Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कुतुहल ते आकर्षण

$
0
0

शालेय वयातच 'गर्लफ्रेंड' किंवा 'बॉयफ्रेंड' असणे किंवा त्याचा विचार करणे, ही बाब पालकांना धक्कादायक वाटते. मुले वयात येण्याचे वय आता कमी झाले आहे, ही बाब सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. 'आमच्या वेळी असे नव्हते,' हे बरोबर असले, तरी आत्ता कसे आहे, याचाही पालकांनी शोध घ्यायला हवा. मुलांवर विश्वास टाकणे, त्यांना हक्काबरोबर कर्तव्यांची जाणीव करून देणे, त्यांना आवश्यक मोकळीक देणे, अशा काही गोष्टी नक्कीच करायला हव्यात.

डॉ. मकरंद ठोंबरे

काही दिवसांपूर्वी इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या पार्थला घेऊन त्याची आई माझ्याकडे आली. पार्थने त्याच्या वर्गातील एका मुलीसाठी प्रेमपत्र लिहिले आहे, एक ग्रीटिंग कार्डही बनवले आहे, असे सांगून ते पत्र आणि कार्ड मला दाखविले. झालेल्या प्रकारामुळे त्या पुरत्या हादरून गेल्या होत्या. बिचारा पार्थ खाली मान घालून समोर बसला होता. अतिशय भांभावून गेला होता. आम्ही महाविद्यालयात जाईपर्यंत अशा कोणत्याही गोष्टी एकतर आम्हाला माहीत नव्हता; पण एवढ्या लहान वयात पार्थ असे कसे करू शकतो, असा त्यांचा सयुक्तिक प्रश्न होता. शाळेत अभ्यास सोडून हे सर्व चालते कसे, येथपासून शिक्षकांचे मुलांकडे अजिबात लक्ष नाही. शाळा-महाविद्यालयांना कसे व्यावसायिक स्वरूप आले आहे, असे त्या वारंवार सांगत होत्या.

पार्थशी बोलल्यावर तो म्हणाला, आमच्या वर्गात अशा अनेक जोड्या आहेत. एवढे दिवस मला कोणीच 'गर्लफ्रेंड' नव्हती; त्यामुळे मी तिला प्रपोज करायचे ठरवले. त्याने त्याचे म्हणणे प्रांजळपणे सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये मुला-मुलींचे परिपक्व होण्याचे शारीरिक वय काही वर्षे अलिकडे आले आहे, असे नक्की दिसून येते. वयात येताना होणारे शारीरिक, मानसिक व लैंगिक बदल पाचवी, सहावीपासूनच दिसू लागतात. पालक मात्र मुलांना खूप लहान समजूनच वागवताना दिसतात. 'आमच्या वेळी असे नव्हते,' ही मनाची पक्की खूणगाठ बांधलेली दिसते. हे होणारे बदल काही वेळा एवढे झपाट्याने होत असतात, की पालक आणि मुलेदेखील त्या बदलांसाठी मानसिक पातळीवर तयार नसतात.

प्रसिद्ध मनोवैज्ञानिक एरीक एरिक्सनने मुलांची वाढ होताना ते वयाच्या कोणकोणत्या टप्प्यावर कोणकोणत्या प्रकारच्या संघर्षांना सामोरे जातात, याविषयी मनोसामाजिक उत्क्रांतीचे टप्पे सांगितले आहेत. त्यानुसार वय वर्षे सहा ते १२ यामध्ये उद्योजगता विरुद्ध न्यूनगंड असा संघर्ष सुरू असतो. त्याचा परिणाम म्हणून ते स्वत:चे अस्तित्व किंवा स्थान मित्र-मैत्रिणींमध्ये किंवा समाजात मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. या काळात त्यांना पालकांनी खूप नियंत्रणात ठेवले, तर ती न्यूनगंडाकडे वाटचाल करू शकतात. त्यांना थोडी मोकळीक दिली, आपण दुरून लक्ष ठेवत मोकळेपणा दिला, त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर ही मुले हळूहळू स्वत:ची योग्यता सिद्ध करू शकतात. काही ठराविक गोष्टींमध्ये धाडस करू शकतात.

वय वर्ष १३ ते १९ यामध्ये मुले स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या काळात त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. स्वत:च्या राहण्यावर, दिसण्यावर ती खूप प्रेम करतात. कोणत्याही गोष्टींकडे लगेच आकर्षित होताना दिसतात. त्यांची स्व प्रतिमा विकसित होताना दिसून येते.

पार्थने जेव्हा त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्याचे ठरविले, त्यावेळी वर्गातील सर्व मुलांना 'गर्लफ्रेंड' आहे मला नाही, हा न्यूनगंडाकडे नेणारा विचार होता. हा विचारच त्याला प्रेमपत्र लिहिण्यासाठी भाग पाडणारा ठरला, हे त्याच्याशी बोलल्यावर लगेचच लक्षात आले. या वयात मुले आकर्षणालाच प्रेम समजत असतात. त्यामध्ये त्यांची काहीच चूक नाही. एकीकडे टीव्ही, सोशल मीडिया, चित्रपटांसारख्या माध्यमांचा होणारा मारा, मनामध्ये असणारे असंख्य प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारे कुतुहल हे अतिशय नैसर्गिक आहे, असे मला वाटते. या वयोगटात आकर्षण, प्रेम, मैत्री यातील पुसट रेषा मुलांना समजावून सांगायला हवी. त्यासाठी पालकांनाही या सर्व होणाऱ्या बदलांची जाणीव व स्वीकार असायला हवा. पुष्कळदा मुलांपेक्षा पालकांनाच समुपदेशनाची जास्त गरज असते.

पालक आणि मुलांमधील नातेसंबंध उत्तम राहण्यासाठी या काही टिप्स :

१. मनमोकळा संवाद : आपल्या मनातील कोणतीही गोष्ट आपण आपल्या पालकांशी बोलू शकतो, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

२. शास्त्री माहिती घेणे आणि देणे : लहान मुलांचे विकसनाचे टप्पे आणि त्यामध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदल यांची योग्य शास्त्रीय माहिती पालकांनी घ्यावी आणि वेळोवेळी ती मुलांना द्यावी.

३. कालानुरूप होणाऱ्या बदलांचा स्वीकार : 'आमच्या वेळी असे नव्हते,' हे मनापासून मान्य करून, गेल्या काही वर्षांत झालेले विज्ञान, तंत्रज्ञान, समाजव्यवस्था, मूल्य यांमध्ये झालेले बदल अभ्यासावेत. त्यांचा स्वीकार करणेही आवश्यक आहे.

४. पाल्याचा विनाशर्त स्वीकार : प्रत्येक मूल हे सर्वार्थाने वेगळे असते. त्याचे दिसणे, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये, त्याच्या क्षमता व कमतरता यासकट पाल्याचा विनाशर्त स्वीकार करता यायला हवा. आपले मूल हे एकमेवाद्वितीय आहे, हे जाणावे.

५. टीका व तुलना टाळावी : मुले मोठी होताना अनेक मनोशारीरिक बदलांना सामोरी जात असतात. पौगंडावस्थेत पाल्याला पालकांच्या मदतीची व आधाराची गरज असते. अनाहुत सल्ले, टीका व तुलना टाळावी. असे केल्यास तुमचे मुलांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण होण्यास मदत होईल.

६. हक्काबरोबरच जबाबदारीची जाणीव : मुलांना नात्यामुळे मिळणाऱ्या हक्कांबरोबर येणाऱ्या जबाबदारीविषयीचे मार्गदर्शन पालकांनी करावे. त्यासाठी स्वत:चे आचरणही वेळोवेळी तपासावे; कारण या वयात मुले अतिशय अनुकरणप्रिय असतात.

७. व्यक्तीस्वातंत्र्याचा सदुपयोग : काही पालक मुलांवर अवाजवी विश्वास टाकताना दिसतात. आपण पाल्यासाठी आवश्यक वेळ देऊ शकत नसल्यामुळे मुलांच्या अवाजवी इच्छा पूर्ण केल्या जातात. एक सर्वत्र दिसणारे उदाहरण घेऊ, सध्या लहान वयातच मुलाला मोबाइल घेऊन दिला जातो. मोबाइल आणि इतर गॅजेट्सचा विवेकाने उपयोग केला जातो आहे का, याची पालकांनी वेळोवेळी खात्री करावी.

मला वाटते, मुले मोठी होताना पाहणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसनातील विविध टप्प्यांच्या अभ्यासपूर्ण आनंद घेणे ही खूपच महत्त्वाची व आनंददायी प्रक्रिया आहे. चला तर मग, त्या प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनून संयम, शिस्त व विनाशर्त प्रेम अगिकारू.

(लेखक कौन्सेलर व मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles