मीनल दफ्तरदार आपण एक लेख लिहिला आणि विषय संपून गेला, असे होत नाही, याची प्रचिती या आठवड्यात आली. २८ एप्रिलला 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मैफल' या पुरवणीमध्ये माझा 'एक सॉरी पुरेसे आहे?' हा लेख आला. मला कल्पनाही नव्हती अशा वेगाने त्याच दिवशीपासून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. वृत्तपत्राची ही ताकद मला खरोखर अचंबित करून गेली. फेसबुकवर मेसेंजरवर अनेक अनोळखी मंडळींचे मेसेजेस येत राहिले. कोणाच्या डोळ्यात मी तिचीच वेदना मांडली, म्हणून पाणी आले. कोणी मी लेखात लिहिल्यापेक्षाही वेगळे आणि धक्कादायक अनुभव सांगितले. 'एका स्त्रीचा नवरा शौचाला जाऊन आल्यावर फ्लश करत नाही. ते पाणी ती टाकते. असे वर्षानुवर्षे सुरू आहे,' हे ऐकूनच मला हादरायला झाले. ती हे का सहन करते मला ठाऊक नाही; पण आत्ताच्या घडीला आपल्या मध्यमवर्गीय समाजात रोज घडणारी ही गोष्ट आहे. कोणी माझ्याशी फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. एक रोज संपर्कात नसलेली मैत्रीण माझ्यासाठी बक्षीस म्हणून चॉकलेट घेऊन आली. कुणी बर्फी दिली. हे सगळे अजिबात अपेक्षित नव्हते. एका जुन्या मैत्रिणीच्या आईने तीस वर्षांनंतर माझा नंबर मिळवून फोन केला. हा सगळा लेखन प्रपंच स्वतःचे कौतुक करण्यासाठी मी मांडत नाही, तर अनेकांना छोटा किंवा क्षुल्लक वाटणारा विषय ते भोगणाऱ्या स्त्रीसाठी खरेच खूप मोठा असू शकतो. मनातल्या मनात कोमेजून, विझून गेलेली आयुष्य खरेच आहेत आपल्या आसपास. तीन-चार जणींनी यामुळे त्यांचे लैंगिक आयुष्य कसे विस्कटून गेले आहे, हेही लिहिले. वाचताना गलबलून जायला झाले. ज्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींची आपण सहज काळजी घेऊ शकतो किंवा त्या सोडून देऊ शकतो, तसे या उदाहरणांतील नवऱ्यांना करावेसे वाटले नाही, हीच शोकांतिका आहे. एका मित्राने सांगितले, की तुझा हा लेख मी जपून ठेवणार आहे आणि माझ्यामधे जे जे दोष आहेत, ते घालवण्याचा आजपासूनच प्रयत्न करणार आहे. हे वाचून जे समाधान वाटले, त्याला तोड नाही. स्त्री आणि पुरुष मिळून आपल्यातल्या त्रासदायक गोष्टी सोडून देऊ. आपले आयुष्य सुखाचे करू. समाज आपल्यासारख्या माणसांचा मिळूनच बनतो. 'मी अमुक केल्याने काय फरक पडतो,' असा फक्त स्वतःपुरता विचार न करता आपण जोडीदाराचाही जीव जाणून घेऊ आणि पुढे जाऊ.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट