परवीना अहंगार यांचे नाव देशाची सीमा ओलांडून परदेशात पोहोचले आहे. काश्मीरची पोलादी स्त्री अशी ओळख असलेल्या परवीना यांचे नाव आता जगातील १०० प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत घेतले गेले आहे. त्या आणि त्यांच्या लढ्याविषयी. सुनीता लोहोकरे जगातील १०० प्रभावी स्त्रियांची यादी बीबीसीने नुकतीच जाहीर केली. या यादीत काश्मीरची 'पोलादी स्त्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परवीना अहंगार यांची निवड झाली आहे. एखाद्या व्यक्तीला एखादा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळतो, म्हणून ती व्यक्ती मोठी असते असे नाही, तर अशी व्यक्ती मोठी असते, म्हणून तिला तो सन्मान दिला जातो. परवीना यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, हे निश्चित. तसे आंतरराष्ट्रीय सन्मान ही त्यांच्यासाठी आता नवी गोष्ट नाही. २०१५मध्ये तर त्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले होते. नॉर्वेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. परवीना यांची कहाणी ही आपल्या हरवलेल्या मुलाची गेली २७ वर्षे वाट पाहणाऱ्या एका आईची कहाणी आहे, आपल्यासारख्याच माता-पित्यांचे अश्रू पुसणाऱ्या एका संस्थेची कहाणी आहे, काश्मीरमधील सामाजिक प्रश्नांना भिडणाऱ्या एका कार्यकर्तीची कहाणी आहे. म्हणूनच ही कहाणी समजावून घ्यायला हवी. परवीनाच्या कहाणीला १९९०मध्ये सुरुवात झाली. तेव्हा ती श्रीनगरमध्ये राहत होती. मुलगा जावेद अहमद १७ वर्षांचा होता. अकरावीत शिकत होता. सर्व काही ठीक आहे, असे वाटत असतानाच १८ ऑगस्टचा दिवस उजाडला. श्रीनगरमधल्या बटमालू भागात लष्कराने छापा घातला आणि जवानांनी जावेदला अटक केली. नंतर तो घरी आलाच नाही. परवीनाने त्याला खूप शोधले. केवळ काश्मीरच नव्हे, तर त्याला राजस्थानात नेल्याची शक्यता असल्याचे ऐकून तिने राजस्थानही पालथा घातला; पण त्याचा कुठेही शोध लागला नाही. आपला मुलगा जिवंत आहे की मृत, हेही तिला माहिती नव्हते. आपला मुलगा कधीतरी परत येईल, असे तिला वाटत असे. लष्कराचे जवान कधी ना कधी त्याची सुटका करतील, अशी आशा तिला होती. तिने पोलिस चौकीच्या बाहेर धरणे धरायला सुरुवात केली. अखेरीस जावेदचा शोध लागला आहे, असे तेथील पोलिस अधीक्षकाने तिला सांगितले. श्रीनगरमधल्या बीबी कँटोन्मेंट रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर, अत्यंत आनंदाने ती त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात गेली. हे रुग्णालय लष्करामार्फतच चालविण्यात येते. तिथे गेल्यावर तिचा मुलगा म्हणून कोणातरी दुसऱ्याच मुलाकडे बोट दाखविण्यात आले. पोलिसांच्या खोटेपणाला ती कंटाळून गेली. पोलिसांकडे फारसे अधिकारच नाहीत, असे तिच्या लक्षात यायला लागले होते. आणखी एक उपाय म्हणून १९९१मध्ये तिने न्यायालयाच्या दरवाजावर थाप दिली. तिच्या मुलाच्या शोधासाठी न्यायालयाने एक समिती स्थापन केली. मुलाला लष्कराचे जवानच घेऊन गेले, हे त्यातून सिद्ध झाले; पण पुढे काय? पुढे काय झाले, ते आजतागायत समजू शकलेले नाही. मुलाला शोधण्यासाठी ती अनेक ठिकाणी गेली. अनेकांना भेटली, अनेक ठिकाणे पालथी घातली; पण काहीही उपयोग झाला नाही. परवीना जेव्हा न्यायालयात सुनावणीसाठी जात असे, तेव्हा तिला तिच्यासारखेच अनेक दुर्दैवी आई-बाप भेटले. कित्येकांची मुले अशाच पद्धतीने गायब झाली होती. काही जण तर पोलिस कोठडीतून बेपत्ता झाली होती. ती लष्कराच्या तळांवर जात असे, सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असे, राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी जात असे. या भेटींदरम्यानही तिला तिच्यासारखेच आशेने आलेले आई-बाप भेटत होते. आपण एकट्या नाही, आपल्यासारखे असंख्य लोक आहेत, हे तिच्या लक्षात येऊ लागले. त्या सगळ्यांना भेटून, त्यांच्या कहाण्या ऐकून आपण काही तरी करायला हवे, असे परवीनाला वाटू लागले. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभारायला हवा, असे वाटू लागले. ती आपल्यासारख्याच आणखी कुटुंबांचा शोध घेऊ लागली. जे भेटत होते, त्यांची नावे, पत्ते लिहून ठेवू लागली. या संबंधात वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे जपून ठेवू लागली. मग ती अशा कुटुंबांना घरी जाऊन भेटू लागली. या प्रयत्नांमधून 'असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ डिसअपिअर्ड पर्सन्स,' या संस्थेची स्थापना झाली. हरवलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या तिच्यासारख्या ५० जणांना बरोबर घेऊन १९९४मध्ये या संस्थेची सुरुवात झाली. मग हे सगळे जण जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाबाहेर उभे राहून लष्कराविरोधात निदर्शने करू लागले, धरणे धरू लागले. त्यांना अटकाव करण्याचे अनेक प्रयत्न झाले; मात्र त्यांचा लढा चालूच राहिला. 'एपीडीपी' संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही संस्था १९८९ पासून बेपत्ता असलेल्या मुलांच्या ठावठिकाण्याचा शोध घेत आहे. आजही दर महिन्याच्या दहा तारखेला श्रीनगरमधील परतब पार्कमध्ये संस्थेचे सदस्य एकत्र येतात आणि आंदोलन करतात. आमची मुले कोठे आहेत, असा प्रश्न विचारतात. गेली २४ वर्षे हा शिरस्ता आहे. आजही ही संस्था अत्यंत तळमळीने काम करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने या संस्थेचे काम सुरू आहे. शांततामय मार्गाने लढा देण्यास बेपत्ता झालेल्या मुलांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम ही संस्था करते. जम्मू-काश्मीरमधील सुमारे आठ हजार ते दहा हजार व्यक्ती अशा पद्धतीने बेपत्ता आहेत, असे परवीना सांगतात. मुलाची वाट पाहण्यात परवीनाचे तारुण्य संपून गेले. आज प्रौढावस्थेत त्या स्वतःच्या मुलाबरोबर अनेकांच्या बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. न्यायाचा शोध घेत आहेत. हा शोध निरंतर असेल, की कधी ना कधी त्यांचे उद्दिष्ट्य साध्य होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे. Sunita.Lohokare@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट