Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

काही शिकले, काही शिकविले

$
0
0

नव्या पिढीच्या भाषेचे काही खरे नाही. त्यांना एकही भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. जपानी कार्टुनमुळे मुले बिघडली आहेत. त्यांना त्या कार्टुनचे वेड लागले आहे. क्लासेसचे तर नाव काढू नका. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी चर्चा, वादंग न करता ती भाषा, ती कार्टुन, ते क्लासेस त्यांच्यावर काय संस्कार करतात, हे पाहायला हवे.

प्रिया जाधव

पाच वर्षांचा अमोघ शाळेतून तणतणतच घरी आला. दप्तर सोफ्यावर टाकून मला शोधायला लागला. मी मुद्दामच समोर न येता, निरीक्षण करू लागले. नुकतीच त्याची शाळा बदलली होती आणि नव्या शाळेत रुळण्यासाठी त्याला थोडा वेळ देण्याची गरज होती; पण 'मम्मी' अशा जोरदार हाकेने मी त्याला सामोरी गेले.

'अमोघ, काय झाले?' त्याला विचारले.

तो म्हणाला, 'मला नाही शिकायचे इंग्रजी.'

मी विचारले, 'तुला असे का वाटते?'

'आपण घरात जी भाषा बोलतो, ती मला सोपी वाटते. मला ती जास्त समजेल आणि मला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही,' त्याने उत्तर दिले.

त्याचे उत्तर ऐकून मी चमकले. त्याच्या म्हणण्यात तथ्य होते आणि त्याला एवढे सगळे कसे समजले, हा प्रश्न पडला. मलाही त्याचे म्हणणे थोड्या वेळासाठी पटले. 'जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही,' हे वाक्य मात्र खटकले. मी त्याला समजाविले, की नवीन भाषा म्हणून इंग्रजीकडे बघण्याचा प्रयत्न कर. त्या भाषेची गंमत समजून घे. त्यानंतर ती भाषा तुला आपल्या मराठी भाषेसारखीच आनंद देईल. मी मदत करेन. तू थोडीशी मेहनत कर. त्यानंतर थोडा वेळ विचार करून स्वारी मेहनत करायला तयार झाली.

मुले किती बारकाईने विचार करत असतात, हे या प्रसंगामुळे मला नव्याने समजले. एक लक्षात आले, की मेहनत करावी लागेल, म्हणून नकार देत होता. आतापासूनच मेहनतीला घाबरत होता. सगळे जेथल्या तेथे मिळत असल्यामुळे त्याला मेहनत नको होती. त्यामुळे तो एक भाषाच नको म्हणत होता. मला ते खटकले आणि त्याला परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.

मुले पार्किंगमध्ये खेळत होती. त्यांचा आवाज वरपर्यंत येत होता. दारावरची बेल वाजली. अमोघ घाईघाईने घरात शिरला. मला म्हणाला, 'पटकन खायला दे. फोनिकच्या क्लासला जायचे आहे.' खेळू दिल्यामुळे स्वारी खुशीत होती. त्यामुळे हात धुवायला सांगितल्यानंतर त्याने निमूटपणे धुतले. जेवत असताना भाताचा थोडासा घास खाली पडला. मी म्हणाले, 'अमोघ, अन्न ही देवता आहे. तुम्ही शाळेत डबा खाताना 'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणता की नाही? खाताना अन्न सांडू नये.' तो म्हणाला, 'मग आपण कशाला खातो अन्न? ते तर देव आहे ना!' मी अवाक् झाले. विचारपूर्वक त्याला म्हणाले, 'जी गोष्ट आपल्याला निरपेक्ष आनंद देते, ती प्रत्येक गोष्ट देव आहे, हे कायम लक्षात ठेव. अन्न आपल्याला ऊर्जा देते की नाही? म्हणजे ते तुला आनंद देते की नाही; म्हणून ते देव. देव माणसातही शोधत जा.' मग हसला. पुढे म्हणाला, 'मम्मी, तो शौर्य बघ ना, एकाच क्लासला जातो. मी दोन क्लास करतो, म्हणजे मी हुशार. हो ना?' मी हसले. त्याला म्हणाले, 'पुन्हा चूक अमोघ. जो जास्त क्लास करतो, त्याला मार्गदर्शनाची जास्त गरज असते. जो कमी क्लास करतो, त्याला मार्गदर्शनाची कमी गरज असते. तेव्हा जो क्लासला न जाता स्वत:चा अभ्यास स्वत: करू शकतो, तो हुशार असतो.'

जेवता जेवता त्याने डोरेमॉन लावले. त्याला विचारले, 'तुला यातील कोण आवडतो? डोरेमॉन, नोबिता, शिझुका, जियान की सुनियो?' स्वारी खुलली. म्हणाला, 'मला डोरेमॅन आवडतो; कारण त्याच्याकडे गॅझेट आहेत. तो नोबिताला मदत करतो. मला नोबिता आवडतो; कारण तो मिळूनमिसळून राहतो. मला जियान नाही आवडत; कारण तो मित्रांना मारत असतो आणि सुनियो फक्त जियानचे ऐकत असतो, म्हणून तोही नाही आवडत मला.' 'सिझुकाचे काय? ती आवडते का तुला,' असे विचारल्यावर तो 'आवडते' असे म्हणाला. 'तुझ्या वर्गातल्या तनिष्कासारखी आहे ना? शिझुका सगळ्यांना मदत करते. हो की नाही?' 'तनिष्काच्या मम्मीला तू भेटून आल्यानंतर तिने मला शाळेत छान स्माइल दिले. ती रविवारी घरी येणार आहे ना आपल्या, मी थांबतो घरी,' असे म्हणत अमोघ क्लासला गेला. जाताना बेडरूममधील लाइट बंद करून गेला आणि म्हणाला, 'आजीने सांगितले आहे.'

आता घरात एकटीच होते. आजचा दिवस वेगळा होता. काही गोष्टी शिकले आणि काही शिकवल्या होत्या. भाषेचे महत्त्व, मेहनतीची गरज, नात्यातील मोकळेपणा, क्लासेसचे महत्त्व या गोष्टी मी त्याला शिकविण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांत असणाऱ्या चांगुलपणावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करायला त्याच्याकडून शिकले.

नव्या पिढीच्या भाषेचे काही खरे नाही. त्यांना एकही भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. जपानी कार्टुनमुळे मुले बिघडली आहेत. त्यांना त्या कार्टुनचे वेड लागले आहे. क्लासेसचे तर नाव काढू नका. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी चर्चा, वादंग न करता ती भाषा, ती कार्टुन, ते क्लासेस त्यांच्यावर काय संस्कार करतात, हे पाहायला हवे. भाषा, कार्टुन्स आणि क्लास या गोष्टी आपली मुले घडविण्यामध्ये काय योगदान देतात, याकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी गरज आहे शेअरिंगची. आपला पाल्य आपल्याशी जास्तीत जास्त गोष्टी कशा बोलेल, हे पाहावे. कोणत्या भाषेत तो सगळे सांगतो आहे, हे महत्त्वाचे नसून काय सांगतो आहे, किती सांगतो आहे, हे पालक म्हणून महत्त्वाचे आहे. यातूनच आपल्यालाही नक्की काहीतरी उमजेल, काहीतरी गवसेल.

पुढच्या पिढीवर आपले आदर्श न थोपवता, त्यांचे आदर्श लक्षात घेऊन त्याप्रमाणे घडविता आले, तर तसेही करायला हरकत नाही!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>