Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

तुझीच सेवा करू काय जाणे!

$
0
0

आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा, सेवा करायला सर्वांनाच आवडतं. काही तरुण मंडळी अशी आहेत जे गणेशोत्सवाच्या काळात आपली नोकरी, अभ्यास सांभाळून गणेशपूजा सांगतात. आपल्या हातून गणरायाची एक प्रकारे सेवा घडत असते, अशी त्यांची भावना यामागे आहे. त्यांचे हे अनुभव जाणून घेऊ या.

आगळं समाधान

लहानपणापासून 'गणपती बाप्पा मोरया' हा जयघोष आपण सगळेच करत असतो. गणपती हे आवडतं दैवत असल्यामुळे बाप्पासाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटत असे. त्यातूनच आठवीत असताना गणेशपूजा शिकायचं ठरवलं. राजेंद्र पाठक गुरुजी व यंग स्टार्स ट्रस्ट आयोजित पौरोहित्य वर्गाची यात मला खूप मदत झाली. शाळा आणि अभ्यास सांभाळून गेली तीन वर्ष मी गणेशपूजा सांगतो. दहावीच्या वर्षातदेखील मी दहावीचा अभ्यास सांभाळून गणेशपूजा सांगितल्या होत्या. पूजा सांगताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं.

-सोहम बागडे

नोकरी सांभाळून पूजा

लहानपणापासून मला गणपतीबाप्पाबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळेच गणेशपूजा शिकावी असं वाटलं. गेल्या पाच वर्षांपासून मी गणपतीच्या दिवसांत माझी नोकरी सांभाळून गणेशपूजा सांगतो. मी पहिली पूजा सांगितली तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या प्रसन्न वातावरणात पूजा सांगताना मिळणारी सकारात्मक ऊर्जा मनाला समाधान देऊन जाते.

-पुष्कर पाठक

सेवा घडते

आपल्या आवडत्या गणपतीबाप्पासोबत राहायला मिळतं, तसंच शाळेला देखील सुट्टी मिळते म्हणून लहाणपणी गणेशोत्सव हवाहवासा वाटत असे. मोठा झाल्यावर आपणही गणेशपूजेच्या रुपानं बाप्पाची सेवा करावी असं वाटलं. या विचाराला घरच्यांनी पाठिंबा दिला आणि गेल्या पाच वर्षांपासून मी कॉलेज सांभाळून गणेशपूजा सांगायला लागलो. सध्या मी इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलो, तरीही दरवर्षी आवर्जून गणेशपूजा सांगतो. बाप्पाची यथाशक्ती सेवा केल्यानंतर मिळणारा आनंद खरच अवर्णनीय असतो.

-पुनित पाठक.

पूजेचं आकर्षण

लहानपणापासूनच घरी गणपती येत असल्यामुळे गणेशपूजनाबद्दल आकर्षण होते. त्यामुळे साधारणपणे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असल्यापासून मी गणपतीच्या दिवसांत गणेशपूजा सांगायला लागले. गणेशपूजा सांगताना समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान मनाला खूप आनंद देऊन जातं.

-किरण बागडे.

नातं भक्तीचं

लहानपणापासूनच गणेशोत्सव म्हटलं की माझा आनंद द्विगुणित व्हायचा. तसंच गणपतीबाप्पाशी वेगळंच नातं माझ्या मनात आहे. त्यामुळे गणपतीची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करायची आवड होती. याच उत्साहामुळे आपण देखील गणेशपूजा करावी असं मनात आलं व पूजा शिकून गणेशोत्सवात गणपतीची एक सेवा म्हणून गणेशपूजा सांगायला लागलो. तरुण मुलं यात फार येत नाहीत. पण, ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं. आपण कितीही मॉडर्न झालो तरीही आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा विसरू नये असं मला वाटतं. गणेशोत्सवात गणेशपूजेसोबतच गणेशमूर्ती देखील करत असल्यानं बाप्पाची सेवा घडतेय असं वाटतं.

-हर्षद जानवलकर.

शब्दांकन : केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>