शुक्रवारच्या कहाणीत 'उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको' असे स्त्रियांना उद्देशून सांगणे असते. हा वसा घ्यायचा आत्मउद्धाराचा. गौतम बुद्धांनी दाखविलेल्या 'अत्त दीपो भव' या मार्गाचा. दुसऱ्यावर विसंबून राहण्याऐवजी स्वत:च प्रकाशमान व्हा, स्वत:ची प्रेरणा स्वत: बना. आत्मभान जागे करून, सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून, स्वत:तील गुणांवर अधिकाधिक मेहनत घेऊन वाटचाल केल्यास जगणे अधिक सुंदर होऊ शकते. ऋता पंडित दोन आठवड्यापूर्वी अचानक 'शूटर दादी प्रकाशी तोमर' यांना भेटण्याची संधी मिळाली. शूटर दादी प्रकाशी आणि चंद्रू तोमर यांच्याबद्दल पूर्वी थोडेफार वर्तमानपत्रांतून, इंटरनेटवर काही वाचले होते; पण तितकेसे माहिती नव्हते. काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट 'सांड की आँख' बघितला आणि या 'शूटर दादी' कोण, हे नीटपणे कळले. उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात राहणाऱ्या या दादींनी वयाची साठी ओलांडल्यावर 'शार्प शूटिंग' सुरू केले आणि भारतातील अनेक स्पर्धांतून गोल्ड मेडल मिळविले. दादी प्रकाशी तोमर आज ८४ वर्षांच्या आहेत. त्यांची प्रकट मुलाखत ऐकताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, एक त्यांची अफलातून विनोदबुद्धी आणि दुसरे म्हणजे जीवन जगण्याची ऊर्मी. सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून, 'अपनी जिंदगी में कुछ करो', असे सांगणारी ही 'चिरतरुण' आजी माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी ठरली तर नवल नाही. परिस्थितीला, समाजाला, कुटुंबाला किंवा अजून कशाला तरी शरण जाऊन, हार मानून जगणे, की समोर आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करून पुढे जाणे, हा निर्णय ज्याचा तो घेतो. तोमर दादींनी हार मानली नाही. वयाची साठ वर्षे त्या एक सामान्य महिला म्हणून जगल्या; पण संधी मिळताच त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अडथळे आले. त्यावर त्या मात करत गेल्या. आपल्या प्रगतीतील सर्वांत मोठा अडथळा हा आपल्या मनातील विचारांचा असतो. इच्छा भरारी घेत असतात; पण मन, बुद्धी खाली खेचत राहते. 'नको, कशाला, कोण काय म्हणेल, मला जमेल का? मी अपयशी झाले तर?' असे अनेक प्रश्न वादळाप्रमाणे घोंगावत राहतात आणि विचार कृतीत येत नाहीत. विचार कृतीत आल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग तीच अपुरेपणाची खंत मनात दाटून राहते. स्वत:वर आणि जगावर आपण रुसतो. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता, 'चिऊताईसाठी गाणे', यात चिऊताई जगावर रुसली आहे, चिडली आहे; पण कवी तिची समजूत काढतो आहे, 'दार असं लावून, जगावरती कावून किती वेळ आत बसशील? आपलं मन आपणच खात बसशील?' कवी अगदी कळवळून चिऊताईला समजावतो आहे; कारण चिऊताई म्हटले, की धिटुकली पिटुकली, इतके तिकडे स्वछंद बागडणारी, चिऊ चिऊ करणारी, नुसते तिच्याकडे बघितले तरी आपल्या ओठावर हसू उमटवणारी, अशीच डोळ्यासमोर येते. हा चैतन्याने भरलेला चिमुकला जीव नाराज, उदास होऊन बसला आणि कवी अस्वस्थ झाला. 'मोकळा श्वास घ्यायलाच हवा, वारा आत यायलाच हवा. दार बंद करून कसं गं चालेल चिमणे, एकच आयुष्य आहे, ते एकदाच जगायचे आहे.' कवी चिऊला विनवतो आहे; पण तिचे दार घट्ट बंद आहे, 'डोळे असून अंध' आहे. जोपर्यंत चिऊताई स्वत: दार उघडत नाही, तोपर्यंत तिच्यापर्यंत कोणी पोहचू शकत नाही. आहे त्या परिस्थितीतून अधिक चांगल्या परिस्थितीत जाण्याचा निर्णय आधी तिचा तिला स्वत:शी घ्यावा लागेल. परिस्थिती आपणहून बदलणार नाही, ती बदलण्याचा प्रयत्न चिऊला करावा लागेल. वर्षाचा लेखाजोखा या वर्षात अनेक घडामोडी घडल्या, काही आश्वासक तर काही दु:खद. जगाच्या पटलावर विचार केला, तर आजही स्त्रियांची परिस्थिती खूपशी बदललेली नाही. नवीन पिढी एकीकडे तंत्रज्ञानाला सरावली आहे आणि दुसरीकडे भावनिक, वैचारिक जडणघडण होण्याचे मार्ग आणि पद्धती बदलल्या आहेत. स्त्रीच्या, एक आई, पत्नी, सासू, वर्किंग वुमन आणि इतर भूमिकांचे निकष बदलत आहेत. काल जे अस्वीकार्ह होते ते आज (कधी कधी नाईलाजाने का होईना) स्वीकारले जात आहे. स्त्रियांची फक्त खाली मान घालून ऐकून घेण्याची मानसिकता बदलली आहे. तरुण मुलगे-मुली स्वत:च्या निवडीबद्दल आणि निर्णयांबद्दल अधिक जागरुक आणि ठाम आहेत. समाजमान्य योग्य-अयोग्य काय यात न पडता, 'माझ्यासाठी काय योग्य आणि अयोग्य हे मी ठरवते/ठरवतो', असे म्हणणाऱ्या मुलगे-मुलींची संख्या वाढते आहे. पूर्वी योग्य वाटणारी जीवनमूल्ये आजच्या तरुण-तरुणींना तितकी मूल्यवान वाटतील असे नाही आणि त्यामुळे आजच्या तरुण-तरुणींच्या वागण्या-बोलण्यावर नकारात्मक मत व्यक्त करणे, त्यांच्यावर ताशेरे ओढणे हे कितपत बरोबर आहे, हे विचारण्याची वेळ आलेली आहे. चांगल्या-वाईट अनेक स्थित्यंतरातून समाज, समाजमन जात असते. यातून ढवळून निघाल्यावर नेमके काय चांगले हे कळायला, वर यायला वेळ द्यावा लागतो. तो वेळ आपण सर्वांनी स्त्रियांना, विशेषतः तरुण मुलींना दिला पाहिजे. मागील पानावरून पुढे मागील पानावरून पुढे आयुष्य सुरूच राहील, २०१९ हे वर्ष सरले, तशीच पुढची सरतील; पण एक माणूस म्हणून आपली जडणघडण, प्रगती करण्याची एक संधी आपण घालवली, असे आपल्याला वाटायला नको असेल, तर येणारे वर्ष कसे असेल, याचा विचार आताच करायला हवा. काय नवीन शिकता येईल, काय करता येईल, हे ठरवावे लागेल आणि ठरवलेले कृतीत आणण्याचे धोरण, मार्ग आखावा लागेल. काय केल्याने माझे मन (भावना), माझे शरीर, माझी बुद्धी (विचारक्षमता) आणि माझा आत्मा अधिक समृद्ध होईल, असे प्रश्न स्वत:ला विचारले, अनुभवी मार्गदर्शकांची मदत घेतली, तर पुढचे २०२० वर्ष आपल्या आयुष्यातील मैलाचा दगड निश्चितच ठरेल. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,' हे पुढल्या वर्षाचे ब्रीदवाक्य ठरवू या. उतू नको मातू नको शुक्रवारच्या कहाणीत शेवटी 'उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको' असे स्त्रियांना उद्देशून सांगणे असते. हा वसा कशाचा घ्यायचा? आधुनिक स्त्री चूल आणि मूल यापलीकडे स्वत:चा शोध घेते आहे. कुटुंब हा तिच्या जीवनाचा एकमेव केंद्रबिंदू असेल, असे नाही. ती स्वत:ची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जडणघडण करण्यासाठी अधिक आग्रही असेल, यात वावगे नाही. स्वत:ची जडण घडण करताना ती प्रस्थापित मूल्यांपासून दूर जाईल; पण तो तिचा निर्णय असेल. कदाचित तसे केल्याने नवीन जीवनशैली आकारास येईल आणि ती जीवनशैली त्या व्यक्तीला पसंत असेल. व्यक्ती स्वातंत्र्याची परिसीमा गाठली जाईल, सर्व बंधने झुगारून मनासारखे जगण्याकडे ओढ वाढेल. होईल तितके टोक गाठले जाईल आणि सारे काही करून सवरून झाले, की स्वत:ला काय नेमके हवे, स्वत:चे भले कशात आहे ते कळू लागेल. असे करताना कदाचित खूप काहीतरी किंमत चुकवायला लागणार नाही, याचे भान ठेवावे लागेल. उतायचे नाही, मातायचे नाही, असा हा वसा कसला घ्यायचा? हा वसा घ्यायचा आत्मउद्धाराचा. गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते, 'आत्म दीपो भव' (अत्त दीपो भव). अर्थात दुसऱ्यावर विसंबून राहण्याऐवजी स्वत:च प्रकाशमान व्हा, स्वत:ची प्रेरणा स्वत: बना. आत्मभान जागे करून, सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून, स्वत:तील गुणांवर अधिकाधिक मेहनत घेऊन वाटचाल केल्यास जगणे अधिक सुंदर होऊ शकते. 'मी कोण आहे आणि मी काय करू शकते/ शकतो?' या प्रश्नाचे उत्तर आत्मशोधात व आत्मबोधात आहे. म्हणूनच पुनश्च एकवार 'आत्म दीपो भव' आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट