होत्या. या वयातील सर्वच लहान मुले ते करत असतात. ही घडलेली घटना, मैत्रीपेक्षा निराळे काहीतरी असलेले प्रेम वगैरे त्यांच्या कक्षेच्या बाहेरचे होते. वर्गशिक्षकांनी त्या मुलाविषयीची तक्रार मुख्याध्यापिकांकडे नेली. असे केले नाही, तर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतील आणि हे घडणे योग्य नाही, असा वर्गशिक्षकांचा विचार होता. वर्गशिक्षकांचा रोष झाल्यामुळे निखिल थोडासा नव्हे, तर खूपच नाराज झाला होता. त्याला स्वत:चा प्रचंड रागही येत होता आणि आपण केलेली कृती अयोग्य असल्याचा आरोप त्याने स्वत:कडे घेतला होता. या लहानग्यांच्या दृष्टिकोनातून मोठ्यांच्या जगाकडे पाहताना अनेक प्रश्न नेहमी समोर येतात. निखिल जे सायलीला म्हणाला, ते वाक्य तर नेहमी कानावर पडत असते. त्याच्यामुळे एवढ्या चर्चेची परिस्थिती का निर्माण झाली? सगळे त्याच्याबद्दलच का बोलत आहेत? असे प्रश्न होतेच; परंतु त्यामुळे काहीतरी मोठे आणि भयानक घडले आहे, याची निखिलला जाणीव झाली होती. हा प्रसंग म्हणजे सर्वांसाठीची परीक्षा ठरली. प्रेमासारख्या नाजूक विषयाला हात घालताना आणि घटनेच्या सर्व बाजू समजून घेताना निश्चितच सारासार विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज होती, अन्यथा अडचणी वाढणार होत्या. मुख्याध्यापिकांनी या साऱ्यात अतिशय शांत मनाने लक्ष घातले. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. त्यांनी हा प्रश्न वेगाने सोडविण्याऐवजी सामंजस्याने सोडवायचा ठरवला. सायली आणि स्नेहाच्या मैत्रीबद्दल वर्गशिक्षकांना माहिती असल्यामुळे आणि निखिलने केलेल्या कृतीमुळे सायली घाबरली असेल, हे गृहीत धरून सर्वांना स्वतंत्रपणे समजावून सांगणे महत्त्वाचे होते. त्याचबरोबर या वयातील मुलांच्या मनातले काही महत्त्वाचे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत, असे मुख्याध्यापिकांना जाणवले. १. मैत्री आणि प्रेम यामध्ये नेमका फरक काय आहे? मैत्री, स्त्री आणि पुरुष म्हणून जोडीदाराविषयी आकर्षण, लग्न झालेल्या जोडप्यांतील वागणूक हे सारे काही लहान मुले टिपत असतात. त्यांना मैत्री आणि प्रेम यातील फरक समजण्यासाठी बराच कालावधी लागतो. यातील छटा समजून घेण्यासाठी या संकल्पनांबाबत शांतपणे विचार करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. २. वयाने मोठे असलेले स्त्री-पुरुष जे वागतात, त्यातील नेमके काय बरोबर असते? स्थलकालानुरूप, संस्कृतीनुसार, देशकालाप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या, त्याविषयी बोलण्याच्या कक्षा बदलतात. त्या कक्षा समजून घेता येणे व आपण वागतो त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो, याची जाण असणे गरजेचे आहे. ३. आम्हाला काय म्हणायचे आहे, ते सांगायला आम्ही घाबरतो. आम्ही लहान मुलांनी त्याविषयी कोणाशी बोलावे? मैत्री आणि प्रेम याबाबतची समज तयार होताना अनेक प्रश्न मुलांना पडत असतात. काय योग्य आणि काय अयोग्य यांविषयीही प्रश्न असतात. त्यावेळी पालकांनी त्यांच्याशी बोलण्यास स्थिर मनाने उपलब्ध असणे गरजेचे आहे. कोठे कठोर व्हायचे, कोठे मृदू याविषयीचा विवेक ठेवणे गरजेचे असते. अशा अनेक प्रश्नांनी आणि विचारांनी गोंधळलेली लहानगी मुले अशा घटनेचा भाग होतात आणि त्यांच्या मनातील गोंधळ आणखी वाढतो. पालक आणि शिक्षक म्हणून आपण काही पावले नक्की उचलू शकतो. त्यामुळे या मुलामुलींच्या मनातील गुंता मोकळा होऊ शकतो. १. मैत्री आणि प्रेम या संकल्पना आपण नीट समजावून घेऊन त्याविषयी मुलांशी संवाद साधता येऊ शकतो. २. मुले नेमक्या कोणत्या क्षणी, कोणत्या काळात या भावनांच्या अनुभवातून जात आहेत, त्या कशा व्यक्त करत आहेत, हे ओळखता येऊ शकते. ३. या भावनांचा ते नेमका काय अर्थ लावत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या गटात, मित्रांमध्ये काय बोलत आहेत, हे माहिती करून घेता येऊ शकते. ४. प्रेम आणि मैत्री या भावनांचा त्यांच्या वागणुकीवर काही परिणाम होतो आहे का, त्यामुळे ते एखाद्या अडचणीत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परिस्थितीचा अभ्यास करून, त्या अडचणीतून न घाबरता आणि शांतपणे सायली व निखिलला बाहेर काढणाऱ्या मुख्याध्यापिका कुशल ठरल्या. थोडे खोलात शिरल्यावर लक्षात आले, की निखिलचे वडील त्याच्या आईला अधूनमधून हे वाक्य म्हणत असतात. त्याने ते सायलीला म्हणून पाहिले. पुढे परिस्थिती पूर्ववत झाली. येत्या काळात असे प्रश्न किंवा अडचणी जटील होऊ नयेत, म्हणून काय करावे, असा विचार करत मुख्याध्यापिका आपल्या कार्यालयाकडे गेल्या. थोड्याशा चिंतेत होत्या; परंतु प्रश्न असतात तेथे उत्तरे असतातच, हा विश्वास होताच.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट