Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मित्रच गुरू

$
0
0

ज्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारता येतील, ज्यांचा कायम आपल्याला आधार असेल, ज्यांच्यासोबत आयुष्यभर पुरतील अशा सुंदर आठवणी तयार करता येतील, असा एक तरी मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात असावी. बऱ्याचदा जोडीदारापेक्षा मित्र जास्त जवळचे वाटतात. मानसिक आधाराची प्रत्येक माणसाला गरज असते. आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, हे आपल्याला सांगणारं माणूस सोबत असलं, की अडचणी सोडवायला जास्त मदत होते. सोशल मीडियावर फोटो टाकले म्हणजे घट्ट मैत्री आहे, असा भाबडा गैरसमज अनेकांचा असतो. मैत्रीचा नक्की अर्थ काय, हे कमीतकमी ४-५ वर्षं एकत्र घालवल्यावर समजायला लागतं. ठरवून मैत्री कधीच होत नाही. प्रत्यक्ष एकत्र वेळ घालवल्यानं ते नातं हळूहळू धृढ होत जातं. आपल्या आयुष्यात गुरूची भूमिका निभावणाऱ्या मित्राविषयी हे काही मित्र सांगत आहेत...

नि:स्वार्थी

गेली ४-५ वर्षं मुक्ता आणि मी मैत्रिणी आहोत. तिनं मदत केल्याचे अनेक किस्से आहेत. नुकताच माझा अपघात झाला. मी तिला फोन केला आणि ती लगेच आली. मला घेऊन घरी गेली. पायाला तेल लावून दिलं आणि खायला केलं. नि:स्वार्थीपणे दुसऱ्यांना मदत करणं, शांत राहून काम करणं, हे मी तिच्याकडून शिकले. ती अतिशय टापटीप आहे. प्रामाणिकपणे काम करते. तिच्यामुळे माझ्यात खूप चांगले बदल झालेत. आमची मैत्री अशीच अधिकाधिक घट्ट व्हावी, हीच इच्छा आहे.

- प्रणोती हवालदार

घट्ट नातं

गेली चार वर्षं मी आणि श्रेया मैत्रिणी आहोत. श्रेयाशी बोलले नाही, असा एकही दिवस जात नाही. आमच्या घरी, मित्रांमध्ये आमची जोडी खूपच प्रसिद्ध आहे. आमचे विचार खूप जुळतात, आम्ही खूप वेगवेगेळ्या विषयांवर तासनतास चर्चा करतो आणि त्यातून खूप शिकायला मिळतं. मी खूप स्पष्ट बोलते आणि मला खूप पटकन राग येतो; पण शांत राहून परिस्थिती कशी हाताळायची, हे मी श्रेयाकडून शिकले. एखाद्या व्यक्तीचं पटत नसेल, तर सौम्य शब्दात त्या व्यक्तीला कसं सांगायचं, हेही तिनंच शिकवलं. इतक्या वर्षांत आमचं नातं इतकं घट्ट झालंय, की काहीही न बोलता श्रेयाला माझं मत, विचार बरोबर समजतात. श्रेया पुढच्या १० वर्षांनी माझी तितकीच जवळची मैत्रीण असेल, एवढा नक्कीच विश्वास आहे.

- चिन्मयी वर्तक

विचारांना दिशा

अर्चिन शाळेपासून माझा मित्र आहे. शाळा सुटून तीन वर्षं झाली असली, तरी आमची मैत्री तितकीच घट्ट आहे. मर्यादेपलीकडे जाऊन मदत करणाऱ्या अर्चिननं मला आतापर्यंत वेळोवेळी मदत केली आहे. शाळा संपून कॉलेजमध्ये गेल्यावर मी जरा एकटा पडलो होतो. मला एकटं वाटू नये म्हणून अर्चिन तो रोज माझ्या घरी भेटायला यायचा. तो काळही सरला. त्या काळात अर्चिनमुळे मला खूप आधार वाटला. अर्चिनला खूप माहिती असते. तो नवीन नवीन माहिती मिळवत असतो आणि त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारायला, वाद घालायला मला खूप आवडतं. त्यातून माझ्या विचारांना एक दिशा मिळते.

- गंधार साळवेकर

हक्काची मैत्रीण

अगदी लहान असल्यापासून सृष्टी माझी सगळ्यांत जवळची मैत्रीण आहे. ती कोणालाही लवकर माफ करते, ही तिची सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. मलाही ती गोष्ट खूप आवडते. कोणाहीविषयी असलेला राग ती लगेच विसरून जाते. ती कायम माझ्या सोबत असते. आमची खूप भांडणं होतात; पण आम्ही लगेच ते विसरून दुसऱ्या मिनिटाला हसत असतो. माझ्यासाठी कोणाशीही भांडायला ती तयार असते. माझं चुकलं तर, ती हक्कानं ओरडते आणि काही छान घडलं, तर कौतुक करायलाही ती असते.

- मीताली डागा

मित्रासाठी काहीही

चिन्मय पटवर्धन आणि मी चार वर्षं झाले मित्र आहोत. दोघंही नाटकात काम करतो; त्यामुळे नाटक, अभिनय याविषयी खूप चर्चा करतो. तो माझ्यापेक्षा एक वर्षानं लहान असला, तरी त्याच्या कडून खूप शिकायला मिळतं. त्याच्याकडून मिळालेल्या टिप्स मुळे मला राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळालं. नुकतंच आम्ही एका सिनेमात काम केलं. शूटिंग दरम्यान आमची मैत्री आणखीनच घट्ट झाली. अभियातील बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकायला मिळाल्या. त्या सोबत माणूस म्हणूनही तो खूप काही शिकवून जातो. एकदा त्यानं मैत्री केली, की त्या मित्रासाठी तो काहीही करायला तयार असतो, ही माझी त्याच्यातली सर्वांत आवडती गोष्ट आहे.

- चिन्मय संत

(संकलन : साक्षी जोशी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>