मेसेजिंगमुळे आपला भिडू, जिवलग, दोस्त, नातेवाईक अशा सर्वांशी एकाचवेळी आणि तेही २४ तास संपर्कात राहता येतं. त्यात तर शब्द लिहिण्याचे किंवा उच्चारण्याचे कष्टही विविध प्रकारच्या इमोजी किंवा स्मायलींमुळे कमी झाले आहेत. त्यामुळे तुमची भावना, तुमचा मूड समोरच्याला कळण्यासाठी एखादा स्मायली किंवा इमोजीही पुरेसा ठरतो. 'शंभर शब्दांच्या गोष्टीपेक्षा एक चित्र बऱ्याच गोष्टी सांगून जात', असं म्हणतात ना...अगदी तसंच!
सगळ्याचं वयोगटातील लोकांकडून तर चॅटिंग दरम्यान इमोजी, स्मायलीचा वापर अगदी बिनधास्त केला जातो. त्यातल्या त्यात तरुणांकडून थोडा जास्त प्रमाणात होतो. मात्र अनेकांना इमोजी आणि स्मायली हे एकच आहेत असं वाटतं. मग अनेकदा त्याच्या चुकीच्या वापरानं गडबड होण्याची शक्यताही असते. तुमच्या भावना व्यक्त करताना शब्द पुरत नसतील तर इमोजी स्मायालीचा वापर केला जातो. अर्थात हा चॅटिंगचा भन्नाट प्रकार स्मार्टफोन्स आल्यानंतरच खऱ्या अर्थानं रुळला असला तरी एकेकाळी टेक्स्ट मेसेज खूप पाठवले जायचे. त्यातूनच टायपिंग पॅडवरील विविध अक्षरांच्या आणि चिन्हांच्या जुळवाजुळवीने इमोटीकोन तयार केले जायचे. त्यातूनच आनंद, दुख, रडू, सरप्राइज, राग, निराशा आणि एंजल अशा भावना व्यक्त व्हायच्या. पण आता हा प्रकारही कालबाह्य झाला आहे.
मानवी भावनांबरोबरच सेलिब्रेशन, हार्ट ब्रोकन, बुके, खाण्या-पिण्याचे विविध प्रकार, प्राणी, मासे, वेगवेगळ्या गाड्या, रोडसाइंस असे तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त इमोजी आपल्या चॅटबॉक्समध्ये उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा या इमोजीमधील अनेक चेहरे आपल्याला सारखेच वाटतात त्यामुळे कोणत्या वेळी कोणता इमोजी वापरणं योग्य याची मात्र गोची होते. कॉलेजांच्या चॅटग्रुपमध्ये किंवा ऑफिसच्या एखाद्या ग्रुपमध्ये एख्याद्या मेसेजवरील चुकीची इमोजी खूप भारी पडते. एवढी की तो इमोजी वापरणाऱ्याला ग्रुप सोडण्याखेरीज पर्याय उरत नाही. तर अनेकदा यातूनच भन्नाट किस्सेही घडतात.
'परीक्षेच्या काळात ग्रुपवर अनेक महत्त्वाचे मेसेज येतात', असं मत असणाऱ्यांचं ग्रुपवर शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या मनाविरुद्ध जाणारा एखादा मेसेज किंवा पेपरमधील प्रश्न आला तर त्यावर काय व्यक्त व्हावं हाचं प्रश्न अनेकांना पडतो. त्यात त्या ग्रुपमध्ये जर शिक्षक असतील तर काय व्यक्त व्हावं यावर आणि मग इमोजीच्या वापरावर अनेक मर्यादा पडतात. 'अगर ये गाना पेहचानोगे, तो व्हॉट्सअॅप के राजा केहलाओगे', असं म्हणत मेसेजवर आलेला इमोजीचा वापर करून एखादं गाणं किंवा चित्रपटाचं नावं ओळखण्याचा खेळ चॅटिंगमध्ये रंगत आणतो. तर अनेकदा भरपूर इमोजी वापरून तयार केलेली मेसेजची एक ओळ समजून घेण्यात नाकी नऊ येतात हेही तितकंच खरं!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट