अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या वस्त्रप्रावरणांची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली. या दौऱ्यामुळे फर्स्ट लेडीच्या कार्यावरही प्रकाश पडला. त्याविषयी. ................ सुनीता लोहोकरे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांसमवेत भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. या भेटीत भारत-अमेरिका संबंध आणि संरक्षण करारासंबंधात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगी इव्हान्का ट्रम्प यांच्या वस्त्रप्रावरणांची झाली. दिल्लीतील 'हॅपीनेस क्लास'मधील 'फर्स्ट लेडीचे काम काय असते,' असे शाळेतील चिमुरड्यांचे काही प्रश्न वगळता, विशेषतः मेलानियाची उपस्थिती केवळ शोभेची राहिली. मात्र, मेलानियाविषयीची अनेकांची उत्सुकता चाळवली गेली. त्याचबरोबर 'डिप्लोमॅटिक ड्रेसिंग'चा मुद्दाही पृष्ठभागावर आला. ट्रम्प यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मेलानिया यांनी धारण केलेल्या पांढऱ्याशुभ्र जम्पसूटवर भारतीय पद्धतीचा शेला कमरेला बांधला होता. त्यांच्या या 'स्टाइल'ची भारतीय माध्यमांनी भरभरून प्रशंसा केली. मात्र, विदेशी माध्यमांमध्ये या कपड्यांवर टीका झाली. हे कपडे कराटेची आठवण करून देतात, अशी टिप्पणी करण्यात आली. मेलानियाने ब्रिटिश युवराज विल्यम्सची पत्नी केट मिडल्टनकडून काही शिकावे, असा सल्लाही देण्यात आला. मुळात मेलानियाच्या म्हणजे 'फर्स्ट लेडी'च्या वस्त्रांची एवढी चर्चा कशासाठी? याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे 'डिप्लोमॅटिक ड्रेसिंग' आणि दुसरे म्हणजे मेलानिया या एकेकाळच्या प्रसिद्ध मॉडेल आहेत. सुरुवातीला दुसऱ्या मुद्द्याकडे पाहू. मेलानिया मुळच्या स्लोव्हेनियाची. म्हणजे युरोपातील. व्हिक्टर आणि अमाल्जिया नॉव्ह्ज यांची मुलगी. जन्म नोव्हा मेस्टोमधला म्हणजे तत्कालीन युगोस्लाव्हियाचा. वर्ष होते १९७०चा. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणि त्यांच्या वयात २२ वर्षांचे अंतर आहे. त्यांचे बालपण मध्यमवर्गीय घरात गेले. मात्र, फॅशन जगतात पाऊल ठेवले आणि मेलानियाचे विश्वच बदलले. त्यांनी मिलान आणि पॅरिसमध्येही मॉडेलिंग केले. १९९६मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. एच-१बी व्हिजावर अमेरिकेत दाखल झालेली ही तरुणी पुढे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात येऊन 'फर्स्ट लेडी' झाली. लुईझा अॅडॅम्स यांच्यानंतरची ती पहिलीच स्थलांतरित फर्स्ट लेडी. लुईझा यांचे वडील अमेरिकी होते. आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय होती. मात्र, मेलानिया यांची पार्श्वभूमी पूर्णपणे भिन्न होती. मेलानिया न्यूयॉर्कमध्ये आल्यावर एच-१ बी व्हिजावर त्यांनी सुरुवातीला मॉडेलिंग केले. २००१मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. मॉडेलिंग करता करता त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसायही सुरू केला. सौंदर्यप्रसाधनांचाही व्यवसाय केला. प्रसिद्ध मॉडेल असूनही मेलानियाच्या फॅशनचे फारसे कौतुक झाले नाही. तिचा ड्रेसिंग सेन्स हा केवळ एखाद्या प्रसंगापुरताच खुलून येतो, असे समजले जाते किंवा एखाद्या गोष्टीसाठी मेलानियाचा प्रभाव पडतो आहे, असेही दिसले नाही. तरीही 'फर्स्ट लेडी'ची वेशभूषा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आणि 'फर्स्ट लेडी' माजी मॉडेल असेल, तर चर्चा अधिक रंगते. फर्स्ट लेडीचे काम काय असते, याची आजवर अधिकृत व्याख्या केली गेलेली नाही. मात्र, ती अध्यक्षांशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणारी एक प्रतिनिधी असते, असे समजले जाते; तसेच ती अमेरिकी स्त्रियांचेही प्रतिनिधित्व करते. अमेरिकी स्त्रियांनी आपली वेषभूषा व केशभूषा कशी करावी, बोलावे कसे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी कसे व्हावे, याचा आदर्श उभा करणे, ही तिची अघोषित जबाबदारी असते. मिशेल ओबामा फर्स्ट लेडी असताना अनेक जणी त्यांच्यासारखी केशरचना करीत असत. फर्स्ट लेडीचा धोरणात्मक सहभाग नसला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर त्या मतही व्यक्त करीत नसल्या, तरी आजवरच्या काही अध्यक्षांच्या पत्नीने स्त्रियांच्या हक्कासंबंधात आवाज उठवला आहे. काही जणी सामाजिक आणि शैक्षणिक कामांमध्ये सहभागी होतात. सुरुवातीच्या काळात काही फर्स्ट लेडींनी महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेले दिसते. नंतरच्या काळात मात्र, हे पद अधिकाधिक शोभेचे बनत गेले. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, हा अपवाद म्हणावा लागले. अमेरिका वगळता अन्य देशांमध्ये 'फर्स्ट लेडी' फारशी प्रसिद्धीच्या झोतात असलेलीही दिसत नाही. अर्थात, फ्रान्समध्ये अध्यक्ष निकोला सारकोझी यांच्या पत्नी कार्ला ब्रुनीसारखे अपवाद दिसतात. मात्र, कार्ला या माजी सुपरमॉडेल होत्या, हेही विसरता येणार नाही. मेलानिया अध्यक्षांची पत्नी या नात्याने देशात आणि परदेशात अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात. मात्र, ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या प्रचारदौऱ्यांमध्ये त्या फारशा सहभागी झाल्या नव्हत्या. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका झाली, तेव्हा 'ते जसे आहेत, तसे मला आवडतात,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कमी बोलणारी अशी त्यांची ओळख असली, तरी त्यांना स्वत:तील कमतरतांची जाण आहे, त्यामुळे त्या गप्प बसतात, अशी टीकाही त्यांच्यावर होताना दिसते. अध्यक्ष पतीबरोबर आवश्यकतेनुसार परदेशात दौऱ्यांवर जाणे हीही फर्स्ट लेडीची एक जबाबदारी मानली जाते. याच पार्श्वभूमीर 'डिप्लोमॅटिक ड्रेसिंग'ला महत्त्व येते. सर्वोच्च पदावरील व्यक्तीची वेशभूषा बरेच काही सांगून जाते. ब्रिटनच्या प्रसिद्ध लेखिका कॅथरिन मॅन्सफिल्ड यांनी काळाबरोबर केट मिडल्टनमध्ये झालेल्या बदलाबद्दल भाष्य केले होते. केट काळाबरोबर सर्वार्थाने मोठी होत गेली. विशेषत: केट विल्यम्ससोबत पाकिस्तानात गेली असता, त्यांच्या सलवार कमीझ या वेशभूषेची प्रशंसा झाली होती. ती भारतात आली, तेव्हाही याची प्रचिती आली. हे 'डिप्लोमॅटिक ड्रेसिंग' मानले गेले. अशा भेटींमध्ये साधारणत: ज्या देशात जात आहोत, तेथील स्थानिक डिझायनरकडून वस्त्रप्रावरणांची खास निर्मिती केली जाते. मेलानिया यांनी मात्र, भारताबाहेरील माध्यमांची निराशा केली असे, बोलले गेले. ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्ताने असे काही विषयही चर्चेत आले आणि त्या निमित्ताने फर्स्ट लेडीविषयीचे कुतूहलही! Sunita.Lohokare@timesgroup.com ..........
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट