टीम मैफल आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकालाच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते; परंतु आरोग्य तपासणी हे बहुतांश महिलांच्या प्राधान्यक्रमातील शेवटचे काम असते. जोपर्यंत पूर्णपणे आजारी पडत नाही तोपर्यंत कोणीही डॉक्टरकडे जाण्यास तयार नसतो. वयाची ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर मात्र महिलांनी आरोग्य चाचण्या नियमितपणे केल्या पाहिजेत. त्यामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या शारीरिक समस्यांवर वेळीच नियंत्रण मिळवता येईल. पॅप स्मिअर टेस्ट ३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी पॅप स्मिअर टेस्ट चाचणी करणे गरजेचे आहे. नियमित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांनी तर ही चाचणी केलीच पाहिजे, असे महिलारोग तज्ज्ञ डॉक्टर अदिती शर्मा सांगतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन वर्षांतून एकदा तरी ही चाचणी केली पाहिजे. पॅप स्मिअर टेस्टमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत वेळीच माहिती होऊ शकते. याशिवाय गर्भाशय सुस्थितीत आहे अथवा नाही, हेही स्पष्ट होते. ही चाचणी केल्यानंतर गर्भाशयाच्या पेशींमध्ये काही बदल दिसले, तर ती पुन्हा करावी लागू शकते. ही चाचणी उशिरा केल्यास गर्भाशयाचा कॅन्सरने विशिष्ट टप्पा ओलांडल्याची उदाहरणेही दिसून येतात. मागील पाच वर्षांत जगभरात गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण सहा ते सात टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, २०१२मध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे भारतात एक लाख ९० हजार महिलांचा मृत्यू झाला होता. या चाचणीद्वारे गर्भाशयातील पेशींना कॅन्सरची लागण झाली आहे अथवा नाही, हे स्पष्ट होते. गर्भाशयात कॅन्सरचे विषाणू असतील तर त्यांचे प्रमाण किती आहे, हेही या चाचणीतून लक्षात येते. मॅमोग्राफी स्क्रीनिंग स्तनांचा कर्करोग आणि स्तनांमधील गाठ हे दोन्हीही धोकादायक आजार आहेत. अनेकदा स्तनांच्या कर्करोगाची सुरुवात गाठीपासून होते. त्यामुळे त्यांची सातत्याने त्यांची तपासणी करत राहणे आवश्यक असते. स्तनांमध्ये गाठ असेल किंवा कॅन्सरसारखी लक्षणे दिसत असतील, तर मॅमोग्राफी स्क्रीनिंगद्वारे त्याची शहानिशा करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांच्या कर्करोगाने पीडित महिलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही चाचणी करून स्तनांच्या कर्करोगाला वेळीच आळा घालता येतो. याशिवाय सामान्य स्क्रिनिंग आणि 'सेल्फ ब्रेस्ट एक्झाम' पद्धतीनेही स्तनांच्या कर्करोगाची चाचपणी करता येते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, ३० ते ४५ वर्षे वय असलेल्या प्रत्येक महिलेने वर्षातून किमान एकदा मॅमोग्राफी स्क्रीनिंग केले पाहिजे. थॉयरॉइड फंक्शन टेस्ट महिलांनी थॉयरॉइड फंक्शन टेस्ट आणि कम्प्लीट ब्लड काउंट या दोन्ही चाचण्या केल्या पाहिजेत. तिसाव्या वर्षानंतर हार्मोन्समधील बदलांमुळे अनेक महिलांना थॉयरॉइडचा त्रास होतो. कुठलेही कारण नसताना अचानक वजन वाढू लागले किंवा कमी होऊ लागले, तर ही समस्या थॉयरॉइडशी संबंधित असू शकते. याशिवाय ऑटोइम्युन आजारांमुळेही थॉयरॉइडचा त्रास होऊ शकतो. वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांतून एकदा थॉयरॉइड टेस्ट केली पाहिजे. सातत्याने मूड बदलणे, वजन कमी जास्त होणे, मासिक पाळी नियमित न येणे, व्यवस्थित झोप न लागणे ही थॉयरॉइडची लक्षणे आहेत. यातील एखादे लक्षण आपल्यात दिसत असेल, तर थॉयरॉइड फंक्शन टेस्ट केली पाहिजे. फर्टीलिटी अँड प्री-प्रेग्नन्सी इव्हॅल्युएशन तिसाव्या वर्षानंतर महिलांमधील गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. फर्टीलिटी अँड प्री-प्रेग्नन्सी इव्हॅल्युएशन चाचणीद्वारे आपण गर्भधारणेचे योग्य वय ठरवू शकतो. महिलांच्या गर्भाशयामध्ये अनेक बिजांड असतात. विसाव्या वर्षानंतर त्या बिजांडांमध्ये वाढ होते आणि तिसाव्या वर्षानंतर त्यांची संख्या कमी होऊ लागते. तुम्हाला गर्भधारणा करण्याची इच्छा नसेल, तरी या चाचणीनंतर गर्भाशयातील बिजांडांच्या स्थितीबाबत माहिती मिळते. कॉलेस्टोरॉल चाचणी तिसाव्या वर्षानंतर शरीरातील कॉलेस्टोरॉलच्या प्रमाणाची तपासणी करत राहणे अत्यंत गरजेचे असते. विसाव्या वर्षानंतर प्रत्येक महिलेनी चार ते सहा वर्षांतून एकदा कॉलेस्टोरॉलची चाचणी करावी, असा सल्ला 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' देते. या चाचणीमुळे हृदयाशी संबंधित समस्या वेळीच उघडकीस येऊ शकतात. प्रत्येक महिलेनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तदाबाची चाचणी केली पाहिजे. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर भविष्यात हृदय आणि मेंदूशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात. आहार आणि जीवनशैलीतील बदल आणि औषधांच्या सहायाने रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. डोळ्यांपुढे अंधारी येणे, धुसर दिसणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे यांचाही संबंध रक्तदाबाशी असतो. काही वेळा डोळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे डोकेदुखीही वाढते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट