अभ्यास, प्रोजेक्ट्स या नेहमीच्या दिनक्रमामधून वेळ काढून चिल मारण्याचे विविध फंडे शोधण्यासाठी आजकालची तरुणाई नेहमीच प्रयत्न करत असते. सध्याच्या तरुणाईत चिल मारण्याचा एक आगळावेगळा फंडा दिसून येतो. हा फंडा म्हणजे एखाद्या मित्राचा वाढदिवस आणि तो दिवस येण्याच्या काही दिवस आधीपासून सुरु झालेली धम्माल!
ग्रुपमधील प्रत्येकाचा वाढदिवस प्रत्येकालाच माहिती असल्यामुळे त्या मित्र किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाचे प्लॅन्स काही दिवस आधीपासूनच सुरू होतात. यावेळी आपल्या फ्रेंडला कोणत्या प्रकारे सरप्राइज द्यायचं याकडे प्रत्येक मित्र-मैत्रीणीचं लक्ष असतं. तरुणाईचं आवडतं माध्यम असलेल्या सोशल मीडियावर ही सरप्राइज तयारी खूप आधीपासूनच सुरु होते. म्हणजे मित्रमंडळी सोशल मीडियावर 'फोर डेज टू गो...', 'थ्री डेज टू गो...' यासारखे स्टेटस टाकून आपल्या दोस्ताच्या वाढदिवसाची वाट पाहात असतात. सोशल मीडियावरून आपल्या मित्राचे अनेक गमतीशीर फोटोज आणि त्याचे लहानपणीचे फोटोज शोधून ते सेव्ह केले जातात. कधी-कधी तर मिम पेज काढून त्या मित्रावर मिम्स बनवण्याची जय्यत तयारीसुद्धा सुरु होते. हे सर्व प्लॅन्स त्या मित्रापासून लपून करायचे असल्यामुळे मित्रमंडळींची खूप दमछाक होते. सरप्राइज प्लॅनिंग सोपं व्हावं म्हणून बर्थडे असलेल्या मित्राला वगळून बाकीचे मित्र 'फ्यू डेज टू गो...' या नावाचा सिक्रेट ग्रुपदेखील बनवतात. यामध्येसुद्धा ग्रुपमधील चॅट्स गोपनीय राहावे आणि सध्याच्या तरुणाईचं आवडतं अस्त्र असलेले 'स्क्रिनशॉट्स' संबंधित फ्रेंडपर्यंत पोहोचू नये, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. सिक्रेट सांगायचं नव्हतं हे 'इसरून' सिक्रेट सगळ्यांना सांगून टाकणारा एखादा सिक्रेट स्पॉइलर मित्र असेल तर त्याला सिक्रेट लीक करू नको अशी ताकीद वेळीच दिली जाते.
प्री बर्थडे प्लॅनिंगमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे फ्रेंडसाठी कोणतं गिफ्ट घ्यायचं? यासाठी सिक्रेट ग्रुपवर बरीचशी भांडणंदेखील होतात. आपल्या मित्र किंवा मैत्रिणीची आवडनिवड लक्षात घेऊन त्याप्रकारे गिफ्ट काय द्यायचं हे ठरवलं जातं. यामध्ये गिफ्ट्स जास्तीतजास्त अतरंगी आणि हटके कशी असतील हा विचार मात्र नेहमीच केला जातो.
अखेर तो दिवस उजाडतो. नेहमी रात्री ९ वाजल्यापासून 'यार निंद आयी है' असं म्हणणारे मिस्टर गुड नाइट यादिवशी मात्र मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हटकून जागे असतात. रात्री बारा वाजता जल्लोष साऱ्या गावाचा, कारण 'बर्थडे आपल्या भावाचा किंवा मैत्रिणीचा' अशा गमतीशीर कॅप्शन्सखाली आपल्या गमतीशीर फोटोचा स्टॉक हळूहळू बाहेर येतो. मग या फनी फोटोजमुळे त्या मित्राला 'आपला वाढदिवस इतक्या लवकर कशाला आला' हा फील येतो. गमतीशीर फोटोजनंतर त्या फ्रेंडवर बनवलेले विविध मिम्स देखील हळूहळू बाहेर येतात. हे सगळं झालं की, मग 'फायनली अ गुड पिक्चर' असं म्हणत मित्राचा चांगला फोटो देखील सोशल मीडियावर टाकला जातो. याशिवाय 'ॲडमिन भाऊ, आपल्या भावाचा वाढदिवस आहे, ग्रुपचं नाव बदला असं म्हणत सगळ्या ग्रुप्सचं नावदेखील 'हॅपी बर्थडे भाऊ' असं ठेवलं जातं.
बऱ्याचदा ज्याचा वाढदिवस आहे त्याला व्हिडिओ कॉल करून 'साऱ्या गावात तुमची हवा, हॅपी बर्थडे भावा' असं हट के पद्धतीने शुभेच्छाही दिल्या जातात. काही मित्रमंडळी तर ठीक १२ वाजता केक घेऊन आपल्या मित्राच्या घरी टपकतात. याशिवाय ग्रुपमधील काही महाभाग त्यांच्या परिचयाची जितकी सोशल मीडियाची साधनं आहेत त्या सर्वांवर आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. काही ग्रुप्समध्ये तर ज्याचा वाढदिवस आहे त्याला सगळ्यात पहिले शुभेच्छा कोण देणार याची स्पर्धादेखील लागते!
वाढदिवशी मित्राला सरप्राइज गिफ्ट कसं आणि कुठे द्यायचं याचं प्लॅनिंग केलं जातं. कॉलेज असेल तर कॉलेजमध्ये किंवा कॉलेजला सुट्टी असेल तर कोणतं तरी ठिकाण शोधून तिकडे भेटायचं नक्की केलं जातं. यावेळी देखील कोणत्या हॉटेलमध्ये जायचं इथपासून ते किती वाजता जायचं यावर अनेक गमतीशीर वाद होतात. ज्याचा वाढदिवस आहे त्याला संबंधित स्पॉटपर्यंत 'बर्थडे पार्टी आहे' याची कुणकुण लागू न देता पोहोचवलं जातं. 'हाऊज द जोश...हाय सर' असं म्हणत सुरु होते 'मिशन सिक्रेट पार्टी'. या सिक्रेट पार्टीमध्ये ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी मित्रमंडळी आवर्जून स्पेशल केक घेऊन जातात. अशावेळी देखील मित्राच्या आवडीच्या फ्लेवरचा केक शोधण्यापासून ते केकवर मित्राचं गमतीशीर नाव लिहून तो केक सिक्रेटली मित्रापर्यंत घेऊन जाणं या सगळ्यातदेखील एक वेगळीच धमाल असते. केक मित्राच्या तोंडाला फासणं काही जणांना आवडत असलं, तरी बऱ्याच जणांचा या ट्रेंडला विरोध असतो. बऱ्याचदा शाळेतील फ्रेंड्स, कॉलेजमधील फ्रेंड्स असे अनेकविध फ्रेंड सर्कल्स असल्यामुळे ज्याचा वाढदिवस आहे त्याला एकापेक्षा जास्त केक कापावे लागतात. पार्टी झाल्यावर मित्राला खूप चर्चा करून ठरवलेलं गिफ्ट देऊन त्याच्या चेहऱ्यावरील ती 'मिलियन डॉलर स्माइल' बघण्यात देखील वेगळाच आनंद असतो. अखेरीस महत्प्रयासाने ठरवलेली सिक्रेट पार्टी यशस्वी झाल्यानंतर मित्रमंडळी याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणत यानंतर कोणाचा आहे? यावर चर्चा करू लागतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट