रेस्टॉरंटमधे जाणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही; पण काही ठिकाणचे पदार्थ आपल्याशी बोलतात, त्यांच्यापर्यंत जायला उद्युक्त करतात. तुम्हाला असा अनुभव आलेला नाही? आलाच असेल; पण तुमच्या मेंदूने कदाचित त्याची नोंद घेतली नसेल. पावभाजीची दरवळ जशी तेथपर्यंत खेचून नेते, तसेच एखाद्या रेस्टॉरंटमधे गेल्यावर येणारा सांबाराचा सुगंध दाक्षिणात्य पदार्थांची ऑर्डर द्यायला भाग पाडतो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमधे सुटलेल्या मसाल्यांच्या घमघमाटानेच पंजाबी पदार्थ खावेसे वाटतात.
एकदा स्वादगंधानुभव घ्यायला लागल्यानंतर मी भोवताली असणाऱ्या, स्वयंपाकघरातील नानाविध साहित्याशी संवाद साधू लागलो आणि गंमत म्हणजे, ते पदार्थही माझ्याशी बोलू लागले. अमुक एक करून बघ, असे सुचवू लागले. पक्वान्नात मिठाची कणी घालावी आणि तिखट पदार्थांत साखरेची चिमूट घालावी, हे त्या पदार्थांच्या चवीने तर सांगितले. समोर रव्याचा गोळा होता. तो गरम तेलात किसून घालू लागल्यावर कीस पोह्यांसारखा फुलून वर येऊ लागला आणि झाला की अभिनव चिवडा तयार! माझ्या स्वयंपाकघरातील साहित्य माझ्याशी बोलते, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. एकदा माझ्यासमोर ढोकळ्याचे पीठ होते आणि त्यापासून काहीतरी वेगळे बनवण्याचे आव्हानही होते. ते पीठ समोर घेऊन विचार करू लागलो, तसतसे सुचू लागले. या पिठाचा डोसा बनवू शकतो; पण फक्त डोसा बनविण्यात कसले आले कौशल्य? मग डोशासारखे घालून, त्यावर पनीर किसून, इतर मसाला घातला. आता याचे पुढे काय करायचे, तर रोल करून बघू, म्हणून रोल केला आणि जन्माला आला ढोकळी डोसा रोल.
माझे आपल्या मातीतील जेवणावर आत्यंतिक प्रेम आहे आणि हे अन्न जगापर्यंत पोहोचावे, हा कायमच प्रयत्न असतो. एकदा एका इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी केटरिंग करायची संधी मिळाली. तेव्हा ठरवले, आपली झुणका भाकर त्या परदेशी लोकांना खाऊ घालायचीच. मग काय, परत विचार सुरू झाला. भाकरी आणि झुणका समोर ठेवून त्यांनाच विचारू लागलो, 'बाबांनो या परदेशी लोकांच्या पोटात जाण्यासाठी तुमच्यावर काय संस्कार करू?' त्यांनी सांगितले, 'भाकरीत झुणका भरून रोल कर. छान सॅलडने सजव आणि मस्त रॅप करून सर्व्ह कर.' मी केले आणि आपली झुकणा-भाकर हिट! तुम्ही डॅफोल्डिल्सची फुले बघितली आहेत का? एकाच फुलात दोन/चार रंगांच्या छटा मिरविणारी, बोट लागताच पाकळी गळून पडते की काय, अशी भीती वाटेल एवढ्या त्या नाजूक फुलांनी माझ्या मनात घर केले होते. त्या फुलांचे सौंदर्य मला एखाद्या रेसिपीमधे उतरवायचे होते. याचा मी एवढा ध्यास घेतला होता, की मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी ती इच्छा सतत तेवत होती. एकदा अचानक काहीतरी वेगळे मॉकटेल बनविण्याचे आव्हान आले. मॉकटेल असे, की जे दिसायलाही सुंदर असेल आणि अप्रतिम चवीचा आनंद देईल. मनातील डॅफोल्डिल्सची आठवण अचानक उसळी मारून वर आली. मग खाली इनो घातले, ते फसफसू नये म्हणून त्यावर ऑरेंज मार्मालेड घालून सील करून टाकले, कॅरॅमलच्या भरपूर तारा काढून त्याने ग्लास भरून टाकला. हे झाल्यावर त्यावर थेंब थेंब लेमोनेड टाकू लागलो. जसजसा लेमोनेडचा थेंब आत गेला, तसतसे ते कॅरॅमलला वितळवत इनोपर्यंत पोहोचले आणि त्यातून बुडबुडे येऊ लागले. त्यात तो ऑरेंजचा रंग मिसळला आणि त्यांनी कॅरॅमलच्या तारांना घेरून टाकले. त्यातून जो रंग निर्माण झाला, तो तर अप्रतिम होताच; पण जी गोडसर, कडवट, आंबटसर चव निर्माण झाली, तीही सुंदर होती.
जर माझ्यासमोर असणाऱ्या स्वयंपाकघरातील साहित्याशी संवाद साधला नसता, त्या सगळ्यांना काय सांगायचे आहे, हे ऐकून घेतले नसते, तर मला नाही वाटत हे असे प्रयोग करणे शक्य झाले असते. हा अनुभव प्रत्येक शेफ घेत असेल, हेही खात्रीपूर्वक सांगेन. पाककला जर मला एवढे देत असेल, तर ते मी फक्त माझ्यापुरते ठेवणे गैर वाटते. केटरिंगच्या माध्यमातून आम्ही पाच-पन्नास लोकांपर्यंत पोहोचत होतो हे खरे. तेथेही मला कौशल्य दाखवायला मिळत होते हेही खरे; पण ते शेवटी दुसऱ्याचा कल लक्षात घेऊन रांधले गेलेले असायचे. मला जे समोरच्यापर्यंत पोहोचवावे असे वाटते, ते नसायचे. त्यासाठी पर्याय म्हणजे; केटरिंगप्रमाणे आपण खाणाऱ्यापर्यंत न जाता, आपण जे पदार्थ करू, ते इतरांनी आपल्यापर्यंत येऊन खाल्ले पाहिजेत. त्यासाठी अर्थातच रेस्टॉरंट. आता रेस्टॉरंटही असे हवे, जे तेथे येणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल. तेथील प्रत्येक वस्तू येणाऱ्याच्या स्वागतासाठी तत्पर असेल. आपले तेथे असणे त्यांना पटवून देणारी असेल. यातूनच 'विष्णुजी की रसोई' जन्माला आली. तुम्ही कधी 'रसोई'त आला आहात? नसला आलात तर या आणि खुद्द अनुभव घ्या. तळणीचा छान दरवळच तुमचे स्वागत करेल. तुम्हाला सांगेल, येथे चवीचा उत्तम अनुभव मिळेल!
रेस्टॉरंटमधे जाणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. ना तुमच्यासाठी, ना माझ्यासाठी; पण काही ठिकाणचे पदार्थ आपल्याशी बोलतात, त्यांच्यापर्यंत जायला उद्युक्त करतात. तुम्हाला असा अनुभव आलेला नाही? आलाच असेल; पण तुमच्या मेंदूने कदाचित त्याची नोंद घेतली नसेल. पावभाजीची दरवळ जशी तेथपर्यंत खेचून नेते, तसेच एखाद्या रेस्टॉरंटमधे गेल्यावर येणारा सांबाराचा सुगंध दाक्षिणात्य पदार्थांची ऑर्डर द्यायला भाग पाडतो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमधे सुटलेल्या मसाल्यांच्या घमघमाटानेच पंजाबी पदार्थ खावेसे वाटतात. कदाचित कधी असेही घडले असेल, तुम्ही कसलीशी ऑर्डर देऊन एखाद्या पदार्थाची वाट बघत असाल आणि तेवढ्यात नाकाला झोंबेल अशी खमखमीत दरवळ आणि चुर्र आवाज तुमचे लक्ष वेधून घेत, पुढच्या वेळी काही झाले, तरी सिझलर्स खायचेच याची मनाशी खूणगाठ बांधयला लावतो. पावसाळी हवेत कांदा भज्यांची चव नाही का मनात आपोआप उमटत? तसेच आहे हे. आता कदाचित तुमच्याही लक्षात आले असेल, 'अरे खरेच हे पदार्थ माझ्याशी बोलले आहेत. मलाही त्यांनी आपल्याकडे बोलावले आहे.' असाच संवाद मी रसोईमधील मेन्यू प्लान करताना माझ्या पदार्थांशी साधला. मग त्या त्या पदार्थांनीच त्यांची चव, रंग-रूप एवढेच काय; पण मांडणीदेखील कशी असेल ते मला सांगितले. आता बघा ना, ठेच्याच्या शेजारी गुलाबजाम ठेवला असता, तर तुम्हाला खावेसे वाटले असते? जेवण घ्यायला गेल्या गेल्या आधीच जर गरम पोळी पानात पडली असती, तर ती गरम खाल्ल्याचा आनंद मिळाला असता? नक्कीच नाही. हेच भाज्या वाढून घेतल्यावर जर गरम पोळी पानात पडली, तर डिश घेऊन टेबलपर्यंत जाण्याएवढाही धीर निघवत नाही. खरे तर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येक गृहिणीने हा अनुभव घेतलेला आहे; म्हणून तर घरात सगळे असले, की चार पदार्थ करण्याची, प्रत्येकाच्या पानात गरम पोळी पडेल याची तिची धडपड सुरू असते. तिच्याशी तिचे स्वयंपाकघर बोलत असते. ती स्वयंपाकघराशी बोलत असते.
हे सगळे एवढ्या सहजपणे होते, की तिला ते जाणवतच नसते. मी जेव्हा या गृहिणींशी संवाद साधतो, तेव्हा हे लक्षात येते. म्हणूनच तर माझ्या लाइव्ह रेसिपी शोला येणाऱ्या किंवा टीव्हीवरचा माझा शो बघणाऱ्या कोणीही गृहिणी असोत, त्यांचा प्रतिसाद माझ्यासाठी सगळ्यांत महत्त्वाचा असतो. त्यांना माझ्या रेसिपी आवडणे आणि त्यांनी त्या घरी करून बघणे, हा त्यांच्या-माझ्यातील अबोल संवाद असतो आणि हीच माझ्या यशाची सगळ्यांत मोठी पावती आहे. या गृहिणी माझ्याशी कधीही, कोठेही संवाद साधायला कचरत नाहीत. त्यांना मी परका वाटत नाही, यासारखी दुसरी लोकप्रियता नाही.
सहज आठवले म्हणून सांगावेसे वाटले, एकदा सकाळी सकाळी एका आजींचा पार कोकणातून कोठून तरी फोन आला. इतक्या सकाळी फोन वाजलेला बघून मला कोणीतरी म्हटले देखील, 'तू उगाच लोकांना डोक्यावर चढवून ठेवले आहेस, म्हणूनच वाटेल त्या वेळी फोन करून तुला त्रास द्यायला धजावतात.' त्या आजींनी आपल्या मुलाला हक्काने विचारावे, तसे मला विचारले, 'काही दिवस झाले मी जेवणाच्या ऑर्डरी घ्यायला लागले आहे. आज बिर्याणी करायची आहे पन्नास लोकांसाठी. किती तांदूळ घ्यायचे?' मी खरेच सांगतो, तो दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा होता. मला न ओळखणाऱ्या त्या आजींनी दाखविलेला हा विश्वास साऱ्या मेहनतीचे फळ आहे.
मला पुरस्कार मिळाले, सत्कार झाले, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, आता तर गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमधेही माझ्या नावाची नोंद झाली आहे, तरीही त्या आजींनी जो विश्वासाचा पुरस्कार दिला ना, तो माझ्यासाठी सगळ्यांत मोठा आहे आणि कायम राहील. आत्तापर्यंत कधी असा विचार केला नव्हता; पण या लेखाच्या निमित्ताने जेव्हा विचार करू लागलो, तेव्हा जाणवले, आत्मसंवाद आणि त्यातून येणारे आत्मभान हे माणसाचे आयुष्य बदलून टाकू शकते. आत्तापर्यंत मी नकळतपणे स्वत:शी संवाद साधत होतो. आता एवढे व्यक्त झाल्यावर मात्र जाणीवपूर्वक स्वत:शी संवाद साधेन. माझ्या वागणुकीतील बऱ्या-वाईट तपशिलांचा स्वत:लाच हिशेब देईन, बरे जास्त आणि वाईट कमी करण्याचा नक्कीच कसोशीने प्रयत्नही करेन.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट