गरोदर महिलांसाठी पाण्यातील व्यायाम फायदेशीर उपचार म्हणून महत्त्वाचे आहेत. प्रत्येक स्त्रीला गरोदरपणात वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील सर्वसामान्य गरोदरपणाचे लक्षण असणारे थकवा, शारीरिक दुखणे, सूज हे पाण्यातील व्यायामाच्या उपचाराने सहज ठीक होऊ शकतात. डॉ. मीना ठुसे प्रत्येक गरोदर महिलेला आपला नऊ महिन्यांचा काळ सुरळीत जावा, आपली प्रसुती चांगली व्हावी आणि बाळ सुदृढ व्हावे, अशी इच्छा असते. गरोदरपणात पाठ दुखणे, बद्धकोष्ठता, शरीरावर सूज, पायांवर अति सूज, रक्तदाबाचा त्रास होतो. त्यासाठी डॉक्टर त्यांना औषधे आणि व्यायामाचा सल्ला देतात. कोणते व कसे व्यायाम करावेत या बाबतीत त्या अनभिज्ञ असतात. त्यांना गरोदरपणात व्यायाम करण्याची भीतीदेखील वाटते; कारण पडण्याची व दुखापत होण्याची शक्यता असते. पाण्यातील व्यायामामुळे महिलांची ऊर्जा वाढते, पाठ दुखणे कमी होते आणि मन प्रसन्न राहते. हे पाण्यातील व्यायाम काय आहेत? पाण्यातील व्यायामाला अॅक्वा एरोबिक्स म्हणतात. हे कमी खोलीच्या, म्हणजे कंबरेएवढ्या किंवा छातीएवढ्या पाण्यामध्ये, तरणतलावात करतात. हे एक प्रकारचे प्रतिकारात्मक व्यायाम आहेत. हे व्यायाम प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करण्यात येतात. वाद्यांच्या तालावर केले जातात म्हणून याला मनोरंजनात्मक व्यायाम असेही म्हणतात. या व्यायामाचे विविध प्रकार आहेत. अॅक्वाएरोबिक्स, अॅक्वाझुंबा, अॅक्वायोगा, अॅक्वावॉक, अॅक्वाजॉग, अॅक्वाजंपिंग, अॅक्वासायकलिंग इत्यादी. या व्यायामांच्या वेळी होणाऱ्या हालचालींमुळे पाणीदेखील हलते आणि त्यालाही शरीर सामोरे जाते. म्हणजेच पाण्याचा प्रतिकार करावा लागतो. पाण्याच्या घनतेमुळे शरीराच्या सर्व बाजूंचे स्नायू क्रियान्वित होतात. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि स्नायू बळकट होतात. या व्यायामाला शक्तीप्रशिक्षण तसेच प्रतिरोधात्मक व्यायाम असेही म्हणतात. यामध्ये हृदय जास्त कठीण कार्य करण्यात व्यग्र असते; पण व्यक्तीची जास्त दमछाक होत नाही. पाण्यात असल्यामुळे तोल जात नाही, घामही येत नाही. त्यामुळे हा व्यायाम कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटतो. यात हृदय स्नायूंची कार्यक्षमता वाढत जाते. संपूर्ण शरीरातील स्नायूंच्या तंतूंना सतत रक्त पुरवठा होत राहतो. त्यासोबत प्राणवायू मिळत राहतो. गरोदर महिलांसाठी पाण्यातील व्यायाम फायदेशीर उपचार म्हणून महत्त्वाचे आहेत. प्रत्येक स्त्रीला गरोदरपणात वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील सर्वसामान्य गरोदरपणाचे लक्षण असणारे थकवा, शारीरिक दुखणे, सूज हे पाण्यातील व्यायामाच्या उपचाराने सहज ठीक होऊ शकतात. जास्त पेल्व्हिक (ओटीपोटा खालचे) स्नायू हे जेव्हा आखडतात, तेव्हा दुखण्याचा त्रास जास्त होतो. पाण्यातील व्यायाम गरोदर महिलांची दुखणी शमाविणारा आहे. गरोदर महिला त्यांच्या वाढलेल्या पोटामुळे खुल्या मौदानात व्यायाम करण्यास संकोचतात; त्यामुळे त्या व्यायाम करण्याचे टाळतात देखील. पाण्यातील व्यायाम हे तरणतलावात करावे लागतात आणि महिलांसाठी व्यायामाचा वेळही वेगळा असतो. पाण्यात उतरल्यानंतर पोटही कुणाला दिसत नही. अशा प्रकारच्या व्यायामामुळे पुढील प्रकारचे फायदे होऊ शकतात. १. प्रसूतीच्या वेळी होणारे फायदे : योग्य त्या हालचालींमुळे शारीरिक क्षमतेचा विकास होतो. महिलेच्या आवश्यक त्या स्नायूंवर ताण व जोर पडल्याने स्नायूंचा विकास होतो, प्रसूती चांगली होते. ज्या महिला हे व्यायाम नियमितपणे करतात, त्यांची प्रसूती आरामात आणि कमी त्रासात, सहज होते. पाण्यातील व्यायाम गर्भावस्थेच्या कोणत्याही वेळी करता येतात. २. स्नायू बळकट होतात : पाण्यात व्यायाम केल्यामुळे पोटाचे, पाठीचे व खालील स्नायू बळकट होतात. पाण्याच्या घनतेमुळे महिलांचे पोश्चर चांगले राहते; कारण पाण्यामध्ये शरीर कोणत्याही दिशेने सहज वळवू शकतात. स्नायूंवर ताण येतो व पाण्याच्या आघातामुळे स्नायूंची ताकद वाढते. ३. लवचिकता वाढते : पाण्यातील व्यायामामुळे लवचिकता आणि स्थिरतेचा विकास होतो. तरंगण्यामुळे कडक आणि अस्थिर स्नायूंची लवचिकता वाढते. पाण्याच्या आधारामुळे सांध्यातील स्नायूंच्या हालचाली वाढतात. ४. सहनशीलता वाढते : सांध्यातील हाडे आणि स्नायूंतील तणाव कमी जाणवतो. पाण्याच्या वर उचलण्याच्या गुणधर्मामुळे हे शक्य होते. या व्यायामाच्या विविध हालचालींमुळे पाण्यात निर्माण होणाऱ्या लाटांच्या विविध प्रतिकारात्मक शक्तीला शरीर सामोरे जाते. पाण्याच्या प्रतिरोधाचा दाब हा नसांद्वारे रक्तप्रवाह हृदयाकडे नेण्यास मदत करतो. हृदयांच्या स्नायूंची कार्यक्षमताही वाढत जाते. ५. शरीराची सूज कमी होते : हायड्रोस्टेटिक दबावामुळे शरीरावरची सूज कमी होते. पाण्यात निर्माण होणाऱ्या लाटांच्या आघातामुळे स्नायूंचे तंतू सतत उत्तेजित व स्नायू कार्यान्वित होत राहतात. हृदय कार्यान्वित होत असल्यामुळे रक्तप्रवाहाद्वारे प्राणवायू सर्वच स्नायूंच्या तंतूंपर्यत पोहोचतो. संशोधनात हे सिद्ध झाले आहे, की पाण्यातील व्यायामुळे शरीरावरील सूज लवकर कमी होते. ६. रक्ताभिसरण वाढते : शरीरातील रक्तवाहिन्या उत्तमप्रकारे कार्य करतात; कारण यात हृदय जास्त कठीण कार्य करते. पोटातील बाळाला रक्त व प्राणवायूचा पुरवठा भरपूर होतो. ७. थंड पाण्यात व्यायाम करावा : गरोदर स्त्रीच्या शरीराचे तापमान वाढलेले असते. व्यायाम करताना तसेही तापमान वाढते. त्यामुळे पोटातील बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. थंड पाण्यात उत्साह वाढतो व मन शांत राहते, म्हणून गरोदर स्त्रियांनी थंड पाण्यात व्यायाम करावा. ८. चयापचय क्रियेत वाढ : पाण्यातील व्यायामामुळे गरोदर स्त्री पूर्ण वेळ क्रियाशील राहू शकते. आनंदी आरामदायी व्यायामाने, पाण्याच्या हेलकाव्यांने चयापचयाच्या प्रक्रियेत वृद्धी होते व बद्धकोष्ठता होत नाही. ९. गॅस्ट्रोइनस्टीनल समस्येचे समाधान : काही वेळा पोटातील गर्भाच्या वाढीमुळे पचन क्रियेवर परिणाम होतो. तो पाण्यातील व्यायामामुळे सुधारतो; कारण गुरुत्वाकर्षणाच्या तत्वाने आणि शरीराच्या खालील अवयवांच्या हालचालीमुळे पचनक्रियेत वाढ होते. १०. मन प्रसन्न राहण्यास मदत : पाण्यातील व्यायामाकरिता महिला स्वीमिंग पुलवर जातात. त्यांना इतर गरोदर महिलांना भेटण्याची संधी लाभते. सामाजिक संबंध वाढतात. गप्पा मारल्याने व विचारांचे आदान प्रदान होत असल्यामुळे मन प्रसन्न राहते. (लेखिका शारीरिक शिक्षण विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट