गरीब, मागासलेल्या केनियात 'शूट टू स्कोअर, नॉट टू किल' अशी घोषणा देणाऱ्या फातुमा अब्दुलकादिर अदानचा लढा विस्मयकारी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील स्त्रियांसाठी तितकाच प्रेरणादायी. सुनीता लोहोकरे 'बेंड इट लाइक बेकहम' हा गुरिंदर चढ्ढाचा २००२मध्ये प्रदर्शित झालेला सुंदर चित्रपट अनेकांच्या अजूनही स्मरणात असेल. इंडो-ब्रिटिश प्रकारातील या चित्रपटाची नायिका जसमिंदर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पारंपरिक पंजाबी कुटुंबातील १८ वर्षांची मुलगी. डेव्हिड बेकहम आणि फुटबॉलची निःस्सीम चाहती. घरातील कर्मठ वातावरणामुळे कोणालाही कळू न देता स्थानिक फुटबॉल संघाबरोबर फुटबॉल खेळू लागते. याची कुणकुण घरात लागल्यावर तिच्या खेळावर बंदी येते; मात्र अखेरीस ती घरच्यांचे मन वळविण्यास यशस्वी होते. विनोदाचा उत्तम वापर केलेल्या या चित्रपटात पारंपरिक नीतीमूल्ये आणि व्यक्ती, विशेषत: स्त्री स्वातंत्र्य यांचे द्वंद्व पाहायला मिळते. फुटबॉलच्या प्रेमातून परंपरेला आव्हान देणारी नायिका स्त्री म्हणून येणाऱ्या मर्यादांची चौकट ओलांडून स्वातंत्र्य शोधताना दिसते. एका भारतीय कुटुंबाची ही कथा घडते ब्रिटनसारख्या प्रगत देशात; पण जसमिंदर ही आफ्रिकेतील केनियासारख्या देशात जन्माला आली असती, तर काय झाले असते? कदाचित जसमिंदरच्या जागी आपल्याला फातुमा अब्दुलकादिर अदान दिसू लागली असती. अर्थात, वास्तवातील जसमिंदरचा म्हणजे फातुमाचा लढा हा जसमिंदरसारखा स्वतःसाठी नाही. चाळिशीची फातुमा 'स्व'ची चौकट ओलांडून केव्हाच पुढे गेली आहे. फातुमासाठी फुटबॉल हे सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे साधन बनले आहे आणि 'फिमेल जेनिटल म्युटिलेशन'ला विरोध करण्यासाठीचे हत्यार. सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी फातुमाच्या फुटबॉल संघात प्रवेश मिळवण्यासाठी फी म्हणून एके-४७ द्यावी लागत होती. हे ऐकून धक्का बसेल; पण तिचा सारा प्रवास असा विस्मयकारी आहे. खरे तर फातुमाने वकिलीचे शिक्षण घेतले होते. नैरोबीत राहून ती वकिली करू शकली असती. भरपूर पैसे मिळवून मर्सिडिझ बेन्झमधून फिरता आले असते; पण तिला घरी यायचे होते. मर्सबितमध्ये. केनियाच्या राजधानीतील आर्थिक सुबत्ता असलेल्या आयुष्यापेक्षा मुलींना खेळामध्ये स्थान मिळवून देणे, हे तिच्या आयुष्याचे उद्दिष्ट बनले होते. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे तिला या खेळाच्या माध्यमातून समाजिक सलोखा वाढवायचा होता, शांतता प्रस्थापित करायची होती. केनियाच्या उत्तर परगण्यात, मर्सबितमध्ये दहा-बारा वर्षांपूर्वी तिने मुलींचा फुटबॉलचा संघ स्थापन केला. या भागात मुलींना फुटबॉल खेळण्यावर अघोषित बंदी होती. 'त्या वेळी माझ्यावर दगडफेक व्हायला लागली. खेळाच्या मैदानातून मला अक्षरशः फेकून देण्यात आले,' फातुमाचे असे अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. तरीही न डगमगता तिने आपला लढा सुरूच ठेवला. संघातील मुलींनीही तिला साथ दिली. या संघाने पहिली स्पर्धा गाजविली; पण तिचे विरोधक अधिक आक्रमक झाले. बारा मुलींच्या संघातील आठ मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आले. २००३मध्ये तिने 'हॉर्न ऑफ आफ्रिका डिव्हेलपमेन्ट इनिशिएटिव्ह' (HODI)ची स्थापना केली. हळूहळू तिच्या लढ्याला यश मिळू लागले. केनियातील विविध जमातींमध्ये सातत्याने यादवी सुरू असते. 'माझ्या केनियात डांबराचे रस्ते नाहीत की चांगल्या शाळा, रुग्णालयांमध्ये सुविधाही नाहीत. डांबर मिळवण्यात अलीकडेच आम्हाला यश आले,' फातुमाच्या या वाक्यातून केनियातील स्थितीवर प्रकाश पडतो. एकीकडे समाज साध्या साध्या गोष्टींसाठी झगडतो आहे आणि दुसरीकडे वांशिक दंगलींमुळे तो पोखरला गेला आहे. फातुमाचे बालपण या दंगली पाहाण्यातच व्यतीत झाले. बोरोना, गाब्रा आणि रेंडिली या जमातींमध्ये सतत होणारा संघर्ष, हिंसाचार ती अनुभवत होती. तिची आई गाब्रा जमातीची आणि वडील बोराना. या दोन जमातींमधील यादवीत आपण कोणत्या बाजूचे, आपला शत्रू कोण, असे प्रश्न तिला पडत असत. फुटबॉलची आवड तिच्या वडिलांमुळे निर्माण झाली. मात्र, पंचविसाव्या वर्षापर्यंत तिने फुटबॉलला पायही लावला नव्हता. २००५मध्ये झालेल्या अशाच एका झगड्याचे हिंसाचारात रूपांतर झाले आणि सुमारे १०० जण मृत्युमुखी पडले. नंतर या सगळ्याने त्रस्त झालेल्या अनेक तरुणांना फातुमाच्या फुटबॉलप्रेमाने मोह घातला. फातुमाच्या फुटबॉलच्या संघात प्रवेश घ्यायचा असेल, तर हातातली एके ४७ रायफल फेकून द्यायची, अशी तिची अटच होती. खरेचच अनेक तरुणांनी शस्त्रे खाली ठेवली आणि फुटबॉल हातात घेतला. मुलीही फुटबॉलकडे आकर्षत झाल्या. गेल्या दहा वर्षांच्या काळात मर्सबितमधल्या १५२ गावांमधल्या १,६४५ मुली फुटबॉल खेळू लागल्या आहेत. एकीकडे हे सुरू असतानाच फातुमाने बालविवाह रोखण्यासाठी आणि फिमेल जेनिटल म्यूटिलेशनची अघोरी प्रथा बंद करण्यासाठी लढा उभारला. मुलींचे विवाह बारा-तेराव्या वर्षी होताना सर्रास दिसत असे; पण फातुमाने केलेल्या जागृतीमुळे आज एखाद्या तेरा वर्षांच्या मुलीचा विवाह झाला किंवा ठरला, तर तिच्या वर्गातलीच मुले-मुली त्याविरोधात तक्रार करतात. आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या आणि स्त्रियांच्या जागृतीचे काम करण्यासाठी तिने फुटबॉलचा आधार घेतला. 'फुटबॉलचे सामने सुरू असताना आम्ही दोन स्तरांवर काम करतो. एक म्हणजे खेळ आणि दुसरे म्हणजे मुलींना शिक्षण देणे. संस्थेकडून पालकांच्या शिक्षणाचेही प्रयत्न केले जातात,' फातुमा सांगते. केनियात बालविवाह अवैध मानला जातो. मात्र, तेथील समाजावर रुढी, परंपरांचा इतका पगडा आहे, की कायद्याला न जुमानता बालविवाह केले जातात. ही प्रथा मोडून काढण्यासाठी तिने प्रयत्न केले. तिच्या एकूण कार्यासाठी तिला 'स्टूटगार्ड पीस प्राइझ' देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमांमध्ये तिला व्याख्यानांसाठी आमंत्रण दिले जाते. फातुमाच्या हातात असलेला फुटबॉल शांतता, स्वातंत्र्य आणि समानतेचे प्रतीक बनला आहे आणि जगातील कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकासाठी तिच्यावर चित्रपट काढणे हे एक आव्हान ठरले आहे. Sunita.Lohokare@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट