समाजातील वैचारिक स्तरात अशी सहजता आली, भाव भावनांचा, कृतीचा विचार नैतिक, अनैतिक, व्यभिचारी, सालस, अशा कुठल्याही 'लेबल' विरहित झाला, तर आपणच निर्माण केलेल्या या समाजात आपण निरोगी, रसरशीत अशा स्वातंत्र्यात आनंदाने जगू. प्रा. डॉ. अपर्णा महाजन मध्यंतरी माझ्या वाचनात 'मिस्चीफ' नावाची एक इंग्रजी कथा आली. त्या कथेमध्ये दोन जोडपी एकमेकांचे चांगले मित्र असतात आणि एका पार्टीला ते एकत्र येतात. एका मित्राची बायको आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडते. अर्धा संसार झाल्यावर आलेल्या अशा अनुभवाने तिला गंमत वाटते. स्वतःचे एक गुपित आहे, या कल्पनेनेच तिच्या मनातील चोरकप्पा आनंदून जातो. नवऱ्यापुढे मुद्दाम त्याचे उघडपणे नाव घेताना, तिच्या मनात चोरटा आनंद वाटतो. एका वळणावर तो प्रियकर मित्र तिला म्हणतो, 'आता पुढे जायला नको. येथेच थांबवू ही 'मिस्चीफ'.' येथून पुढे सुरू होतो नात्यातील सिलसिला. तिच्या मनाची ओढाताण. पन्नाशीनंतर ते पुन्हा भेटतात, परिपक्वतेने गप्पा मारतात, प्रेमही करतात; पण ती निघून जाते, त्यांना न सांगता. या कथेवर माझ्या काही मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा झाली. काही जणांनी सरळसोटपणे या पात्रांना व्यभिचारी ठरवले, काही जण अनैतिकता म्हणाले. माझ्या मनात आले, या व्यभिचाराची, अनैतिकतेची व्याख्या काय? एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक अथवा भावनिक पातळीवर दुखावून, आपला आनंद, सुख, विकृती लादून केलेले कृत्य म्हणजे व्यभिचार. आपल्या अवतीभोवतीच्या, प्रचलित केलेल्या किंवा असलेल्या, सामाजिक, जातीय, कर्मकांड, धर्माधिष्ठित मते, आचार आणि विचार यांच्या विविध पातळ्यांवरच्या, स्तरांच्या कुठल्याही थराला छेद दिला, की चार लोकांचा, चेहराविरहित समाज त्याला अनैतिक किंवा व्यभिचारी ठरवतो. याचे स्वरूप कमीअधिक असते. उदाहरणार्थ, आदर पातळीवरचा विचार. यामध्ये आदर असण्यापेक्षा तो दाखविण्यावर भर. नवऱ्याला, वडिलांना एकेरी हाक मारणे, हे कोणाला तरी पातळी सोडूनचे वर्तन वाटते. त्याची दुसरी बाजू समजून, कळून घेण्याची तयारी नसते. एकेरीमध्येही प्रेम, आपुलकी, आपलेपणा आहे, हे समजून घेणे किंवा जे असे बोलतात त्यांना मुभा देणे. त्याला कोणतेच 'लेबल' न लावणे, काहींना मान्य होत नाही. किंवा अगदी 'आमच्यात' भाजीत गुळ घालतात/ घालत नाहीत, यातून जाणवणारी/ दर्शविली जाणारी भिन्नता, दररोजच्या दिनक्रमात असणारी कर्मकांडे, समाजात असे केले जाते म्हणून तसे गपगुमान करणारी, अशा वेगवेगळ्या लहानमोठ्या चौकटींमध्ये सगळ्यांची आयुष्येच नव्हे, तर मनेदेखील अडकवून ठेवली आहेत. आपल्याला वाटणारा, हवा असणारा मोकळेपणा, स्वातंत्र्य आणि बंधनहीन आयुष्य कोणाला नको असेल? हो म्हणायची भीती वाटली, तरी ते प्रत्येकाला हवे असते. बंधन कुठे घालायचे, याची वैचारिक समज असणे आवश्यक आहे आणि त्या त्या नात्यातील सौंदर्य जोपासता आले पाहिजे. त्यासाठी विचारांची बैठक पाहिजे. मनात आले आणि केले, असा स्वैराचार नको. आपल्याला पाहिजे असणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावा असे वाटणे, हे निश्चितपणे नैसर्गिक आहे. अमुक असे वर्तन तथाकथित संस्कृतीत न बसणारे आहे असे ठरवून, हल्लीच्या भाषेत त्या व्यक्तीला 'ट्रोल' केले जाते. आपला उद्योग, काम सोडून कुचाळकीच्या पातळीवर त्याचे चर्वित चर्वण होऊन, त्या व्यक्तीला मोकळेपणाचे भय वाटायला लावणे, अस्वस्थ करणे हा त्यामागील निव्वळ हेतू. दृश्य-अदृश्यपणे त्या व्यक्तीला पीडित केले जाते. असे करण्यामागे कदाचित असूया, द्वेष, दबलेपणा, भीती, जुलूम, शिस्तीचा बडगा आणि घराची संस्कृती अशा छटांच्या अनेक भावना असतील. मलाही असा मोकळेपणा मिळाला तर, हा विचार मनातून असतोच. समाज, त्याला चेहरा नाही; पण जिभा असंख्य! अशा समाजातील आपण अशा गोष्टींना चारचौघांदेखत नावे ठेवतो. मनातून पटणाऱ्या, आवडणाऱ्या, हव्या वाटणाऱ्या विचारांपेक्षा प्रतिसाद वेगळाच, अगदी पूर्ण विरोधीसुद्धा. संस्कार म्हणजे तुम्हा-आम्हासारख्या माणसांनी शिस्तीसाठी तयार केलेल्या नियमांचे पालन. त्या बाहेरचे वर्तन किंवा विचार म्हणजे अनैतिकता. म्हणजेच नैतिक, अनैतिक या सामाजिक संकल्पना. जसे, सामाजिक शिस्तीसाठी, समाजानेच लग्नसंस्था अस्तित्वात आणली. त्या बरोबर कोणाच्या हाती सत्ता, तर कोणाच्या गळ्यात गुलामीच्या दोऱ्या आल्या आणि चार भिंतींच्या आत घुसमट होऊ लागली. विचार करणाऱ्या नव्या पिढीने हे पहिले आणि 'लिव्ह इन' नातेसंबंध अधिक प्रचलित होऊ लागले. लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम, मोह, आकर्षण, लोभ वाटणे हे स्वाभाविक न समजल्यामुळे, त्यात चोरटेपणा आला. 'मिस्चीफ' करण्याचा मोह वाटू लागला. समाजाचा राजदंड असे वाटण्यापासून दूर ठेवू लागला, त्यावर बांध टाकू लागला; कारण ते अनैतिक समजले जाऊ लागले. त्याला व्यभिचार समजले जाऊ लागले. नजर ठेवलेल्या, कर्मकांडांत गुरफटलेल्या संस्कृतीच्या संकल्पनेत करकचून बांधलेल्या बंधनांमुळे, चोरून, लपूनछपून, हिंसेने किंवा बळजबरीने लादलेल्या नीतिमूल्यांची बंधने तोडण्याचा मोह स्वाभाविकपणे होऊ लागला आणि खऱ्या अर्थाने व्यभिचार बोकाळला. दाबून ठेवलेल्या वृत्तींना योग्य उत्तर मिळाले नाही, म्हणून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत मुला-मुलींवर बलात्कार, विनयभंग किंवा इतर विकृत वृत्ती बळावल्या. 'आपली संस्कृती' हा शब्द जरी सर्वसमावेशक वाटत असला, तरी प्रत्येक, अगदी प्रत्येक व्यक्तीची त्या संस्कृतीची जाणीव, आकलन आणि त्यानुसार वर्तन हे वेगळे असते. एकदा एका नाटकाची रंगीत तालीम होती. सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक ते नाटक पाहायला आणि त्यात वाटले तर बदल सुचवायला आले होते. एक प्रसंग होता, की नवरा-बायकोमध्ये काही ताण होता, बायको रडत होती आणि नवरा तिची समजूत घालायला पाठीवर, दंडावर धपाधप थोपटत होता. हे दृश्य पाहून दिग्दर्शक म्हणाले, 'जरा हळूवार असू दे हे थोपटणे.' त्यावर तो म्हणाला, 'खरे वाटायला नको का? असे कुठे असते आपल्या घरात?' या संभाषणावरून आपल्या लक्षात येते, की ती त्याची संस्कृती होती. एका घरातील सख्ख्या भावंडांमध्येही स्वतंत्र संस्कृती असते. विल्यम वर्डस्वर्थ आपल्या 'द वर्ल्ड इज टू मच विथ अस' या कवितेमध्ये सांगतो, की आपले जग हे फक्त देवाणघेवाणीपुरते मर्यादित झाले आहे. माणूस निसर्गापासून लांब चालला आहे. समाजाच्या त्याच त्याच घोळलेल्या नीतिमूल्यांत अडकल्यामुळे निसर्गाचे भान तो गमावून बसला आहे आणि खऱ्याखुऱ्या आनंदाला पारखा झाला आहे. अशा माणसांच्या बजबजपुरी झालेल्या आजूबाजूच्या समाजापेक्षा, मला निसर्गातील एक होऊन जगण्याचा निर्भेळ आनंद घ्यायला आवडेल; नव्हे मला 'निसर्ग' म्हणूनच राहायला आवडेल. समाजातील वैचारिक स्तरात अशी सहजता आली, भाव भावनांचा, कृतीचा विचार नैतिक, अनैतिक, व्यभिचारी, सालस, अशा कुठल्याही 'लेबल' विरहित झाला, तर आपणच निर्माण केलेल्या या समाजात आपण निरोगी, रसरशीत अशा स्वातंत्र्यात आनंदाने जगू, असा मला विश्वास वाटतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट