टाकाऊ वस्तूंपासून उत्कृष्ट कलाकृती साकारणाऱ्या चेतन राऊत या तरुण कलाकारानं साकारलेली एक नवी कलाकृती सध्या चर्चेत आहे. चौदा हजार पंचमुखी रुद्राक्षांचा वापर करून त्यानं शिवरायांचं पोट्रेट साकारलं असून, त्याची नोंद रेकॉर्डबुक्समध्ये झाली आहे. 'मुंटा'नं यापूर्वीचं दखल घेतलेल्या या विक्रमवीराची ही पाचवी कलाकृती आहे.
कुठलंही चित्र रेखाटण्यासाठी फक्त पेन्सिल, कागद आणि रंग यांचीच आवश्यकता नसते. तर कलात्मक नजर असेल, तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन साकारलं जाऊ शकतं हे दाखवून दिलं चेतन राऊत या कलाकारानं. टाकाऊ वस्तूंच्या वापरातून त्यानं यापूर्वी साकारलेल्या चार कलाकृतींची नोंद विश्वविक्रम म्हणून झाली आहे. आता महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यानं तयार केलेलं नवं पोट्रेटही असंच चर्चेत आहे. ६ फूट लांब आणि ७ फूट रुंद आकाराच्या या मोझॅकची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'युनिक वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे.
२०१७च्या आयआयटी मुंबईच्या 'मूड इंडिगो' या फेस्टिव्हलपासून सुरू झालेला त्याचा हा नाबाद प्रवास अजूनही सुरू आहे. आपली प्रत्येक कलाकृती ही इतरांपेक्षा वेगळी असावी हा चेतनचा प्रयत्न असतो. म्हणूनच यावेळी पंचमुखी रुद्राक्षांचा वापर करण्याचं त्याने ठरवलं. हे मोझॅक कायमस्वरुपी पाहता येणार आहे.
कशी साकारली कलाकृती?
शिवरायांची ही कलाकृती साकारण्यासाठी त्यानं यावेळी मात्र चौदा हजार पंचमुखी रुद्राक्षांचा वापर केला आहे. ही रुद्राक्षं त्यानं खास नेपाळहून आणली आहेत. इतक्या रुद्राक्षांचा वापर केलेलं हे जगातलं पहिलंवहिलं मोझॅक आहे. सलग बहात्तर तासांच्या मेहनतीनंतर ही कलाकृती साकारली गेली. २८ रंग छटा असणाऱ्या या पोट्रेटमध्ये महाराजांच्या चेहऱ्यावर विविध सात रंगांच्या छटांचे बारकावे त्यानं दाखवले आहेत.
जातीयवाद नष्ट करत महाराजांनी जशी स्वराज्याची स्थापना केली, त्याचं प्रतीक म्हणून विविध आकारांच्या रुद्राक्षांचा वापर करत मी हे मोझॅक साकारलं आहे.
चेतन राऊत
कुठे पाहाल ?
१७०१, बि. क्र. ४, श्री साई शिवसाई को. ऑप. सोसा., सेंच्युरी बाजार, क्रोम लेन, प्रभादेवी
चेतनच्या विक्रमी कलाकृती
१. ४,५०० कॅसेट्स वापरून साकारलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोट्रेट
२. ७५,००० हून अधिक सीडीज वापरून साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पोट्रेट
३. ६०,००० पेपर कप वापरून साकारलेल्या राजवाड्याची प्रतिकृती
४. ८७,००० कि-बोर्डच्या बटणांचा वापर करून साकारलेलं ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच पोट्रेट
(वरील चारही कलाकृतींची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे)
चेतनच्या कलाकृतींची दखल यापूर्वी 'मुंटा'नं घेतली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट