Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

फादर्स डे

$
0
0

मनातलं नेमकं हेरतात

कोणत्याही स्पर्धेत वगैरे खेळलेली नसताना, केवळ मला पिस्तुल नेमबाजी करता यावी म्हणून बाबांनी माझ्यासाठी पिस्तूल आणलं होतं. तेव्हा ते आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. पण त्यांनी त्याबद्दल कधी एक शब्दही काढला नाही. नंतर मी प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशी प्रशिक्षकाशी करार करायचं ठरवलं. त्यासाठी एका वर्षासाठी जवळपास ३० ते ४० लाख रुपये खर्च येणार होता. मी घरी हे सांगितलं नव्हतं. पण बाबांनी त्याला विरोध केला नाही. प्रत्येकवेळा त्यांनी कसलीही तक्रार न करता मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. खरं तर आम्ही दोघंही मितभाषी. पण एकमेकांच्या मनातलं नेमकं हेरतो. त्यामुळे मला जे हवं ते देण्यास बाबा नेहमीच तत्पर असतात.

- राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय पिस्तूल नेमबाज

शब्दांचे संस्कार

आजच्या माझ्या शाहिरीचं संपूर्ण श्रेय हे माझ्या वडीलांचं आहे. त्यांच्यामुळेच मी आज शाहीर म्हणून उभा राहिलो आहे. माझे वडील शिवशाहीर सुधीर जाधव यांनी जेव्हा त्यांच्या तरुणपणी शाहिरी सुरू केली तेव्हा त्यांना अनंतर अडचणींना सामोरं जावं लागलं. सुदैवानं माझ्यासमोर त्या अडचणी नव्हत्या. त्यांनी कमावलेली कला नकळत माझ्याकडे सुपूर्द केली. लहानपणापासून मी त्यांचे कार्यक्रम पाहत आलो आहे. त्यांना सादरीकरण करताना पाहतच मी शिकलो. आवाजातले चढ-उतार, गायनापासून ते लिखाणापर्यंत सारं काही. माझ्या वडीलांचं शिक्षण काही फार झालं नाही. त्यामुळे त्यांना लिहिता येत नाही. पण, मी त्यांचे हात झालो आणि ते माझे शब्द. ते शाहिरी रचायचे आणि मी त्या लिहून काढायचो. त्यामुळे शाहिरीतल्या शब्दांचा संस्कार त्यांनी माझ्यावर केला आहे.

- यशवंत जाधव, लोककला कलाकार

काळजी आणि प्रोत्साहन

कॉलेजमध्ये एनसीसीला असताना माझ्या ट्रेकिंगला सुरूवात झाली होती. एक-दोन ट्रेक्सनंतर त्याबद्दल खूप ओढ वाटू लागली. मग ट्रेकिंगवरचं प्रेम इतकं वाढलं, की महिन्यातून दोन-तीन ट्रेक तरी व्हायचेच. सुरुवातीला बाबा वैतागायचे. 'कशाला रे भटकत असतोस, काय मिळतं त्याच्यातून?' असं त्यांचं म्हणणं असायचं. मात्र तरीही ट्रेकला निघालो, की आईला ते नकळत सांगायचे, 'त्याला नीट जायला सांग, सगळं घेतलं का विचार.' नंतर माझंच ट्रेकिंग, क्लाईम्बिंग इतकं वाढलं की एखाद्या महिन्यात कधी जाणं झालं नाही तर तेच स्वतः विचारतात, 'काय रे हल्ली ते ट्रेक वगैरे बंद झाले का?'... यातून त्यांची माझ्याविषयी वाटणारी काळजी आणि माझ्या आवडीला दिलेलं प्रोत्साहन नेहमी दिसून येतं.

- सुधीर जोईल, ट्रेकर

त्यांचा वाटा मोलाचा

प्रत्येक यशस्वी मुलीच्या मागे तिचे वडील खंबीरपणे उभे असतात. माझे वडील म्हणजे माझे गुरू आहेत. वडिलांनी माझ्या बाबतीत केलेला निर्धार आणि त्याच निर्धारानं मला घडवलं. वडील माझ्या पाठिशी होते म्हणून मी आज लष्करात माझं करिअर घडवू शकले. माझ्या वडिलांनी कशालाही न जुमानता, कोणत्याही इतर गोष्टींकडे लक्ष न देता मला नेहमी पाठिंबा दिला. माझा कल कुठे आहे? मला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात घेऊन, 'तू कर, मी आहे' असं ते नेहमी म्हणतात. माझ्या यशस्वी आयुष्यामध्ये मोलाचा वाटा माझ्या वडिलांचा आहे.

डॉ. आश्लेषा तावडे-केळकर, मेजर (निवृत्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>