सतत आग्रही असणे, अति आग्रही असणे हे प्रेम दर्शविणे आहे, असे काहींना वाटते. अशा व्यक्तींच्या जोडीदाराला मात्र त्याचा त्रास होत असतो. आग्रही असण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रगतीमध्ये भागीदार होणे, हे महत्त्वाचे असते. प्रेमाचा अतिरेक आग्रहामध्ये परावर्तित होत असेल, तर थांबायला हवे. प्रेम आग्रहामध्ये नाही, तर मोकळेपणात फुलते. डॉ. आनंद गोडसे लग्नाला साडेतीन वर्षे झाली आणि आता दोघेही त्यांच्या त्यांच्या दिनक्रमात रुळले आहेत, असे वाटावे असा सुरळीत संसार सुरू होता. एक दिवस मात्र वैदेहीला हा सुरळीत चाललेला संसार वाटतो तसा नाही आणि याबाबत काहीतरी करायला हवे, अशी जाणीव होऊ लागली. वैदेहीने स्वत:च ठरवून, आई-वडिलांना सांगून अरेंज मॅरेजला होकार दिला होता. त्यालाही पार्श्वभूमी होती. तिने यापूर्वी स्वत: ठरविलेल्या, पसंत केलेल्या मुलाने तिला नकार दिला होता. म्हणूनच सगळे प्रवाहात उतरल्यावर करतात तसेच आपणही आई-वडिलांनी पाहिलेला मुलगा निवडू आणि लग्न करू, असा विचार तिने केला होता. आई-वडिलांनी तर सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. पैसा, नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावर, आई-वडिलांबरोबर राहणारा, स्वत:चा बंगला असलेला, एक बहीण (धाकटी) असा परिवार असलेला तो होता. थोडक्यात, अद्वैत हा यादीतील सर्व गुण असलेला हा मुलगा होता. हा अद्वैत तेव्हा वैदेहीलाही योग्य वाटला होता. वैदेहीचा परिवार तशा कठीण आर्थिक परिस्थितीतून वर आलेला असल्यामुळे मिळालेला जावई हा त्यांच्यासाठी फारच कौतुकाचा विषय होता. साडेतीन वर्षांनंतर मात्र गोष्टी सुरळीत नाहीत, हे तिच्या लक्षात आले. आपल्याला जी जाचक अडचण वाटते, ती खरेच अडचण किंवा प्रश्न आहे का, की आपण उगाच या प्रश्नाचा बाऊ करतो आहोत, असा प्रश्न तिलाच पडला होता. अद्वैत तिच्याविषयी खूप पझेसिव्ह, अर्थात हक्काची भावना सांगणारा होता, ही तिची अडचण होती. सुरुवातीला खूप प्रेमळ असणारा नवरा साडेतीन वर्षानंतर वैदेहीला अचानक अति आग्रही वाटू लागला होता. आपली अडचण तिने तोपर्यंत कोणाला बोलून दाखविली नव्हती; कारण अद्वैतचा हा स्वभाव त्याच्या तिच्यावरील प्रेमाचा भाग आहे, असे तिला वाटत होते. 'तू आज ही साडी नको नेसू', 'या रंगाचा टॉप मला आवडत नाही आणि तू तो कधीच घालायचा नाहीस', असा अद्वैतच्या कमेंट्स वैदेहीला सुरुवातीला हुरळून टाकत असत. आपल्या नवऱ्याचे आपल्यावर खूप प्रेम आहे. हा प्रचंड आग्रह त्याचेच द्योतक आहे, असा तिचा समज होता. आता मात्र वैदेहीला गुदमरल्यासारखे होऊ लागले होते. 'मी तुला हवे ते सगळे देतो आहे, तर तू मी म्हणतो ते ऐकायला हवे,' असा अद्वैतचा आग्रह तिला सुरुवातीला अति आग्रह आणि आता दुराग्रह वाटू लागला होता. वैदेही या प्रेमाच्या नात्यात स्वत:चे अस्तित्व पूर्ण हरवून बाहुलीप्रमाणे नवरा म्हणेल ते, सासरचे म्हणतील ते सारे साडेतीन वर्षे करत आली. आता मात्र तिला याबद्दल प्रचंड दु:ख आणि राग वाटू लागला आहे. सुरुवातीच्या वर्षभरानंतर एक प्रसंग घडला. त्यानंतर वैदेहीच्या मनात अद्वैतचे प्रेम हे नक्की प्रेम आहे, की त्यात एक अहंकारी आग्रह दडला आहे, असा प्रश्न उभा राहिला. वैदेहीच्या वाढदिवसाला तिचे जुने मित्र-मैत्रिणी आले होते. या साऱ्यांना भेटून तिला खूप आनंद झाला होता. तो व्यक्त करताना ती अद्वैतशी खूप भरभरून बोलली होती. त्यावेळी तिच्या जुन्या मित्रांपैकी एक-दोघांचा उल्लेख झाला आणि अद्वैत अचानक तिच्यावर चिडला. या मित्रांना कधीही भेटायचे नाही, अशी ताकीदच त्याने तिला यानंतर दिली. आपल्या वैवाहिक जीवनात अडथळा नको, म्हणून वैदेहीने ते मान्य केले असले, तरी तिला ते पटलेले नव्हते. अद्वैतची ही संशयी वृत्ती नात्याला बाधक ठरत होती. या प्रसंगानंतर वैदेहीचे जगच छोटे होऊन गेले. तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू त्यानंतर नाईलाजाने अद्वैत हाच झाला. अशा प्रकारची आग्रही, अति आग्रही वृत्ती म्हणजे काहीतरी सिद्ध करण्याची आंतरिक गरज असू शकते. एखादी गोष्ट करावी, केलेली चांगली आणि केलीच पाहिजे, यामध्ये 'केलीच पाहिजे' असा 'च' आला, की ते नात्यामध्ये अडचणीचे ठरते. अद्वैत स्वत:बाबतही खूप आग्रही असतो. त्याचा त्याला स्वत:लाही त्रास होतो, हे वैदेहीने पाहिले आहे. - आपला हक्क दाखविणे म्हणजेच आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे, हे योग्य की प्रेम व्यक्त करण्याच्या इतरही काही पद्धती आहेत, ज्या अधिक सहज वाटतील? - आपल्या स्वत:च्या आवडीनिवडी दुसऱ्यावर लादल्या आणि त्या आपल्या साथीदाराने मान्य केल्या, तरच आपले प्रेम त्याला किंवा तिला समजले, असे आहे, की एकमेकांच्या आवडीनिवडी ओळखणे आणि त्या मनापासून सहजतेने स्वीकारणे अधिक योग्य आहे, हे ठरवायला हवे. - एखादी व्यक्ती ही एखाद्या वस्तूसारखी आपल्या मालकीची आहे, अशा भावनेने वागण्यापेक्षा नाते फुलविण्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते. - आपण आपले विचार, भावना, गरजा आपल्या जोडीदारावर लादत नाही ना? त्यामुळे त्याला किंवा तिला गुदमरायला होत नाही ना, हे पाहायला हवे. तसे होत असल्यास आपल्या वागण्यात बदल करायला हवा. - आपण सतत हक्काची भावना गाजविणारे असण्यामध्ये, प्रेमाचा हक्क बजावण्यामध्ये आपल्या जोडीदाराची व्यक्ती म्हणून होणारी प्रगती थांबणे, हे त्या व्यक्तीसाठीही निराशा वाढविणारे असते. त्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीचे वाटेकरी होण्याकडे लक्ष द्यायला हवे. काही वेळेला नवऱ्याबाबत बायको आग्रही असल्याचेही अनुभवास येते. अशावेळी आलेल्या कटुतेचे निराळे परिणाम होऊ शकतात. पेचात असलेल्या वैदेहीला तिच्या नवऱ्याची बहीण अनिता अचानक एका संध्याकाळी भेटायला आली. ती घरात घडणारे प्रसंग गेले साडेतीन वर्षे पाहत होती. तिने वैदेहीला अद्वैतच्या भूतकाळाविषयीची कल्पना दिली. वैदेही म्हणाली, 'हा भूतकाळ आणि त्याचा आत्ताच्या वागण्याशी असलेला संबंध वगैरे मला समजून घेणे कठीण आहे.' अनिताने हसून वैदेहीला साथ दिली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वैदेहीने स्वत:वरचा विश्वास ठाम करत अनिताची मदत स्वीकारली. पुढे जवळजवळ दीड-दोन वर्षे अद्वैतचे वागणे बदलण्यासाठी, त्याच्या मनात काही नव्या कल्पना रुजवायला सुरुवात केली. तो वागतो आहे ते चुकीचे आहे, असा शिक्का न मारता काही बदल घडवायचे होते. त्यासाठी अनिता आणि वैदेहीने प्रयत्न केले. याही काळात अद्वैतच्या वागण्यात टोकाचा बदल झाला नाही; परंतु ही जाणीव निश्चित झाली, की आपल्या प्रेमाचा अतिरेक हा आग्रहामध्ये परावर्तित होतो आणि या आग्रहाचा वैदेहीला त्रास होतो आहे. वैदेहीनेदेखील स्वत:मध्ये बदल केला. अद्वैतच्या काही मागण्यांना तिने ठामपणे; पण मवाळ शब्दांत नकार देण्यास सुरुवात केली. वागण्यामध्ये बदल घडविणे हे तंत्रज्ञानासारखे बटण दाबून होत नाही, तर काही शास्त्रशुद्ध तंत्र वापरल्यामुळे ते हळूहळू शक्य होते. नात्यामधील आनंद हा नाते समतोल असण्यामध्ये आहे. कोणतेही एक पारडे जड झाले, की कटुता येण्यास सुरुवात होते. प्रेम भावनेबाबत एका बाजूला आग्रह, हक्क, अधिकार, तर दुसऱ्या बाजूला मोकळीक, निरपेक्षता, स्वातंत्र्य असते. यातील कोणतीच तागडी जड होऊन चालत नाही. साहचर्यासाठी हा समतोल साधला, की नात्यामधील संप्रोक्तपणा आणि शुद्धता वाढत जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट