Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मेरे नाम की कोई सडक है ना

$
0
0

नुकत्याच झालेल्या एका पाहणीत पदव्युत्तर शिक्षणात मुलींचा टक्का वाढल्याचे आढळून आले आहे. मुलींच्या शिक्षणाकडे पूर्वी होणारे अक्षम्य दुर्लक्ष आता कमी झाले असून, लिंगभेदासंबंधी ग्रामीण आणि शहरी पातळीवरही बदललेली मानसिकता, विविध शिक्षण संस्थांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे उच्च शिक्षणानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या मोठ्या संधी आणि मुलींच्या कष्टांना मिळणारा मागच्या पिढीतील स्त्रियांचा भक्कम पाठींबा अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत.

आसावरी चिपळूणकर

Asawari.Chiplunkar@timesgroup.com

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण पाहणी अहवालातून जी आकडेवारी समोर आली, त्यात गेल्या आठ वर्षांत प्रथमच पदव्युत्तर शिक्षणात मुलींचा टक्का वाढला असल्याचे दिसून आले. ही फक्त मुली, तरुणी, स्त्रिया यांच्याच दृष्टीने आनंदाची किंवा अभिमानाची बाब नाही, तर समानतेचा उगाचच खोटा आव न आणता, स्वत:च्या मुली, पुतणी, भाच्या किंवा नातींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक पुरुषाच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित फुलवणारीही गोष्ट आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतूनही मुलींबद्दल बदलत असलेल्या मानसिकतेचाही हा परिपाक आहे.

एके काळी ग्रामीण भागात स्त्रियांच्या शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी समाजजागृतीचा विडा उचलणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विभूतींपासून आजही या संदर्भात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींपर्यंतच्या अनेकांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतून हा बदल समाजात आणि विशेषत: मानसिकतेत प्रामुख्याने घडून आला आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात मुले मागे राहू नयेत, यासाठी अनेक घरांतून आजही मुलग्यांचे नाव इंग्रजी माध्यमात आणि मुलींचे नाव मराठी माध्यमात नोंदवले जाते. घराघरांत हा भेदाभेद होत असताना एक चांगली बाब आपोआप घडत जाते, ती मातृभाषेत होणाऱ्या शिक्षणामुळे! शालेय वयापासूनच मुलींच्या विज्ञान, गणित, नागरिकशास्त्रापासून विविध विषयांतील संकल्पना अतिशय स्पष्ट होत जातात. वेगळी भाषा शिकण्याची धडपड आणि त्यात पुन्हा पहिल्यांदाच शिकत असलेल्या संकल्पनाही नव्याने शिकण्याची धडपड कदाचित मुलांना जास्त करावी लागते; शिवाय मुली भाषाही चटकन आत्मसात करतात. मग ती शालेय शिक्षणातील असो किंवा जीवनव्यवहारातील असो. मुलींची भाषा शिकण्याची हातोटीही दांडगी असते. याचसाठी सहज लक्षात येणारे उदाहरण म्हणजे पुण्याहून गुजरातमध्ये राहायला गेलेल्या मराठी कुटुंबातील स्त्री ही शेजाऱ्यांकडून गुजराती पटकन शिकते. त्यामानाने पुरुषांना भाषा शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलीदेखील भाषेच्या आवडीतून किंवा अनेकदा आहे त्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी जास्तीची मेहनत घेतात आणि प्रगती करताना दिसतात.

अलीकडेच एक बातमी प्रसिद्ध झाली होती, की निवृत्त झालेल्या ३८ वर्षांच्या हवाईसुंदरीची मुलगी वैमानिक आहे. यातून जाणवली ती गोष्ट इतकीच, की आर्थिक किंवा सामाजिक स्तर कुठलाही असला, तरी प्रगतीपथावर दौडत निघण्यासाठी एक पिढी मागच्या स्त्रियांचा आपल्या मुलींना अतिशय भक्कम पाठिंबा आहे. हे एकंदरितच लोकशिक्षणाचेच बळ आहे. अनेकदा केवळ स्त्री आहे; म्हणून मुली किंवा तरुणींना जेव्हा सामाजिक पातळीवर संधी नाकारल्या जातात, तेव्हा त्या नकारातूनच 'करून दाखविण्याची' धमक वाढत जाते. ज्या स्त्रिया घर आणि मुले सांभाळून उच्च शिक्षण घेत राहिल्या, त्यानंतर नोकरी करत राहिल्या आणि ही तारेवरची कसरत करताना ज्या स्त्रियांनी दमछाक करून घेतली, त्या एक ते दोन पिढी आधीच्या स्त्रिया आता आई, मावशी, आत्या, आजी या भूमिकेत आहेत. अनेकदा स्वत:च्या जोडीदाराच्या परवानगीची वाट पाहत, काही वेळा संयम बाळगून परवानगी मिळवून, तर काही वेळा उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडण्यासंदर्भातील विरोधाला न जुमानता स्वबळावर अनेक गोष्टी साध्य करताना या पिढीतील स्त्रियांनी शारीरिक, मानसिक आरोग्यापासून स्वत:च्या आवडी आणि छंदांपर्यंत अनेक गोष्टींना तिलांजली दिली. यातूनच मुलीच्या इच्छा, आकांक्षांसाठी तिच्या पंखांत बळ भरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न गेल्या पिढीतील प्रत्येक आईने केले. त्यातूनच आताच्या मुली- तरुणी भरारी घेऊ लागल्या आहेत. अर्थात, स्वत:बरोबरच बहुतेक घरातील त्यागमूर्ती अशा आईलाही आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीतूनच त्या उच्च शिक्षणापर्यंत मजल गाठत आहेत. त्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत; कारण आर्थिक सक्षम झाल्याशिवाय आपल्याला हवे ते साध्य करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव अनेकींच्या मनात आहे. ग्रामीण भागातील ही जाणीव शहरी भागात जरा वेगळ्या पद्धतीने समोर आलेली दिसते. उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणी आता नोकरी, लग्न अशा विविध ठिकाणी स्वत:च्या अटी घालू लागल्या आहेत. मुलींच्या अपेक्षा हा आता चर्चेचा विषय होऊ लागला आहे. सरसकट ग्रामीण भागात नसले, तरी शहराच्या मानाने आजही विविध गावांतून जातीभेदाचे वातावरण आहेच; म्हणूनच शहरात आल्यानंतर हा भेद पुसला जात असल्यामुळे उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना तरुणींना जास्त मोकळेपणा वाटतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू एन. एस. उमराणी या सकारात्मक बदलाविषयी म्हणाले, 'हल्ली विविध शिक्षण संस्थांमधून व्यावसायिक अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. त्याचाही फायदा मुलींना होतो. स्त्री म्हणून असलेली मूळची सेवाभावी वृत्ती, संयम आणि संवेदनशीलता यामुळे मुली विश्वासार्हताही संपादन करतात आणि कष्टाची तयारी दाखविल्यामुळे जबाबदारीची कामेही पुढाकाराने पार पाडताना दिसतात. नोकरी किंवा व्यवसायादरम्यान आता गर्भवती राहिल्यास किंवा मुलाच्या संगोपनासाठी रजा घेणे याही विषयांवर स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करून कंपन्यांतून नियम लागू होत आहेत. मात्र, यासाठी उच्च शिक्षण अपरिहार्य आहे. मग ते घेण्यासाठी मुली धडपडल्या, तर त्यात वावगे काय? त्यामुळे पाहणीतून वाढलेला मुलींचा उच्च शिक्षणासंदर्भातील टक्का अनेकींना प्रेरणादायी तर आहेच; शिवाय मुलींची कष्ट घेण्याची तयारी दाखविणाराही आहे.' आपल्या आवडीच्या विषयांतील उच्च शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमांतून मिळविल्यास त्याचा फायदा 'स्टार्ट अप'साठीही होऊ लागला आहे. त्यातून स्वत:च्या आवडीचे काम करतानाच उत्तम उत्पन्न मिळविता येत असल्याने मुली उच्च शिक्षणासाठी आटापिटा करत असतील, तर ती समाधानाचीच बाब म्हटली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>