\Bअॅड. जाई वैद्य\B प्रश्न : माझे व माझ्या नवऱ्याचे लग्नानंतर कधीच पटले नाही. इतर सर्व परिस्थिती उत्तम असूनही मनाने आम्ही कायमच विभक्त राहिलो. आम्हाला एक मुलगी असून, ती आता मोठी झाली आहे. गेली अनेक वर्षे माझ्या नवऱ्याला एक मैत्रीण आहे. त्यांचे संबंध नुसत्या मैत्रीपलीकडचे आहेत, हे मलाही माहिती होते; पण तसे वरपांगी ते दोघे दाखवत नव्हते व आमचे वैयक्तिक आयुष्य सुरळीत चालू असल्यामुळे मी त्या गोष्टींचा कधी बाऊ केला नाही. आता वयाच्या पन्नाशीला माझा नवरा माझ्याकडे परस्पर संमतीने घटस्फोट मागतो आहे. त्याला त्याच्या मैत्रिणीबरोबर लग्न करून राहायचे आहे. मला आता घटस्फोट नको आहे. तो सध्या त्याच्या मैत्रिणीबरोबर वेगळा राहायला गेला आहे. मी त्याच्याविरुद्ध व्यभिचार केल्याबद्दल काही दावा करू शकते का? उत्तर : भारतीय समाजात स्वतःची स्वतःला ओळख पटण्याअगोदरच लग्न होते. दोन्ही व्यक्ती आपापल्या अनुभवाच्या आणि एकत्रित नात्याच्या क्षेत्रात जसजशा मोठ्या होत जातात, तसतशी त्यांची व्यक्तीमत्त्वेही घडत जातात. त्यामुळे वयाच्या एका टप्प्यावर आपण जोडीदाराशी घेतलेला लग्नाचा निर्णय चुकला, असे लक्षात येते. कधी कधी आपापली आयुष्ये, करिअर करण्याच्या नादात जोडीदारांचे हळूहळू विश्वच बदलत जाते. एका ठरावीक काळानंतर घर, मुले सोडले, तर आपल्यात काहीच बंध उरले नाहीत, याची जाणीव होते. पूर्वी विभक्त व्हावे, दुसरे लग्न करावे असे वाटले, तरी समाज, नातेवाइक, मुले काय म्हणतील अशा लोकभयास्तव सहज घटस्फोटाचा निर्णय घेतला जात नसे. आता जसजसा व्यक्तीवाद वाढत चालला आहे, समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही घटस्फोट घेऊन, दुसरे लग्न करून सन्मानाने जगतानाची उदाहरणे समोर येत आहेत, तसतसे स्वार्थी, अनैतिक अशी स्वतःला दूषणे न देता मनातील विचारांना मूर्तरूप देण्यास सुरुवात होत आहे. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला पतीच्या मैत्रिणीबरोबरच्या नात्याची कल्पना होतीच. तुमचे उर्वरित वैवाहिक आयुष्य जोवर सुरळीत चालू होते, तोवर तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आलात. आताही तुमचे पती त्या मैत्रिणीसोबत वेगळे राहत आहेत, त्याविषयी तुम्ही काही तक्रार केल्याचे किंवा घरातील वरिष्ठ सदस्यांना मध्यस्थी करण्यास सांगितल्याचे तुम्ही म्हटलेले नाही. तुमचा फक्त त्यांनी कायदेशीर विभक्त होण्यास, म्हणजेच घटस्फोट घेण्यास आक्षेप आहे, असे दिसते. तुम्हाला घटस्फोट नको असेल, तर तुमच्या इच्छेविरुद्ध अर्थातच परस्पर सहमतीने घटस्फोट होण्याची शक्यता नाही. अगदी न्यायालयही तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला घटस्फोटास सहमती देण्यास सांगू शकत नाही. तुमच्या परिस्थितीचा योग्य विचार करून, घटस्फोट घेण्याचे वा न घेण्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन, कुटुंबातील इतर वरिष्ठ अनुभवी सदस्यांच्या सल्लामसलतीने निर्णय घ्यावा. अर्थात, तुम्ही घटस्फोटास संमती दिली नाहीत आणि तुमच्या पतीला घटस्फोट हवाच असेल, तर त्याला तुमच्याविरुद्ध घटस्फोटाचा एकतर्फी खटला दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कायद्यात दिलेल्या कारणांचा त्याला आधार घ्यावा लागेल. न्यायालयात साक्षीपुराव्यांवर खटला चालून न्यायालय योग्य तो निर्णय देईलच. तो तुम्हाला वा तुमच्या पतीला मान्य नसला, तर पुढे अपील करण्याचा मार्ग दोघांनाही मोकळा आहे. राहता राहिला प्रश्न व्यभिचाराचा. या कारणास्तव तुम्ही तुमच्याविरुद्ध दाखल झालेल्या घटस्फोटाच्या खटल्याचा प्रतिवाद निश्चितच करू शकाल. सिद्ध झाल्यास घटस्फोट मिळणार नाही कदाचित; पण म्हणून तुमचा नवरा परत येईल आणि तुमचे वैवाहिक आयुष्य पुन्हा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य होईल, हे तुम्हाला जास्त चांगले माहिती आहे. स्वेच्छेने मुक्त किंवा जबाबदारीरहीत शरीरसंबंध ठेवण्याकरता दोन सज्ञान व्यक्तींना पती-पत्नीच्याच नात्यात बांधण्याचा सामाजिक नैतिकतेचा अट्टाहास आहे; कायद्याचा नाही. विशेषतः भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ (व्यभिचार) हा दंडनीय अपराध नसल्याचे सांगितल्यामुळे पती, पत्नी, वा यांपैकी कुणीच कुणावरही या कारणासाठी गुन्हा दाखल करू शकत नाही. व्यभिचार या कारणास्तव घटस्फोट मागता येईल किंवा घटस्फोटाच्या दाव्याचा प्रतिवाद करता येईल. याव्यतिरिक्त तुम्हाला हिंदू दत्तकविधान व पोटगी कायद्याच्या कलम १८ खाली घटस्फोट न घेता, पतीपासून विभक्त राहून पोटगी मागता येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट