प्लास्टिकची 'छुट्टी' पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी प्लास्टिकबंदी जाहीर झाली. या महत्त्वाच्या विषयावर लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संवेदनशील तरुणाईही पुढे सरसावली आहे. 'कॅरी ऑन' ही लघुपटांची सीरिज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सुमित पाटील या तरुणानं ती तयार केली आहे... रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज जिमला जाऊन येणारा एक तरुण मुलगा केळी घ्यायला येतो. प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्यानं केळी विकणारी महिला केळी त्याच्या हातात ठेवते. शेवटी त्या मुलाला अंगावरचा टीशर्ट काढून त्यातून केळी न्यावी लागतात. हा आणि असे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्लास्टिकबंदीबाबत लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम या लघुपटांतून करण्यात येतंय. प्लास्टिकची पिशवी विसरुन जाऊन मुंबईकरांनी आता कापडाची पिशवी आपल्याबरोबर ठेवावी असा संदेश यातून दिला जातोय. राज्य सरकारनं प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं. पण, अनेकांच्या बाबतीत मात्र कळतंय, पण अजूनही वळत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणूनच सुमित पाटील या कलादिग्दर्शकानं 'प्लास्टिक भगाओ'चा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी ही सीरिज बनवायचं ठरवलं. त्यातूनच 'कॅरी ऑन' ही लघुपटांची सीरिज सुरू झाली. सुमितनं आपल्या मित्रांची यासाठी मदत घेतली. पराग सावंत या तरुणानं सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली. तर श्रद्धा मोहिते, रीना अग्रवाल, तुषार घाडीगावकर या रंगभूमीवर काम करणाऱ्या तरुण कलाकारांना यात कोणतंही मानधन न घेता यात काम केलं आहे. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणाऱ्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसादही मिळतोय. यावरच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी, प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याची शपथ घेतली आहे. प्लास्टिक पिशव्या न वापरता त्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं पूरक असे पर्याय यात सुचवण्यात आले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या विसरुन जाऊन सर्वांनी कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा असं यातून सुचवण्यात येतंय. प्लास्टिकच्या अतिवापरानं आपण आधीच एवढं प्रदूषण करून ठेवलं आहे, की आता आपल्याला यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार हे सर्वांना पक्कं समजलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं प्लास्टिकबंदीचा हा निर्णय घेतला. हा निर्णय पर्यावरणासाठी आणि पर्यायानं लोकांसाठी हितकारी आहे. आजचा काळ हा व्हिडीओचा काळ आहे. त्यामुळे व्हिडीओद्वारे जर लोकांना एखादी गोष्ट सांगितली तर नक्कीच फरक पडेल, म्हणून 'कॅरी ऑन'ची निर्मिती आम्ही केली. - सुमित पाटील (दिग्दर्शक)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट