आपले सण अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरे करण्याकडे तरुण मंडळींचा कल वाढतो आहे. रक्षाबंधनाचा सण पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा व्हावा म्हणून मानसी नांगनूरे या तरुणीनं एक वेगळा पर्याय शोधून काढलाय. पर्यावरणाशी नवं नातं रुजवू पाहणारा हा पर्याय नेमका कसा आहे? रसिका पाटील, डहाणूकर कॉलेज कोणतेही सण साजरा करताना तरुण मंडळी पर्यावरणाचं भान राखू लागली आहेत. त्यातूनच नवनव्या कल्पना, उपक्रम पुढे येताहेत. रक्षाबंधनाच्या दिवसानंतरही बहीण-भावाच्या नात्याचं प्रतीक असलेलं रोपटं तुमच्यासोबत कायम राहू शकेल, अशी कल्पना गोरेगावच्या मानसी नांगनूरे या तरुणीच्या डोक्यात आली. त्यानुसार तिनं कागद, दोरा आणि फळांच्या बिया यापासून पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या आहेत. तिच्या या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. मानसी ही जे. के. अकादमी ऑफ आर्ट अँड डिझाइनमध्ये कमर्शिअल आर्ट्स शिकत आहे. आपल्यातल्या कलाकौशल्याचा आणि शिकत असलेल्या अभ्यासाचं एक प्रात्यक्षिक म्हणून तिनं कस्टमाइज्ड इकोफ्रेंडली राख्या तयार करण्याचा निर्णय घेतला. या राख्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'मी पर्यावरणप्रेमी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काही तरी करावं असं माझ्या मनात कित्येक दिवसांपासून होतं. यातूनच पर्यावरणप्रेमी राखीची कल्पना सुचली', असं मानसी सांगते. मानसीनं तयार केलेल्या राख्यांमध्ये कागद आणि दोरा याचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये फळांच्या बियांचाही समावेश करण्यात आला आहे. या राखीमधील बिया कुंडीमध्ये पेरता येऊ शकतात. अशा या इकोफ्रेंडली राखीची किंमत २०० रुपयांपासून आहे. यावर तुम्हाला हव्या त्या नावाची कॅलिग्राफी करून देण्याचीही सोय आहे. राखीमध्ये असलेल्या या बियांचं रूपांतर पुढे भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेल्या एका छानशा रोपट्यात होईल. त्यातून पर्यावरणरक्षणाला हातभार लागेल, अशी आशा मानसीला वाटतेय.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट