सरोगसीचे तंत्रज्ञान अनेकांसाठी उपकारक असले, तरी आपले गर्भाशय वापरू देणाऱ्या महिलांची अनेकदा पिळवणूक होत असल्याचे दिसते. नागपूरमध्ये असे एक रॅकेट उघडकीलाही आले. यातील व्यापार, रॅकेट या साऱ्या गोष्टींविषयी या पूर्वीही बोलले गेले होते. त्यासंबंधीचा कायदाही भारतामध्ये झाला आहे; परंतु या सगळ्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज भासते आहे. वृषाली देशपांडे निसर्गानंतर या जगात प्राणीमात्रांमधील मादीकडे आणि माणसाच्याबाबतीत स्त्रीकडे सृजनशक्ती असेल. 'आई' होणे म्हणजे महन्मंगल सुख. 'आई' होणे म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता, असे विचार आपल्याकडे खोलवर रुजले आहेत. 'आई' होण्यातील सुख खरेच अवर्णनीय; पण त्यामुळे ज्या स्त्रियांना किंवा दाम्पत्याला नैसर्गिकरीत्या मूल होऊ शकत नाही, त्यांच्याकडे बघण्याच्या समाजाच्या नजरा दूषित झाल्या. समाजाने आपल्याकडे वेगळ्या दृष्टिने पाहू नये, म्हणून तरी मूल असणे गरजेचे झाल्यासारखे झाले. त्यावर मूल दत्तक घेण्याचा पर्याय पुढे आला, तरी सुद्धा स्वतःचे मूल ते स्वतःचेच, असेही आहे. दुसरीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातही विविध संशोधने सुरू होती. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, सामाजिक बदल आणि कायदेशीर प्रक्रिया यांनी आजच्या आधुनिक सरोगसीचा मार्ग आखला गेला. १९३६मध्ये अमेरिकेतील पार्क डेव्हिस आणि शेरिल कालबाम या औषधी कंपन्यांनी स्त्रियांमधील संप्रेरक इस्ट्रोजन तयार केले. त्यानंतर गर्भाशयाबाहेर मानवी बीजांड फलनाचा सफल प्रयोग, शुक्राणूंचे क्रायोप्रिझर्व्हेशन, पहिली टेस्ट ट्यूब बेबी, पहिले सरोगसी करार लेखन, १९८५मध्ये पहिली सरोगेट गर्भधारणा आणि १९८६ मध्ये 'बेबी एम' - मेलिसा स्टर्न, सरोगसीतून जन्माला आलेले पहिले मूल ठरली. 'बेबी एम'च्या जन्माने मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना आशेचा नवा किरण दिसला. खर्चिक असली, तरी ही वैद्यकीय प्रगती अनेकांसाठी वरदान ठरली. पुढे या वरदानाची गत अॅटम बॉम्बसारखी होणार आहे, हे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल. बघता बघता सरोगसीचा बाजार थाटला गेला. अगदी मोजक्या लोकांच्या कक्षेत असलेला सरोगसीचा खर्च, या उपचारपद्धतीचा वापर वाढला तसा कमी झाला आणि बराच आवाक्यात आला. मूल हवे असणारी जोडपी, डॉक्टर्स आणि करारावर आपले गर्भाशय भड्याने देणारी स्त्री या मूळ साखळीत दलाल कधी घुसले आणि त्याचा व्यापार कधी झाला, हे कळलेच नाही. मातृत्व मिळविणे किंवा पालकत्व स्वस्त होऊन 'करारावर' मिळणे खूपच सोपे झाले. या सगळ्यांत मुख्य असलेली सरोगेट मदर मात्र शेवटच्या पायरीवर आली. सरोगसीचा व्यापार फोफावला, तसतसे त्याचे विविध आयाम आणि दुष्परिणाम समोर येऊ लागले. अतिशय क्लिष्ट असे नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर मुद्दे उभे राहिले. या वैद्यकीय उपचार पद्धतीने एकीकडे स्त्रीला मातृत्व देऊ केले, तर दुसरीकडे स्त्रीचेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणही सुरू झाले. भारत तर सरोगसीचे 'हब' झाले. विविध देशांतील जोडपी भारतात येऊन भारतीय स्त्रियांचे गर्भाशय वापरून पालकत्व प्राप्त करून घेत असत. भारतात सरोगसीसाठी विशेष कायदे नव्हते आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राबवलेल्या मोहिमेने इतर उपचारांबरोबरच सरोगसीला चालना मिळाली. शिवाय भारतात इतर देशांच्या तुलनेने सरोगसीसाठी कमी खर्च येतो, ही बाबही परदेशी जोडप्यांच्या पथ्यावर पडली. भारतातून आणि परदेशातून सरोगसीला मागणी वाढली, तशी सरोगेट मदर होऊ शकणाऱ्या स्त्रियांचा शोध वाढला. असाही व्यवहार असतो असे कळल्यावर, कितीतरी घरांतून पैसा मिळावा या हेतुने स्त्रियांना या व्यवसायात जबरदस्तीने झोकून देण्यात आले. आपल्याकडे सरोगसीसंबंधी अतिशय काटेकोर माहिती उपलब्ध नाही; कारण हा व्यवहार आणि व्यवसाय अतिशय छुपेपणाने चालतो. सरोगसी सेंटर्स महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये केंद्रित असली, तरी आपले गर्भाशय या व्यवसायासाठी देऊ करणाऱ्या स्त्रिया मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातील आहेत. त्यातील बहुतांश गरीब कुटुंबातील, नाईलाजाने या व्यवसायात आल्या आहेत. सरोगसीद्वारे एक मूल हा कितीतरी लाखांचा व्यवहार आहे; पण परिस्थितीने गांजलेल्या या सरोगेट आयांना मात्र सगळ्यांत कमी पैसे मिळतात. डॉक्टर आणि दलाल यांच्या वाट्याला बहुतांश पैसा येतो. पैसा मिळावा म्हणून या बाजारात आलेल्या स्त्रियांना गर्भधारणेपूर्वी कितीतरी चाचण्यांना सामोरे जावे लागते, किती हार्मोन्स शरीरात जातात; नॉर्मल प्रसूतीपेक्षा सिझेरियनाला प्राधान्य दिले जाते. प्रसूतीनंतर कितीतरी शारीरिक साइड इफेक्ट्सना सामोरे जावे लागते, मानसिक स्वस्थ्य बिघडते. अशावेळी मात्र त्यांच्याकडे ना डॉक्टर्स बघतात, ना ज्यांना मूल दिले ती जोडपी, ना दलाल! हाती आलेले पैसेही संपलेले असतात. अलीकडे तर सरोगेट बाईचा धर्म, जात, रंग, रूप अशा गोष्टींचा अट्टाहासही वाढतो आहे. 'सुंदर' सरोगेट मदरला मोठीच मागणी आहे. याशिवाय सरोगसी तंत्राद्वारे मुलींच्या तुलनेत मुलगे अधिक जन्माला आल्याची धक्कादायक माहिती आहे. म्हणजे गर्भाची लिंगनिवड येथेही आहेच. चित्रपटसृष्टीतील जोडप्यांनी आणि एकटे असणाऱ्यांनीही सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करून घेतली असल्याने, त्याला आता एक वेगळे ग्लॅमरही प्राप्त झाले आहे. सरोगसी तंत्राने अपत्यप्राप्ती होऊ न शकणाऱ्या व्यक्तींना किंवा जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्याचा मार्ग दिला. तो आनंद मिळवून देण्याऱ्या स्त्रीच्या वाट्याला मात्र शोषणच येते आहे. सरोगसीने स्त्रीचे शोषण करण्याचे आणखी एक महाहत्यार माणसाच्या हातात दिले आहे, असे म्हणता येईल. सरोगसीतील सगळे गैरव्यवहार पाहून सरकारने याबाबत 'असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी' विधेयक मांडले. व्यावसायिक सरोगसीला बंदी, करारात पारदर्शकता, सरोगसी सेंटर्सची नोंदणी अशा अनेक बाबींचा समावेश आहे; पण कायद्यातून पळवाटा काढणे यातही आपण सराईत आहोत. नागपूरमध्ये सरोगसीचे रॅकेट उघडकीला आल्यावर पोलिसांनी डॉक्टर्स आणि दलालांवर गुन्हा दाखल केला. आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत तपासणी केली; पण सरोगसी रॅकेट बाजूलाच राहिले आणि डॉक्टरांना क्लीनचिट दिली. शेवटी, आपले गर्भाशय भाड्याने देणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाकडे, व्यापारीकरणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असणार आहे? आणि याही बाबतीत वस्तू म्हणूनच स्त्रीकडे आपण बघणार आहोत का? आपल्या शरीराचा स्त्रीने करार करून वापर करू द्यावा का? असे करणे स्त्रीच्या मानव अधिकारांतर्गत किती येते? सरोगसीच्या कराराकडे कामगार किंवा नोकरीवर नियुक्त करण्यासाठीच्या करारासारखेच बघावे का? एकाच जोडप्यासाठी अनेक स्त्रियांना गर्भारपण स्वीकारण्यास लावणे कितपत योग्य? या अनेक स्त्रियांपैकी एकीचा गर्भ ठेवून बाकीच्यांचा अनेकदा नकळतही गर्भपात केला जातो, त्याचे काय? सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या मुलावर सरोगेट आईचा अधिकार असवा का? आणि सरोगसीच्या माध्यमातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या जैविक आईची माहिती मिळण्याचा अधिकार असायला हवा का? किंवा अशी माहिती कळल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक, कायदेशीर क्लिष्टतांचे काय? असे अनेक प्रश्न आहेतच.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट