Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मानवंदना

$
0
0

कॅथारसिस म्हणजे म्हणजे भावनांचे विरेचन. यात समोरच्याला त्या वाक्यांच्या माध्यमातून आदेश द्यायचे असतात. तो प्रसंग प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभा करायचा असतो. त्यांना त्यात गुंतायला लावायचे, म्हणजे स्वत:ला त्या ठिकाणी गृहीत धरून भावनांचा निचरा होतो आणि त्या प्रसंगाचे गांभीर्य कळते. या मुलांनी कोल्हापूर, सांगली भागातील पुराची परिस्थिती या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवली आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया विचार करायला लावणारी होती.

डॉ. प्राजक्ता कोळपकर

'जोराचा पाऊस सुरू झाला. मुख्याध्यापक बाईंनी शाळा सोडण्याचा आदेश दिला. तुम्ही घरी निघालात जीव मुठीत घेऊन. गुडघाभर पाण्यातून वाट काढत तुम्ही जात आहात. अचानक पावसाने जोर धरला. बघता बघता पावसाच्या पाण्याची पातळी रस्त्यावर वाढायला लागली. तुम्ही कसेबसे घरी गेलात. पावसाचे पाणी एवढे वाढले, की तुमच्या घरांमध्ये शिरले. बसायलासुद्धा जागा नाही. तुमच्या अंगावरचे कपडे ओले झाले आहे. पाऊस वाढतच चालला आहे. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस, चार दिवस, आता तुम्ही पावसात अडकून पडलेला आहात. खायला काहीच नाही. तुम्ही सगळे घरात अडकून पडलेले आहात. घरातील धान्य, वस्तू तुमच्या समोर पाण्याच्या प्रवाहात वाहत चालले आहे. वस्तूंपेक्षा जीव वाचवणे महत्त्वाचे वाटते आहे. आई-बाबांचा सगळा जीव तुमच्यात अडकला आहे. तुमच्या आई-वडिलांची धडपड की तुम्हाला तरी वाचवावे; पण सगळेच हतबल आहेत. बाहेरून येणारी मदत तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचली तरी थोडीथोडकी पोहोचते आहे. आज चार दिवसांनी तुम्ही अन्नाचा दाणा पोटामध्ये ढकललेला आहे. काही जवान तुम्हाला सोडविण्यासाठी आलेले आहे. त्या लाइफ बोटमधून फक्त चार लोकांना नेता येणार आहे. आई-बाबांना वाटते, की मुलांनी जावे आणि तुम्हाला वाटते, की आई-बाबांसोबत जावे. लोकांनी आणि आई-बाबांनी समजावून तुम्हाला त्या बोटीतून बाहेर सुरक्षित स्थळी नेलेले आहे. तुमच्या आई-बाबांसाठी ती बोट पुन्हा गेली आहे; पण दुर्दैव असे, की सगळ्यांचे आईबाबा त्या बोटीने येऊ शकले नाही. नेमके तुमचे आई-बाबा आजही पुरात अडकलेले आहेत. आज सात दिवस झाले. अजून ते आलेले नाहीत. आजूबाजूची गुरेढोरे मरत आहेत, प्राणी मरत आहेत. तुमच्याही कानावर फक्त मरणाऱ्यांचा आकडा येतो आहे. आज दहा दिवस झाले, तुमचे आई-बाबा आलेले नाहीत.'

वर्ग एकदम शांत होता. ही स्तब्धता खूप वेळ होती. सगळ्यांचेच डोळे बंद होते. हळूहळू मला हुंदक्यांचे आवाज आले. पुढचे माझे वाक्य होते, 'ज्यांना राडावेसे वाटते, त्यांनी हवे तेवढे रडून घ्या.' असे म्हणताच सगळ्यांचाच बांध फुटला. मीही दहा मिनिटे शांत होते. रडणाऱ्या कित्येकांच्या पाठीवर मी हात ठेवला. डोक्यावर हात ठेवला. आता रडण्याचा ओघ वाढला. अशीच पुढे गेले. शमिकाच्या डोळ्यात अजिबात पाणी नव्हते; म्हणून मी तिच्याजवळ थांबले नव्हते. खिडकीतून हे सगळे बघणाऱ्या मुख्याध्यापक बाईंनी मला इशारा केला आणि मी शमिकाजवळ गेले. तिने हंबरडाच फोडला. तिने मला घट्ट धरले आणि धाय मोकलून रडली. तिला शांत करता करता चक्क सिक रूममध्ये पाठवावे लागले. मग कळले, तिचा सख्खा चुलत भाऊ या पुरात वाहून गेला.

मी मुलांना ज्याप्रकारे कल्पनाविश्वात नेले होते; त्याला नाटकाच्या भाषेत 'कॅथारसिस' म्हणतात; म्हणजे भावनांचे विरेचन. यात समोरच्याला त्या वाक्यांच्या माध्यमातून आदेश द्यायचे असतात. तो प्रसंग प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभा करायचा असतो. त्यांना त्यात गुंतायला लावायचे, म्हणजे स्वत:ला त्या ठिकाणी गृहीत धरून भावनांचा निचरा होतो आणि त्या प्रसंगाचे गांभीर्य कळते.

मुलांवर हा प्रयोग करण्याचे कारण असे, की सांगली, कोल्हापुरात असलेली सत्य परिस्थिती त्यांच्या मनाला भिडावी. मुलांना जसे मी कथेत गुंतवले, तसे मला कथेतून बाहेर काढणेही गरजेचे होते. तेही अशा प्रकारे शब्दांचा वापर करून. नंतर मुले हसून गडबडा लोळलीही. मुलांना आता माझा पुढचा प्रश्न होता, 'विचार करा. जर असा प्रसंग तुमच्यावर किंवा तुमच्या जवळच्यांवर ओढावला, तर तुम्ही कशी आणि काय मदत करणार? विचार करा.' मुलांना आता स्फुरण चढले होते; त्याहीपेक्षा आपणच या प्रसंगाचे साक्षीदार आहोत, असाच त्या मुलांचा अविर्भाव होता. मुलांनी सुचविलेले सगळेच भन्नाट होते. कुणी म्हणाले, ताई आपण जाऊन तो गाळ काढायला मदत करू शकू. त्यांच्या वस्तू साफ करून देऊ शकू. आपण आपल्या घरातील भांडी, कपडे गोळा करून देऊ शकू. मला अनेक उपाय समजत होते, तेवढ्यात घंटा वाजली. आणखी काय काय सुचते आहे, त्याची यादी करून द्या, असे सांगून मी बाहेर पडणार तोच एक मुलगी माझ्याकडे आली आणि कानात पुटपुटली, 'मॅडम, आपण सॅनिटरी नॅपकिन्स देऊ का?' मी कौतुकाने तिच्याकडे पाहिले. माझे डोळे 'ग्रेट' असे म्हणत असल्याचे तिच्याही लक्षात आले. तिने पटकन जाऊन यादीत सॅनिटरी नॅपकिन लिहण्याचे धाडसही केले. सगळ्यांनी एकमेकांकडे बघून, लाजून प्रतिक्रिया दिल्या. मी हे सगळेच बघत होते. मी ओरडून सांगितले, 'ते कुणीही खोडायचे नाही. फार महत्त्वाचे आहे ते.' मी वर्गाबाहेर गेले. शाळेबाहेर जाईपर्यंत मला तीन पानांची लिस्टही आणून दिली. कॅथारसिसच्या माध्यमातून मी मुलांच्या मनात सांगली, कोल्हापुरातील सद्यस्थिती उतरवू शकले, याचा आनंद झाला.

परवा मुख्यध्यापक बाईंचा फोन आला आणि 'झेंडावंदनाला नक्की शाळेत या,' असा निरोप दिला. कारण न सांगता बोलावल्याने मला अंदाज बांधता येत नव्हता; पण काही महत्त्वाचे असेल म्हणून मी गेले. शाळेत झेंडा वंदन झाले आणि भाषणात बाईंनी पालकांना सांगितले, 'आमच्या मुलांनी पूरग्रस्तांसाठी अनेक वस्तू गोळा करून ठेवल्या आहेत. आकाश तर वसाहतीत फिरून रोज कपडे गोळा करतो. लक्ष्मणची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि या पावसात त्याच्या घरात पाणी घुसल्याने, नववीच्या दहा मुलांनी प्रत्येकी पस्तीस रुपये काढून त्याची अभ्यासाची पुस्तके घेऊन दिली.' टाळ्यांचा कडकडाट झाला. या साऱ्याचे श्रेय मला देण्यात आले. मला ते महत्त्वाचे वाटलेच नाही. महत्वाचे होते ते हे, की एखाद्या घटनेची अनुभूती मुलांना दिल्यानंतर त्याचा अनुभव घेण्यासाठी ते उत्सुक असतात. म्हणून अनुभव महत्त्वाचा. मला दोन मिनिटे बोलायची संधी दिली, तेव्हा आवर्जून मी सांगितले, 'ही पिढी आपल्या पिढीपेक्षा खूप तल्लख आहे. त्यांची समजही चांगली आहे. कदाचित पालक म्हणून आपण त्यांना समजून घेण्यात किंवा समजण्यात कमी पडतो आहोत. माझी नम्र विनंती आहे, की मागच्या पिढीला बदलण्याच्या भानगडीत पडू नका; पुढच्या पिढीला घडावा. यानंतरच्या कित्येक पिढ्या घडवाव्या लागणार नाहीत. या पिढीला भरकटण्यापासून वाचवा. विकसित देशाचे स्वप्न दूर नसेल.'

पालकांनो, या आजच्या पिढीच्या माध्यमातून मी खूप मोठे आणि उज्ज्वल स्वप्न कायम बघते. तुम्हीही बघा. स्वप्न खूप मोठी बघा. मुलांमध्ये रुजवा. सतत त्याचा पाठपुरावा करा. इतिहासातील शौर्याच्या कथा सांगताना, घडलेल्या जिवंत घटना सांगून त्यांच्या जाणिवा जिवंत ठेवा. व्हॉट्सअॅप आणि यू ट्यूबच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष घटना मुलांना दाखवून, त्याची सत्यता पटवून देता येते.

अनेक पालकांशी बोलून शाळेतून बाहेर पडले, तर एक छोटासा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 'मावशी हे माझे खाऊचे पैसे. सांगलीच्या लोकांसाठी मला द्यायचे आहेत.' मी पाकीट उघडले. त्यात बावीस रुपये होते. आई म्हणाली, 'अहो, तो हट्टालाच पेटला आहे. त्याला खाऊसाठी पैसे दिले होते. म्हणतो, आज मी खाऊ नाही खाणार.' मला ते बावीस रुपये बावीस हजारासारखे वाटले. त्याला शाबासकी देऊन, मी फडकलेला तिरंगा दाखवला आणि दोघेही सॅल्यूट करून मोठ्याने ओरडलो, 'भारत माता की जय!'

मला वाटते, त्या तिरंग्याला हीच खरी मानवंदना!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles