जीवनाचा खरा अर्थ आता कुठे उमगला आहे तिला. खऱ्या अर्थाने जगायचे आहे तिला. 'हर्ष खेद ते मावळले' अशी अवस्था झाली तिची. एक प्रकारचा निर्लेपभाव आलाय तिच्यात. पाण्यात राहून कमळाचे पान जसे दिसते ना तसा अलिप्तपणा आलाय तिच्यात. मात्र, ती कोरडी झालेली नाही, कारण तिने वार्धक्याची भूमिका आनंदाने स्वीकारली आहे. डॉ. अरुंधती सोनवणे तिन्हीसांजेला कलणाऱ्या सूर्याकडे ती पाहत होती. सप्तरंगांची आकाशात झालेली उधळण, क्षणाक्षणाला बदलणारे आकाशाचे रूप... असे बरेच काही... तिला जाणीव झाली, की आपले जीवनही असेच वेगवेगळ्या रंगाने रंगून गेले आहे. नवथर तारुण्याचा अबोध गुलाबी रंग ते आता निळसर करड्याकडे झुकणारी काळी छाया. हे रंग प्रतीक आहेत जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांचे. एव्हाना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि आता उरला आहे संथ नियंत आणि शांत असा भला मोठा डोह. खोल... त्याच्या तळात तिने साठवून ठेवले आहेत कितीतरी क्षण, कितीतरी आठवणी. आनंदाच्या, अपमानाच्या, फुलण्याच्या मोहरण्याच्या, तर कधी अपरिमित दुःखाच्याही. सगळे तिच्या मनाच्या तळाशी सुरक्षित आणि संरक्षित आहेत. आता सगळे आघात पचवायला ती शिकली आहे. त्यामुळे त्या पाण्यावर ना कसले तरंग उठत, की ना कधी ते डहूळते. एखादा सिनेमा पाहावा असे वाटते तिला मागे वळून आयुष्याकडे पाहताना. तिच्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका तिने अगदी उत्तम वठवल्या आणि त्याबद्दल सार्थ अभिमानही तिला होता. मात्र, आता तिच्या पुढ्यात चालून आलेली भूमिका सादर करायची तिला अजिबात इच्छा नव्हती; पण नियतीरुपी दिग्दर्शक तिची संमती मागत नव्हता. तिच्या इच्छेचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे जराशी सैरभैर झाली होती ती, इतकेच. एखादे अवखळ रांगते मूल जसे सतत पायात घुटमळून आपल्याला उचलून घ्यायचा हट्ट करते ना, तसे ते सतत पायात घुटमळत होते. दारावर टिचक्या देत होते. शेवटी तिच्यापुढे कुठलाच पर्याय उरला नाही. तिला ती भूमिका स्वीकारायलाच लागली. भूमिका होती वार्धक्याची! ही फक्त भूमिका नव्हती, तर त्याच्यामागे अनुभवाचे संचित होते. मात्र, तिला वाटतेय मी जगलेच नाही. वाढत राहिले फक्त. पळत राहिले एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत आणि एवढ्यात तिला वार्धक्य आलेही! हे करायचे राहून गेले, ते पाहायचे राहून गेले आणि इतक्यात आपल्या परतीचा प्रवास सुरू झाला हा अधुरे, अपुरेपणा, असमाधान आणि रुखरुख सतत पोखरत राहते तिला; पण आता वेळ हातातून निघून जात होती. तिने मनाची पक्की तयारी केली आणि अगदी मनापासून ही भूमिका रंगवायचे ठरवले. इतके सोपे नव्हते सगळे. सुरुवातीला खूप त्रास झाला तिला. आपल्या रक्ताचे पाणी करून, घाम गाळून जसे एखादे रोपटे जीवापाड जपत वाढवतो, त्याची निगराणी ठेवतो, रोगराई ऊन, वादळ, पाऊस पाण्यापासून त्याला जपतो, जोपासतो, ते रोप अचानक दुसऱ्या कोणावर सोपवल्यावर जसे वाटते तसे वाटले होते तिला. आपल्या मुलांचे बालपण, त्यांचे वाढणे, फुलणे हे सर्व एका जबाबदारीच्या चष्म्यातून पाहिले होते; पण आता नातवंडांच्या बाललीलांत ती रमू लागली, रंगू लागली. त्यामुळेच तर जगण्याची नवी उमेद मिळाली तिला. पुढील आयुष्य जगण्याची आस लागली, ओढ लागली, वयाचा विसर पडला; पण रूळ बदलताना गाडी जशी खडखडते तसे शरीर आता कुरकुरू लागले होते. आजूबाजूचे तिचे आधारस्तंभ हळूहळू निखळायला लागले होते. त्यांच्या आधाराशिवाय आत तिला पुढे जायचे होते, खूप अवघड वाटत होते; पण हळूहळू सवय करून घेतली तिने. बरोबरीचे मित्र-मैत्रिणी, सगेसोयरे या वाटेवरून परत जात होते तेव्हा मात्र ती अंतर्बाह्य हादरून गेली. व्यापव्याधींनी पिडलेल्या तिच्या बरोबरीच्या संख्यांची स्थिती पाहत होती ती, खूपच दयनीय आणि अस्वस्थ करणारी होती त्यांची स्थिती. कोणे एकेकाळी अधिकार पदावर वावरलेले, मी म्हणेल तिच पूर्वदिशा असे म्हणणारे आज गलितगात्र होऊन पडले होते. दुसऱ्यांच्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून होते. गोकुळासारखे नांदणारे घर आज मुलांचा आवाज ऐकण्यासाठी तरसत होते. तिने मात्र सगळ्यांच्या अनुभवातून शहाणपणा घेऊन उर्वरित आयुष्यासाठी थोडीशी जमापुंजी शिल्लक ठेवली होती. आयुष्यभर ज्या शरीराकडे दुर्लक्ष केले त्याचे मनापासून ऐकायचे असे ठरवले होते आणि आता त्याची योग्य ती काळजीही ती घेत होती. ज्यांचे जीवनसाथी साता जन्माची साथ अर्ध्यावरच सोडून गेले त्यांची अवस्था तर पाहवत नव्हती. आयुष्यभर एकमेकांना गृहीत धरत गेलो, प्रत्येक सुखदुःखात बरोबर होतो. प्रत्येक कर्तव्य, जबाबदारी निभावताना मात्र 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे' हे सांगायचे, व्यक्त करायचे राहून गेले होते. मग उरते फक्त खंत. शेवटच्या श्वासापर्यंत ती साथ देते. तिला वाटते जे तिने भोगले, जे तिला सोसावे लागले ते दुसऱ्यांना नको सोसायला. आपल्या अनुभवांतून इतरांचेही भले झाले तर बरेच ना! पण म्हणून उठसूट सल्ले द्यायला नाही जात ती. आग्रह आणि दुराग्रह यातला फरक ओळखायला शिकली आहे ती. तुम्हाला कधीही गरज लागेल तेव्हा मला हाक मारा, मी तुमच्यासाठीच आहे, सदैव; पण मला गृहीत धरू नका हे सांगायला ती विसरत नाही. जीवनाचा खरा अर्थ आता कुठे उमगला आहे तिला. खऱ्या अर्थाने जगायचे आहे तिला. 'हर्ष खेद ते मावळले' अशी अवस्था झाली तिची. एक प्रकारचा निर्लेपभाव आलाय तिच्यात. पाण्यात राहून कमळाचे पान जसे दिसते ना तसा अलिप्तपणा आलाय तिच्यात. मात्र, ती कोरडी झालेली नाही. तिला भावनांचा, प्रेमाचा ओलावा हवाय; पण त्यात वाहून नाही जायचे. 'झपूर्झा'चा ताल गवसलाय तिला. ती लय तिच्या आतपर्यंत झिरपली आहे. त्या तालासुरात न्हाऊन निघायचे आहे तिला. नवीन संगीत तयार करायचे आहे. तेच तिच्या जीवनाचे इप्सित आहे. आकाशात एकही ढग नसतो तेव्हा ती निळी गहराई किती खोल आहे याचा अंदाज येतो. तशी ती निरभ्र झाली आहे आता. तिच्यात सामावली आहे, त्या खुल्या आसमंतातील मुक्त स्वच्छंद क्षितिजापर्यंत पसरलेली एक नीरभ्र पोकळी. आपल्या अनुभवांची शिदोरी आणि जीवन जगण्याची असोशी यांच्या मिलाफाने उरलेले आयुष्य तिच्यासारख्याही निराधार वृद्धांसाठी खर्च करायचे ठरवले आहे तिने. आता ती शांत, समाधानी आणि तृप्त आहे, फक्त 'शेवटचा दिन गोड व्हावा' एवढी एकच तिची इच्छा उरली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट