काही संधी मिळण्याची वाट पाहत राहतात, तर काही संधीपर्यंत स्वत:च चालत जातात. ही अशाच दोघांची गोष्ट आहे. त्यांना मिळणारा धडा, त्यांना येणारे शहाणपण, त्यातून फुलणारे स्वत्व याची ही झोया अख्तर दिग्दर्शित कहाणी. प्रसाद नामजोशी आपण सगळेच सोना मिश्रा असतो. आपल्याला हवी असते एक संधी. मोठी संधी. त्या येणाऱ्या, येत असताना दिसत असणाऱ्या संधीची वाट बघत असतो आपण; पण आपल्यामध्ये निघतो एखादा विक्रम, जो संधी आपल्याकडे येण्याची वाट बघण्याच्या ऐवजी, स्वत:च संधीच्या दिशेने चालत जातो. विक्रमच्या यशाकडे आपण हरखून बघत राहतो, त्याचा आपल्याला हेवा वाटतो आणि आपल्या नशिबाची कीव येते. आपण त्यापासून शिकत काही नाही; मात्र कानपूरहून मुंबईला अभिनेत्री व्हायला आलेली सोना मिश्रा विक्रमच्या बोलण्यातून एक गोष्ट नक्की शिकते. यश आणि अपयश हे आपणच निवडायचे असते, ही ती गोष्ट. पिंकी प्रोडक्शनच्या चौधरीचा एक सिनेमा सुरू होतो आहे आणि त्यासाठी नवा चेहरा हवा आहे. तेथे सोनाची वर्णी नक्की लागणार आहे. त्याकडे लक्ष ठेवून ती छोट्या मोठ्या भूमिका करते आहे. लक्ष एकच, चौधरीचा नवा चित्रपट आणि त्यात मोठी संधी. सध्या मात्र हिरोची बहीण, आमीर खानच्या चित्रपटात त्याच्याबरोबरचे दोन सीन. (ज्यात ती पाठमोरी दिसते! अर्थात दिग्दर्शिका हे काही आपल्याला स्वच्छ सांगत नाही, सहज दाखवते.) 'मेलेल्या बहिणीच्या मैत्रिणी'ची भूमिका वगैरे उल्लेख तिला खटकतात. माझ्या पात्राला नाव नाही का? ते का घेत नाही तुम्ही? असे प्रश्न ती समोरच्याच्या तोंडावर मारू शकते. तेवढा विश्वास तिच्यामध्ये आहे; कारण एकच, माझा मोठा सिनेमा येतो आहे. कधी? लवकरच, येईलच आता. आता तिची ओळख होते विक्रमशी. तो दिल्लीहून अभिनय करायला आला आहे. नवा आहे. बोलण्यात स्मार्ट आहे. तिला आवडतो. दोघे जवळ येतात. तिला नाही म्हटले, तरी इंडस्ट्रीचा अनुभव आहे. शिवाय तिचा मोठा चित्रपट, लीड रोल, चौधरी... लवकरच. दोघे मिळून एक सिनेमा बघतात, खरेदीला जातात. दुकानात एक स्पर्धा आहे. स्लोगन लिहिले तर फ्रीज बक्षिस. लिहू या स्लोगन? 'तुला काय वाटते, भाग घेऊन मला हा फ्रीज मिळण्याची शक्यता आहे?' सोना विचारते. विक्रम म्हणतो 'मला वाटते, की भाग न घेता तुला हा फ्रीज मिळण्याची अजिबात शक्यता नाही.' विक्रम आणि सोनाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. विक्रमाला नशीब घडवण्यात रस आहे, तर सोनाला नशीबाची वाट बघण्यात आणि त्यात वाईट काय आहे? सगळेच तर ठरलेले आहे. लीड रोल, चौधरी, लवकरच, वगैरे. विक्रम तिच्यासाठी स्लोगन लिहून फॉर्म भरतोच. विक्रमवर प्रेम करणारी सोना उतावळी नाही, प्रगल्भ आहे. चार गोष्टी बघितल्या आहेत आयुष्यात तिने; पण ती वाट बघते आहे काहीतरी मोठे घडण्याची आणि घडणार आहेच; कारण चौधरी, लीड रोल, लवकरच. अचानक करण जोहरचा चित्रपट मिळाला म्हणून जफरखान रॉलीच्या सिनेमातून बाहेर पडतो आणि सुरू होते हिरोची शोधाशोध. अनेक जण नाही म्हणतात. त्यामुळे नवा हिरो घ्यायचे ठरते. (मुळात स्क्रिप्टचीच ती गरज असल्याचे निर्माता सांगायला विसरत नाही.) दरम्यान चौधरीचा सिनेमा चालू होत असल्याची बातमी बाहेर येते. सोना खूष होते. जे गेली तीन वर्षे घडायला हवे होते, ते घडते आहे. सोना मित्रांना आनंदाने आपला सिनेमा सुरू होत असल्याची बातमी सांगते. विक्रम त्याचे नवे फोटो दाखवतो. त्याला त्याचा नाटक करणारा मित्र अभी हसतो. त्यामुळे विक्रम नाराज होतो. भांडणे होतात. सोना विक्रमला समजावते. सोना झोपून उठते, तेव्हा विक्रमने तिच्यासाठी शुभेच्छापत्र ठेवलेले आहे. ती खूष होते. एकीकडे एक छान नाते निर्माण होते आहे आणि दुसरीकडे सिनेमातली मोठी संधी, चौधरी. भेटायला जाते त्याला. तेथे कळते, की सिनेमा तर सुरू झालेला आहे; पण दिग्दर्शकाला नवा चेहरा हवा आहे; पण मग मी नवीच आहे ना? सोनाला कळत नाही. इंडस्ट्रीच्या दृष्टीने सोना हा आता नवा चेहरा राहिलेला नाही. अनेक सिनेमांमधून एकेक दोनदोन भूमिका केल्यात की तिने! पण हे तर चौधरीच्याच सल्ल्यावरून केले तिने. शेवटी चौधरी बोलायचे असलेले महत्त्वाचे वाक्य बोलतोच, 'मी नाही तुला घेऊ शकणार सिनेमात.' आता मात्र तिला रडू येते. गेली तीन वर्षे ती हे घोकत आलेली होती, चौधरीचा नवा सिनेमा, मोठी संधी, लवकरच; पण ही संधी तिच्यापर्यंत पोचलेलीच नाही. चौधरी तिला समजवायला जातो. तेवढ्यात तेथे चौधरीची बायको-पिंकी-येते. ही रॉलीच्या बायकोची बहीण आहे. तिला बघताच सोना सावरून घेते. पर्समध्ये असलेले विक्रमचे फोटो द्यायला आली होती वगैरे. हे फोटो नव्या हिरोच्या शोधात असलेल्या रॉलीकडे जातात. सोनाच्या नशिबाची गाडी ज्या स्थानकावर बंद पडली, तेथूनच विक्रमच्या नशिबाची गाडी सुरू होते. ज्या दिवशी सोनाला तिच्या नावासाठी असलेल्या भूमिकेतून काढून टाकले जाते, त्याच दिवशी विक्रमला जी भूमिका त्याची नव्हतीच, त्याच्या ऑडिशनसाठी बोलावणे आलेले आहे. सोना नशीबाला दोष देत बसली आहे. विक्रम तिला समजावतो. ती त्याला मिठी मारते. तो तिला सांगतो, 'संधी मिळत नसते, तयार करावी लागते. यशाकडे आपण जायचे असते. यश तुमच्याकडे येत नाही.' सोना घट्ट मिठीत. ही वाक्य ऐकायच्या मूडमध्ये नाही ती. असे वाटते, की विक्रम ही वाक्ये सोनाला नाही, तर स्वत:लाच सांगतो आहे. विक्रमसाठी संधी तयार झालेली आहे आणि विक्रमही संधीपर्यंत पोहोचण्याची संधी सोडत नाही. निकीबरोबर प्रेम करतो. तिच्या आईवर छाप पाडतो. प्रतिस्पर्ध्याला उगीचच वर चढवतो आणि शेवटी त्याला जे हवे आहे, ते मिळते. रॉलीच्या प्रॉडक्शनचा मोठा सिनेमा आणि त्यातली मुख्य भूमिका. सोनाला मनापासून आनंद होतो. तिचा मित्र तन्वीर चित्रपट पत्रकार आहे. विक्रमशी लग्न करून 'स्टारवाइफ' होण्याचे स्वप्न तो तिला दाखवतो. तीसुद्धा रंगते त्या स्वप्नात. शेवटी हे काय नि ते काय, सोनाला स्वप्नात रमायला आवडतेच. सोना आता विक्रमच्या हॉटेलमध्ये थेट त्याला सरप्राइज द्यायला येते; पण विक्रमला हे अपेक्षित नाही. त्यामुळे सरप्राइज मिळते ते तिलाच. ती आली आहे जणू काही विक्रमची बायको असल्यासारखी त्याच्याच रूममध्ये राहायला; पण नाही म्हणतो विक्रम. तो नवा आहे, त्याला नको आहे असे काही वेगळे. विक्रमला एवढा मोठा चित्रपट मिळालेला आहे, आता त्याचे कोणीही नाही, या सत्याची जाणीव तिची मैत्रीण लक्ष्मी तिला करून देते. तिकडे तन्वीर विक्रमच्या स्वार्थीपणाची, सोना, निकी, नीना अशा सर्व बातम्यांची एक स्टोरी मासिकात छापून आणतो. अर्थात, तो त्याच्या नोकरीचाच भाग आहे म्हणा! सगळे आपापल्या सोयीने ती बातमी वाचतात. सोनानेच हे छापून आणले आहे, असे वाटून विक्रम तिला भेटून उलटसुटल बोलतो. सोना चिडून तन्वीरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या मासिकानेच तन्वीरला मारते आणि निघून जाते. तिच्या आयुष्यातली वैयक्तिक गोष्ट तिला अशी सार्वजनिक करायची नव्हती. चिडून ती घरी येते, तेव्हा तिच्या घरी फ्रीज आलेला आहे! हा तोच बक्षिसाचा फ्रीज आहे ज्याचा फॉर्म विक्रमने भरला होता. सोना विचारात पडते. काही हवे असेल, तर त्या दिशेने जायला हवेच, हे त्याने शिकवले; पण मला हे समजले, तोवर तो गेलेला होता. जणू काही तिच्याच मनातले भाव; पण हे ती बोलते आहे ते एका टीव्ही कॅमेऱ्यासमोर. सिनेमाचा नाद तिने सोडला आहे आता आणि स्वीकारले आहे हे माध्यम. घराघरांत पोहोचणारे. टीव्ही मालिकांचे. विक्रमचा सिनेमा हिट झाला आहे. जबलपूरला अॅडव्हान्स बुकिंगच्या रांगेमध्ये मारामारी होऊन एकाचा मृत्यू झाल्याचेही सेलिब्रेशन केले जाते. हिरो झालेल्या विक्रमला शाहरुख खान भेटतो. मित्रांना सोडून त्याच्याबरोबर बसतो. शाहरुख त्याला सांगतो, की तुम्ही कुणीही नसताना जे तुमच्याबरोबर असतात, त्यांना स्टारडमच्या नशेत विसरू नकोस; कारण तुमच्याविषयीचे सत्य केवळ तेच तुम्हाला सांगू शकतात. विक्रम विचारात पडतो. आता सोना टीव्हीसाठी अभिनय करू लागलेली आहे. तिच्या सेटवर विक्रम येतो. सोनाला भेटून माफी मागतो. मनापासून. तुलाच माझ्यावर विश्वास होता, मला तुझ्या सपोर्टची गरज आहे, असे सांगतो. सोना आता अलिप्त आहे. तिच्या डोळ्यातून पाणी येते. विक्रम खरे बोलतो आहे, हे तिला माहिती आहे; पण ती आता शहाणी झालेली आहे. ती शांतपणे विक्रमला जाणीव करून देते, की तो जे बोलतो आहे, ते सगळे स्वत:विषयी आहे. त्याला सपोर्ट हवा आहे, म्हणून ती त्याला हवी आहे. ती म्हणते, 'तुझा दोष नाही यात, काही लोक असतातच असे त्याला काय करणार?' सिरीयल हिट होते आणि तिचीही मुलाखत घेतली जाते. अधिक आश्वासक. आता आनंदी राहायचे ठरवले आहे तिने. जो तो आपले यश आणि अपयश स्वत:च निवडत असतो, या विक्रमने सांगितलेल्या वाक्याचा अर्थ तिला आता समजतो आहे. विक्रमच्या मोठ्या पोस्टरच्या पार्श्वभूमीवर ती फिल्म सिटीत जायला टॅक्सी करते. 'लक बाय चान्स' हा असा 'बाय चान्स लक'ची कथा सांगतो आहे, असे वाटताना आपण सोना आहोत की विक्रम, याचा विचार मनातल्या मनात करायला भाग पाडतो. आपण जे कुणी असू त्याची मनातल्या मनात कबुली देऊन पुन्हा एकदा हा सिनेमा बघायला भाग पाडतो. लक बाय चान्स (हिंदी/ १५६ मिनिटे/ २००९), लेखक : झोया अख्तर, जावेद अख्तर, दिग्दर्शक : झोया अख्तर, कलाकार : सोना- कोंकणा सेन शर्मा, विक्रम- फरहान अख्तर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट