हल्ली प्रत्येकाच्याच हातात मोबाइल असतो. मग तुम्ही घरी असा किंवा बाहेर. अर्थातच, आजच्या लाइफस्टाइलमध्ये ती महत्त्वाची गोष्ट असली; तरी त्यामुळे अनेकदा संभाषणात अडथळे येतात. समोरच्याला किंवा तुम्हालाही एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल आणि समोरची व्यक्ती किंवा आपण स्वतः दुसरीकडेच पाहात असू, तर त्या संभाषणाला काहीच अर्थ उरत नाही. बाहेर या गोष्टीकडे दुर्लक्षही होतं; पण तुम्ही जर घरी किंवा नातेवाईकांसोबत असाल, तर तुम्हाला त्यांच्या बोलण्यात रस नसल्याचं इतरांचं मत होऊन बसतं. त्यातून गैरसमज आणि त्याही पुढे जाऊन त्याचं वाद किंवा भांडणात रूपांतर होतं. या गोष्टी टाळून अर्थपूर्ण संवाद साधणं सहज शक्य आहे. त्यासाठी या गोष्टींचा आवर्जून विचार करा.
लक्षपूर्वक ऐकणं
कोणत्याही संभाषणात वा संवादात समोरची व्यक्ती काय बोलतेय, काय सांगतेय याकडे लक्ष द्या. तसं नसेल तर अनेकदा महत्त्वाचे मुद्दे ऐकण्यातून निसटून जातात. अशावेळी एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला पुन्हा विचारणं योग्य दिसत नाही. म्हणूनच तुम्ही ती व्यक्ती काय सांगतेय, हे लक्ष देऊन ऐका. त्यामुळे तुमच्याशी बोलणं त्या व्यक्तीला निश्चितच ताण हलका करणारं वाटेल. संवादासाठी बोलण्यापूर्वी नीट ऐकणं हीसुद्धा एक कला आहे.
प्रत्येक गोष्टीला दुजोरा नको
तुमचा लाइफ पार्टनर, मित्र, नातेवाईक किंवा इतर कुणी तुमच्याशी एखादी समस्या सांगत करत असेल; तर प्रत्येक वेळी त्याच्या म्हणण्याला नुसता दुजोरा देऊ नका. अशानं तुमचं संभाषण नाटकी होईल. त्या व्यक्तीला तुमच्याकडून एखाद्या समस्येवर उत्तर अपेक्षित असेल तर काय करता येऊ शकेल, याची चर्चा त्या व्यक्तीसोबत करा. जेणेकरून त्याचा ताण हलका होईल. नातेसंबंधांमध्येही ही गोष्ट महत्त्वाची ठरेल.
योग्य निरीक्षण
एखाद्या कार्यक्रमात, चर्चासत्र, पार्टी असो किंवा फॅमिली गेट टुगेदर तुमचं निरीक्षण योग्य असायला हवं. तुमच्याशी संवाद साधणारी व्यक्ती आणि ग्रुपला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, संवादात त्यांची देहबोली कशी आहे, या चर्चेतून काय निष्पन्न होऊ शकेल, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा.
पुढाकार महत्त्वाचा
अनेकदा दोन व्यक्ती किंवा ग्रुप एकत्र असताना, आधी कोण बोलणार याची वाट पाहात बसतात किंवा ग्रुपमध्येही एखादीच व्यक्ती बोलताना दिसते. भाषा आणि शब्द ही माणसासाठी देणगी आहे. त्यामुळे कोणत्याही संभाषणात तुम्हीच पुढाकार घेऊन अधिकाधिक बोलतं व्हा. त्यामुळे समोरची व्यक्तीही तुमच्याशी संवाद साधण्यात रस घेईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट