नाटक, चित्रपटाच्या तुलनेत मालिकेसाठी दिलेला वेळ आणि काळ जास्त असल्याने, आपण साकारत असलेल्या पात्राशी एकप्रकारची एकरूपता येते. लेखकाने ती व्यक्तिरेखा लिहिली असली, तरी ती प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवताना कलाकाराला ते पात्र आत्मसात करावे लागतेच. ती व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना कविता कोठेतरी डोकावतेच.
नाटकाच्या माध्यमातून ओळख मिळालेली आणि रंगमंचावर काहीशी स्थिरावलेली मी वेगळ्या प्रकारची भूमिका साकारायला मिळते आहे, या कारणामुळे मालिकेकडे वळले. ती मालिका होती, 'चार दिवस सासूचे'. ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली आणि एक कलाकार म्हणून मी घराघरांत पोहोचले. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे काय असते, हे मला या मालिकेमुळे समजले. रस्त्यावरून चालताना अगदी भाजीवालीही तुम्हाला ओळखू लागते. नाटकात जसा समोरच्या प्रेक्षकांचा जिवंत प्रतिसाद मोलाचा असतो, तशी ही लोकप्रियता मालिकेमधूनच मिळू शकते. सुमारे १३ वर्षे ही मालिका चालली. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात ती जणू मैलाचा दगड ठरली.
तत्पूर्वी मी नाटकातच काम केले होते. या दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्याची पद्धत खूप भिन्न आहे. नाटकात अडीच तास तुम्ही तुमचे काम चोख केले की झाले; पण मालिकेसाठी तुम्हाला दिवसाचे १०-१२ तास द्यावे लागतात. एवढा वेळ देऊनही तुमचे प्रत्यक्ष काम काही मिनिटांचेच असते. आम्हाला फक्त कामाचे नाही, तर सेटवर शांतपणे उपस्थित राहण्याचे, संयम राखण्याचेही पैसे मिळत असतात. हे वेळापत्रक तुम्ही कसे जमवून घेता, हे फार महत्त्वाचे असते.
मी रंगभूमीकडून मालिकांकडे वळले; पण मला हे माध्यम कधीही दुय्यम वाटले नाही. मालिका काय करायच्या, असले विचार माझ्या मनात कधी आले नाहीत. मालिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे मला ठामपणे वाटते. मालिका तुम्हाला ओळखच देत नाहीत, तर मास अपील देतात, एक नियमित उत्पन्न देतात, हा सगळा विचार केला असता मी टीव्ही या माध्यमाची आभारी आहे. हल्ली मालिका खूप भरकटतात, लांबवल्या जातात, अशी टीका होते. 'चार दिवस सासूचे'मध्ये सुदैवाने तसे काही झाले नाही. त्यात मी अनुराधा देशमुख हे पात्र साकारले. अनुराधाचे पात्र सुरुवातीला जसे होते, तसेच ते मालिका संपेपर्यंत होते. त्या काळी मालिका भरकटण्याचे प्रकार फारसे व्हायचे नाहीत. त्यानंतर वाहिन्यांची संख्या वाढली, स्पर्धा वाढली आणि टीआरपी रेटिंगचे महत्त्व वाढले. कथेतील एखादा ट्रॅक क्लिक झाला, प्रेक्षकांना आवडला, एखादे दुय्यम फळीतील पात्र प्रेक्षकांची दाद घेऊ लागले, की त्यावर भर दिला जाऊ लागला. एखादा ट्रॅक पसंतीस उतरला नाही की बंद करा, असे होऊ लागले. एक कलाकार म्हणून आपल्या भूमिकेचे कमी-जास्त झालेले वजन पाहून वाईट वाटू शकते; पण हा व्यवसायाचा एक भाग आहे. त्यामुळे उलटही होऊ शकते, तुमचा ट्रॅक अचानक वाढूही शकतो. काही कलाकार हे काय चालले आहे, म्हणून चिडचिड करतानाही मी पाहिले आहेत. या व्यवसायाकडे तटस्थपणे पाहणे आवश्यक आहे. शेवटी हा व्यवसाय आहे, त्याची गणिते सांभाळून असे होणारच, हे लक्षात घेऊन आपापले काम चोखपणे करणे, एवढेच कलाकाराच्या हाती असते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिका करताना नाटक, चित्रपट अशा इतर माध्यमांमध्ये काम करण्याची सवडच मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. एकदा तुम्ही आपल्या आणि निर्मात्यांच्या सोयीनुसार, फायद्यानुसार निर्णय घेऊन मालिका स्वीकारली, की मग त्या अनुषंगाने येणाऱ्या मर्यादाही सहजतेने स्वीकारल्या पाहिजेत. हेही लक्षात घ्यायला हवे, की नाटक करतानाही असे व्यग्र वेळापत्रक होऊ शकते. महिन्याला वीस-वीस प्रयोग लागले, तर इतर गोष्टींसाठी वेळ कसा देता येईल? या सगळ्याचे तुम्हाला व्यवस्थित नियोजन करता आले, सगळे जमवता आले तर चांगलंच आहे, अन्यथा मग तुम्हाला एक पर्याय निवडावा लागतो. तसा पर्याय त्या त्या टप्प्यावरील सोयीनुसार मलासुद्धा निवडावा लागला. माझी मुले लहान होती, तेव्हा नाटक थांबवून मी मालिकेवर लक्ष केंद्रीत केले. मालिका केल्यास अमुक एका ठराविक वेळेला मी रोज घरी येणार आहे, हे मला माहीत होते. नाटकाची तशी खात्री नव्हती. समजा माझ्या मुलाला एखादी लस द्यायची आहे, तर मला त्याच्यासोबत राहायला हवे. अशा वेळी नाटकाचा एखादा दौरा लागल्यास मला उपस्थित राहणे भागच होते. त्याउलट मालिकेचे शूटिंग आपल्या सोयीनुसार करता येण्यासारखे होते. महिन्यातून पंधराच दिवस काम करायचे, हा निर्णय घेणे शक्य होते. हा सगळा विचार करून मी हे माध्यम निवडले. तसे पाहिले, तर प्रत्येक क्षेत्रातील नोकरदार स्त्रीला वेळेचे नियोजन, कसरत करावी लागतेच. माझी आईसुद्धा नोकरी करणारी होती, तिची धावपळही मी पाहिली आहे. उलट मी अशा क्षेत्रात आहे, की त्याचे अधिकचे फायदेही मला मिळतात, ग्लॅमर मिळते. आता माझी दोन्ही मुले सनाया आणि ईशान मोठी झाली आहेत, तेव्हा पुन्हा एकदा नाटकाचा विचार करायला हरकत नाही.
नाटक, चित्रपटाच्या तुलनेत मालिकेसाठी दिलेला वेळ आणि काळ जास्त असल्याने, आपण साकारत असलेल्या पात्राशी एकप्रकारची एकरूपता येते. लेखकाने ती व्यक्तिरेखा लिहिली असली, तरी ती प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवताना कलाकाराला ते पात्र आत्मसात करावे लागतेच. ती व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना कविता कोठेतरी डोकावतेच. त्या पात्राच्या वेशभूषेत, केशभूषेत आणि एकंदरीतच दिसण्यामध्ये तर मी कायम योगदान देत आलेली आहे. मुळात डेली सोप हे रोजचे काम आहे; त्यामुळे तयार व्हायला फार वेळ लागणार नाही, सेटवर पटकन तयार होता येईल, इतपतच त्या व्यक्तिरेखेचा मेकअप, हेअरस्टाइल असावी, अशा मताची मी आहे. रोज अर्धा तास मेकअपला आणि पाऊण तास हेअरस्टाइलला, त्यानंतर शूटिंगला सुरुवात, हे वेळेच्या दृष्टीने न परवडणारे आहे. त्यामुळे कितीही चांगली दिसत असेल, तरी किचकट हेअरस्टाइल टाळलेलीच बरी असते. अर्थात, एखाद्या विशेष प्रसंगाचा अपवाद असू शकतो. शिवाय कोणतीही गृहिणी घरात फार काही वेगळे करत नाही, एखादा क्लचच लावते. कॅमेऱ्याचा विचार करता तो नीटनेटका लावावा, एवढेच. तीच गोष्ट साडीचीही. पिनअप केलेली साडी नेसून घरात वावरणारी स्त्री तशी दुर्मिळच. हे सगळे ध्यानात ठेवून माझ्या व्यक्तिरेखेच्या लूकमध्ये मी लक्ष घालते. निर्मात्यांनीही तशी सूट देऊन तुम्हाला योग्य वाटते ते करा, असे स्वातंत्र्य मला दिले आहे.
'उंच माझा झोका' करतानाचा अनुभव खूप छान होता. विशेषतः भाषा ऐतिहासिक असल्याने तिकडे अधिक लक्ष द्यावे लागले. इतर कोणत्याही भूमिकेसंदर्भात मी कधीही हाती स्क्रीप्ट द्या, असा धोशा लावला नाही. 'उंच माझा झोका' करताना तत्कालीन भाषा अचूक बोलणे, व्यक्त करणे, उच्चार अचूक होणे, याकडे मी कटाक्षाने लक्ष दिले. खूप वर्षे काम केल्यानंतर आता एखादी भूमिका करताना छातीत धडधड होणे, आव्हानात्मक काही वाटणे, यातही वेगळीच मजा आहे. ती या मालिकेच्या निमित्ताने मिळाली.
'मेजवानी परिपूर्ण किचन' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही मी सुमारे सहा वर्षे केले. स्क्रीप्ट नसलेला हा कार्यक्रम करतानाचा अनुभवही खूप छान होता. स्वयंपाक आणि खाणे हा माझा आवडीचा विषय. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समोरच्याला मला बोलते करायचे होते. फाइव्ह स्टार हॉटेलमधील शेफ असो किंवा अगदी गावाकडून आलेली अतिशय साधी गृहिणी असो, त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलते करण्याचे काम मी केले. या काळात महिन्याला ४० एवढे पदार्थ, स्वयंपाकाच्या वेगळ्या पद्धती मी शिकले. ते पदार्थ घरी करूनही पाहायचे. त्यानंतर पुन्हा नेहमीच्या डेली सोपकडे वळले.
डेली सोपमध्ये प्रत्यक्ष वयाच्या मानाने अधिक वयाच्या भूमिका ऑफर होण्याबाबतीतही अनेकदा विचारले जाते; पण एक विशिष्ट वय निघून गेल्यावर तुम्हाला नायिका म्हणून भूमिका मिळतच नाहीत. नायक वयाने कितीही मोठा असला तरी चालतो, नायिका कमी वयाचीच घेतली जाते. अशा वेळी आईच्या भूमिका स्वीकारण्यापलीकडे काही पर्याय नसतो. असे अनेकींच्या बाबतीत घडले आहे. काही वेळेस तर नायक आणि त्याची आई यांच्या वयामध्ये फारसे अंतरही नसते.
प्रत्यक्ष आयुष्यात आई झाल्यावर जाणीवाही बदलतात, वेगळी समज येते. त्यानंतर पडद्यावर आई साकारताना कळत-नकळत आपल्यात बदल होतातच. काही प्रसंगांत आपलाच मुलगा किंवा मुलगी कसे व्यक्त होतील, हा विचार मनात येतो. एक आठवण येथे सांगेन. एकदा आनंद इंगळे आणि मी एक मालिका करत होतो. मालिकेतील माझी मुलगी मला खूप भडाभडा बोलते आणि हे सगळे मी आनंदला सांगत असते, असा तो प्रसंग होता. तो करत असताना एक क्षणी मी खरेच विचारांत अडकले. आनंदने ते लगेच ओळखले. तो म्हणाला, 'तुला असे वाटले ना, की सनायाच तुझ्याशी असे बोलते आहे.' असे अनेकदा होते.
'हिंदीमध्ये काम का करत नाहीस,' अशी अनेकदा विचारणा होते. मला खरे तर आवडेलच करायला; पण मुलांना आणि घराला वेळ देण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्या मराठी इंडस्ट्रीत करणे माझ्यासाठी तुलनेने शक्य होते. आतापर्यंत मी नऊ ते नऊ असेच काम केले, वीकेंडला काम केले नाही, रविवारी मुलांना सुट्टी असल्याने त्या दिवशी अजिबात शूटिंग केले नाही. मराठी इंडस्ट्रीत थोडीफार ओळख असल्याने, मला हे सारे करता आले. हिंदी तुलनेने अधिक व्यग्र इंडस्ट्री आहे. तिकडे आयत्या वेळी बऱ्याच गोष्टी ठरतात. आता कदाचित मला त्यानुसार वेळ देता येईल; त्यामुळे हिंदी मालिका करायला नक्की आवडेल.
'चार दिवस सासूचे'पासून ते सध्या मी करत असलेल्या 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेपर्यंत टेलिव्हिजनचा प्रवास खूप वेगाने झाला. आता खूप वाहिन्या आहेत, खूप मालिका आहेत, कलाकारांना भरपूर कामे आहेत, सगळे व्यग्र आहेत, हे खूप चांगले चित्र आहे. प्रेक्षकांनाही वाहिनी बदलून बदलून हवे ते पाहण्याची संधी आहे. अशावेळी प्रेक्षकांना आवडेल ते देणे, त्यांना खिळवून ठेवणे, टीआरपी राखण्याच्या स्पर्धेत यशस्वी होणे, हे आव्हान वाहिनी आणि निर्माता-दिग्दर्शकापुढे आहे. त्यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, हे कलाकाराच्या हाती आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला आणखी चांगले दिवस येवोत आणि नवनव्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळोत.
(शब्दांकन : श्रद्धा सिदीड)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट