आयुष्यात प्रत्येकालाच काही तरी वेगळं करण्याची इच्छा असते. पण त्यातील काही मोजकेच डेरिंग करुन भन्नाट क्षेत्रात झेप घेतात. असंच हटके काही तरी करणाऱ्या तरुणांविषयी... ०००० मिमिक्रीची हौस आयटी क्षेत्रात यशस्वी करिअर केल्यानंतर रोहन यादव या तरुणाला काही तरी वेगळं, चौकटीबाहेरचं करण्याचं ध्येय स्वस्थ बसून देत नव्हतं. म्हणून त्यानं टी-शर्ट पेंटिंग, मिमिक्री आणि गायन या स्पर्धांमध्ये भाग घेऊन कलेच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यास सुरुवात केली. शाहरुख खानचा जबरी फॅन असलेला रोहन 'कल हो ना हो' असं म्हणत शिक्षणासोबतच कलेच्या दुनियेत पुरता रंगून गेलाय. शाहरुख खान, सनी देओल, अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि इतर काही कलाकारांची उत्तम मिमिक्री करतो. यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. रोहनला कलेची आवड अगदी लहानपणापासून असली तरी करिअरपुढे कलेला वेळ देता आला नाही. म्हणूनच आता रोहन करिअर आणि कला यातील समतोल योग्यप्रकारे साधतो. कधी टी-शर्ट पेंटिंग करुन तर कधी मिमिक्री करुन लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. ०००० फिजेट स्पिनरवाला रोशन रोशन वदाशेरी या तरुणाला इंटरनेट सर्फिंगची प्रचंड आवड आहे. एकदा डेटा मायनिंग करत असताना बहुतांश भारतीय फिजेट स्पिनरची माहिती मिळवत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. याच संधीचं सोन करत त्यानं एका गुंतवणूकदाराची मदत घेऊन फिजेट स्पिनरचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. भारतात फिजेट स्पिनर एवढं प्रसिद्ध होण्यामागे रोशनचा फार मोठा वाटा आहे. सध्या रोशन शिक्षण घेण्याबरोबरच तीन स्टार्ट अप यशस्वीरित्या चालवत आहे. याशिवाय रोशनला पेटिंगचीही आवड आहे. दोन मिनिटात झटपट पेंटिंग करण्याच्या कौशल्यामुळे रोहननं आतापर्यंत अनेक बक्षिसं मिळवली आहेत. रोशन ऑटोमोबाइल इंजिनीअर असून त्यानं गुगलमधून मशीन लर्निंगमध्ये नॅनो डिग्री मिळवली आहे. त्याशिवाय सध्या तो बीमएसचं शिक्षण घेत आहे. ०००० बोली मिरर लिपीची दररोजच्या शिक्षणापेक्षा काहीतरी वेगळी कला शिकावी या उद्देशाने ठाण्यातील ओंकार मुळ्ये यानं आईकडून 'मिरर लिपी'चं प्रशिक्षण घेतलंय. आर्ट्स क्षेत्रातील पदवी शिक्षण घेताना मिरर लिपीमध्ये ग्रिटिंग बनवण्यास सुरुवात केली. या अनोख्या कलेच्या कक्षा रुंदावत त्यानं आता मिरर लिपीमध्ये पुस्तकं देखील लिहायला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो या ग्रिटिंग कार्डची विक्री करतो. भविष्यात याच कलेमध्ये प्रगती करण्याचा त्याचा मानस आहे. संकलन- शर्वरी तावडे, डहाणूकर कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट