साक्षी जोशी प्रेमाची व्याख्या, प्रेम करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलत गेल्या. तंत्रज्ञानानं प्रेमालादेखील सोडलं नाही. आभासी जगातही प्रेम मिळू शकतं, असं जाळं सोशल मीडियावर आहे, ते म्हणजे डेटिंग अॅप. प्रियकर किंवा प्रेयसी मिळविण्यासाठी हल्ली लोक या अॅप्सचा वापर करतात. या मार्गातून कदाचित प्रेम मिळेलही; पण ते किती खरं असेल? किती काळ टिकेल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. या अॅप्सची खात्री नसते हे माहीत असूनही, अनेकजण अशा अॅप्सच्या मार्फत बोलतात आणि बऱ्याचदा फसतात. मध्यंतरी एका अनुभवी वकिलांनी व्याख्यानात एक किस्सा सांगितला. साठ वर्षांची बाई सोशल मीडियावरून एका माणसाशी संवाद साधू लागली. त्यानं तिला भेटवस्तू पाठवली आहे, हे कळवलं. त्या आनंदात तिचं सुमारे ६० हजार रुपयांचं नुकसान झालं. असं तुमच्या बाबतीत घडू नये, म्हणून डेटिंग अॅप्स वापरताना या गोष्टी ध्यानात ठेवा... १. डोळस राहा : डेटिंग अॅपवर बोलत असताना खासगी माहिती देणं टाळा. जरा वेळ समोरच्या माणसाला ओळखण्यात घालवा आणि डोळसपणे त्या माणसाचं निरीक्षण करा. काही शंका जाणवली, तर तिच्याकडे चुकूनही कानाडोळा करू नका. लगेचच सावध व्हा. २. मर्यादा ठेवा : या अॅप्सचा वर करताना स्वतःवर मर्यादा ठेवा. ज्या व्यक्तीशी बोलत आहात, त्या व्यक्तीला आधी प्रत्यक्ष भेटा, नीट पारखा आणि हळूहळू विश्वास ठेवा. आपल्या मनाचा ताबा आपल्याकडेच असायला हवा, हे विसरू नका. चुकूनही तो ताबा समोरच्या व्यक्तीकडे गेला, तर आपलंच नुकसान आहे, हे लक्षात असू द्या. ३. शिक्षण महत्त्वाचं : सगळ्यांत आधी आपलं शिक्षण आणि आई-वडील महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. या डेटिंग अॅप्समुळे तरुण पिढीच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अभ्यासात, वागणुकीत फरक पडतो आणि यामुळे केवळ नुकसानच होतं. गंमत म्हणून अशा अॅप्सचा वापर करत असाल, तर त्याचं प्रमाणही तितकंच असावं, याकडे लक्ष द्या. अशा गोष्टींना उगाचच जास्त महत्त्व देऊ नका. ४. हजारात एक : या अॅप्सवर गप्पा मारून, मग भेटून, लग्न झालेलेदेखील आहेत; पण अशांची संख्या बरीच कमी असते. आपल्याबाबतीत सगळं चांगलंच होईल, असा विचार करू नका. बुद्धी शाबूत ठेवूनच या अॅप्सचा वापर करा. ५. खोटेपणा नको : जसं आपल्याला कोणी फसवलं तर त्रास होतो, तसं आपणही कोणाला फसवल्यास त्या व्यक्तीला दुःख होऊ शकतं, हे लक्षात घ्या. कोणालाही तुमची खोटी माहिती देऊ नका. प्रामाणिक राहा. गंमत म्हणून या अॅपवर आला असला, तरी समोरची व्यक्ती कदाचित गांभीर्याने तुमच्यावर प्रेम करत असेल. अशा वेळेस तुम्ही जर कोणाला फसवत असाल, तर तखूप गडबड होऊ शकते. कदाचित कायदेशीर कारवाईही होऊ शकते; त्यामुळे कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. आकर्षण वाटणं हे नैसर्गिक असलं, तरी त्यात शिस्त हवी. सातवी-आठवीतील मुलांशी पालकांनी आधीच चर्चा करून काही विषयांची माहिती द्यायला हवी. मूल संयमानं वागेल, चांगलं-वाईट ओळखायला शिकेल, हे पाहायला हवं. आजकाल पालकांच्या हातात फारसं काही राहिलेलं नाही; पण तरी या गोष्टी त्यांनी करायलाच हव्या. सोशल मीडियावरील वावराचा मानसिक आरोग्यावर भीषण परिणाम होतो, हे मुलांनीही जाणून घ्यायला हवं. - निखिल वाळकीकर, मानसशास्त्रज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट