नाही तर यंदाही जैसे थे! साधारण मे महिना संपायला आला की, ठिकठिकाणी पम्पिंग स्टेशन आणि पालिकेची आश्वासनं ऐकायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे नवीन योजना, बजेट आणि नेत्यांची आश्वासनंही झाली. पण मुंबई ही तुंबलेलीच असते ही गोष्ट वेगळीच! मुंबईची सद्यस्थिती पाहता मुंबईत विकासकामं सध्या भरपूर चालू आहेत. त्यामुळे मुंबईकरांना या पावसाळ्यात आणखी काय नवीन बघायला मिळतंय, हे नवल आहे. यावेळी प्लास्टिक पिशवी प्रकरण भलतंच गाजलं. पण ते काही दिवसांपुरतंच होतं. नंतर परिस्थिती जैसे थे! मला वाटतं, मोठी स्वप्नं दाखवून पालिका मात्र छोट्या-छोट्या नागरी सुविधांचा पुरवठा करण्यात असमर्थ ठरतेय. पावसाळ्यात बुलेट ट्रेनपेक्षा माणसाला उत्तम आरोग्य आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते, असं मला वाटतं. सरकार कोणतंही असो ते नागरी सुविधा देण्यात विशेष करून मुंबईसारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी किती यशस्वी ठरतंय, हे जास्त महत्त्वाचं असतं. यावेळी नालेसफाईची कामं आणि एमएमआरडीएने मांडून ठेवलेला पसारा प्राधान्यानं आवरावा. कारण त्याचा फटका जवळपास लाखो मुंबईकरांना बसतो. यावेळी मुंबापुरीच्या समस्यांसाठी एमएमआरडीए पण आखाड्यात उतरलीय. थोडक्यात काय तर ज्यानं-त्यानं स्वतःची कामं नेमून दिल्याप्रमाणे चोख पार पाडावी, जेणेकरून नागरिकांना या पावसाळ्यात काही त्रास सहन करावा लागणार नाही. नाही तर यंदाही परिस्थिती 'जैसे थे'च राहिल. सानिका किर, कीर्ती कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट