कोणाला तरी पत्र लिहिणारी सालंकृत नवयौवना. ही कोणाला बरे पत्र लिहित असेल? हिला एवढे काय सांगायचे असेल? ही नायिका तर नाही, असे विविध प्रश्न तिला पाहून पडतात. मग ती आपल्याशी बोलू लागते. अंतरीचे गूज सांगू लागते आणि उलगडतो विचारांचा विशाल पट. डॉ. राहुल देशपांडे मंदिराच्या प्रांगणातच हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायाला लागतात. गाभाऱ्यात असणारा देव सर्वत्र दिसायाला लागतो. विविध सुरसुंदरी, खांबांवरील कोरीवकाम, कथा सांगणारे काही शिल्पपट, काही अनवट, तर काही हमखास आढळून येणारी विलोभनीय शिल्प आपल्याशी बोलत राहतात. आपल्याला खुणावत राहतात. आपणही त्यांच्याशी संवाद साधायला लागतो. सर्व प्रश्नांची उकल झाल्यासारखी वाटते. लहानपणी जसे एखादे कोडे सुटले की आनंद व्हायचा, तसेच काहीसे होते. धुक्याचे सर्व धागे उसवून झाले आहेत, असे वाटतानाच अचानक हे शिल्प दिसते. ही सालंकृत असते. नितळ सौंदर्याचे प्रतिबिंब असणारी नवयौवना. एकाग्र चित्ताने भूर्जपत्रावर काहीतरी लिहित असते. हीच पत्रलेखिका. इतकी सालंकृत आणि नवयौवना कोणाला पत्र लिहित असेल, याचे उत्तर साधे, सरळ असते. आठवणीत झुरणारी आणि प्रियकराच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी ही विरहकंठीत नायिका तर नाही? अष्टनायिकांचा अभ्यास करताना ही अनेक वळणांवर दिसते. ती त्याला पत्र पाठवीत असते. प्रेमाचा संदेश तरी किंवा एखादी मधाळ आर्त विनवणी तरी. एकदम नैसर्गिक आणि साहजिक अशी भावना; मात्र क्षीरार्णवात हिचे वर्णन सुरसुंदरी म्हणून येते आणि उसवत आलेला धुक्याचा पडदा पुन्हा एकदा गडद बनायला लागतो. नायिका आणि सुरसुंदरी यातील अंधुकशा लक्ष्मणरेषेचे सविनय आणि सादर भान ठेवणारी संकल्पना या शिल्पात कशी बदलू शकेल? पुन्हा एकदा विचार चक्र सुरू होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि कला यातील नाते साद घालू लागते. 'तुज स्थूल म्हणू की सूक्ष्म रे'ची भक्तीपूर्ण आळवणी मनात रुंजी घालू लागते आणि क्षितिजावरचे एकमेकांत विरघळून जाणारे रंग पुन्हा एकदा सर्वत्र झिरपत राहतात. आकारांच्या शोधाला मरण नाही हेच खरे. हेच विचार मनात ठेवून फिरत असताना एकदम माझ्या आवडत्या भैरवीचे स्वर कानावर आले, 'जा के बाबुलसे नजरे मिलाऊ कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी मे दाग.' क्षणात विरघळत जाणाऱ्या त्या रंगांना अर्थ प्राप्त झाला. या सुरसुंदरीकडे एकटक पाहात राहिलो. असंख्य अर्थ ल्यायलेले भावनांचे आभाळ बरसले माझ्यावर. मला माहिती असते मी चुकलो आहे, कोणालातरी दुखावले आहे मी. कळत नकळत का होईना; पण कोणाला तरी मी यातना दिल्या आहेत. आत गाभाऱ्यात जाऊन देवाला तोंड दाखवू शकत नाही; कारण त्याला माझी चूक माहिती आहे. त्याला भेटणे तर आवश्यकच; मात्र नजरेला नजर देण्याची भीती वाटते आहे. अशावेळी एकच मार्ग शिल्लक राहतो, त्याला सामोरे न जाता मनातील भावना सांगणे. या अशा अवस्थेत पत्राशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. देवाला आपले मनोगत सांगण्याची आणि मनातील विचार भीड न ठेवता सांगण्याची याशिवाय दुसरी पद्धत असूच शकत नाही. वेगळाच अर्थ प्राप्त होतो मग या सुरसुंदरीला. दाटून आल्यावर कोसळायला लागते. नाही बरसलो, तर त्याचा त्रासच फक्त आणि हा त्रास खूप जीवघेणा असतो. गाभाऱ्यातील देव जरी सर्व जाणत असला, तरी तू मनातील सारे सारे स्पष्ट बोललेच पाहिजे, असेही सांगत असेल हे शिल्प. समोर जाऊन नाही बोलता आले, तरीही या मनाचे त्या मनाला सांगता आलेच पाहिजे, असेही सांगत असावे बहुधा हे शिल्प. मानसशास्त्राची या प्रांगणातील ही अभिव्यक्ती अचंबित करणारी आहे. तो सखा आहे, मित्र आहे, प्रवासाचा शेवट आहे. त्याचा आकार आभाळाचा आहे आणि मन भरतीच्या सागरासारखे. माझ्या मानातील भावना तेथे पोहोचल्याच पाहिजेत. केवळ नायिकेच्या रूपात अडकणारे हे शिल्प नाहीच. सौंदर्याची मुक्तहस्ते पखरण करत जगण्याचा मार्ग दाखविणारे आहे हे शिल्प. आरसपानी नितळ दवाची पखरण करत राजसपणे क्षणभंगुरतेचे विदारक दर्शन घडविणारी पहाट आणि मनातील भावनांना पैलतीराला नेऊन ठेवणारे हे शिल्प. एक शिल्प निसर्गाच्या प्रांगणात कोरलेले, तर दुसरे मंदिराच्या. एकाच वेळी आभाळाचे विविध रंग जगणारे हे लोभस शिंपले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट