Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

पिढीमधला अभाव

$
0
0

पालकांनो, मुलांना वेळेच्या आणि वयाच्या आधी खूप मिळतेय किंवा तुम्ही देत आहात का? अधोगतीची ही सुरुवात तुम्हीच करून देत आहात का? याचा विचार करा. या सगळ्या सुबत्तेच्या कल्पनेत मुलांच्या लेखी पैशाची किंमत कमी होत चालली आहे हे मात्र नक्की.

डॉ. प्राजक्ता कोळपकर

गिरीजाचा कथकचा कार्यक्रम होता. तिचा सगळा संच छान तयार झाला होता. तेवढ्यात गिरीजाच्या परकरची नाडी तुटली आणि तिने जो काही गदारोळ केला तो बघण्यासारखा होता. आता नाडी कुठून आणायची? ती मिळाली तर घालायची कशी? असे अनंत प्रश्न गिरीजा आणि तिच्या वयाच्या संच्यातल्या तमाम मुलींना पडले. तिचा हा गोंधळ बघून गिरीजाच्या आईने ओरडून सगळ्यांना गप्प बसवले आणि पाचव्या मिनिटांत गिरीजाच्या परकारमध्ये नाडी घालून दिली. सगळ्या मुली आवाक् होत्या. आईने काय केले, तर एका जास्तीच्या सलवारची नाडी काढली आणि त्या नाडीला सेफ्टी पिन लावून नाडी सरसर ओवली. 'ही खूपच भारी आयडिया आहे,' असे सगळ्या मुलींना वाटले आणि त्या क्षणी गिरीजाची आई सगळ्यांना 'खूप भारी'ही वाटली; पण यात 'भारी' वाटण्यासारखे काहीच नव्हते. नाडी घालण्यासाठी सेफ्टी पिन टाचवणे किंवा क्लिपमध्ये नाडी अडकवून ती घालणे हे गिरीजाच्या आईच्या पिढीला माहीत असावे. यात फार काही केले ही भावना कदाचितच गिरीजाच्या आईला आली असेल; पण गिरीजाच्या मैत्रिणींसाठी खूप दिवस हा विषय चर्चेचा होता.

हे चित्र घराघरांत दिसत असेल. म्हणजे शर्टाची तुटलेली बटणे घरीच लावणे हा प्रघात होता किंवा काही उसवले असेल, तर चटकन हातशिलाई केली जायची. शक्यतो घरोघरी मशीन असायची. त्यामुळे कपड्यांच्या किरकोळ डागडुजीला टेलर कधीच बघावा लागत नव्हता. शाळेतही 'कार्यानुभव' नावाचा एक तास असायचा, त्यात बटण लावणे, टाके टाकणे, तुरपाई करणे हेही शिकवले जायचे. काही मराठी शाळा सोडल्या, तर फारशा शाळांमध्ये हे नसावे आणि असल्यास बटण मुलांनी लावायचे असते का? ही तर मुलींची कामे, असाही सूर निघाल्यास नवल वाटण्यासारखे काही नाहीच. ही साधी साधी कामे घरच्या घरी होऊ शकतात, हे आताच्या पिढीच्या मुलांना माहिती असणे दुरापास्तच, कारण घरीही अशा पद्धतीने आई शिवणकाम कारताना मुलांच्या दृष्टीस कदाचितच दिसत असेल. आधी प्रत्येकाच्या घरी विराजमान असलेला सुई-दोऱ्याचा डबा आता इतिहासजमाही झाला असेल. घरात इस्त्री करणे, पंखे पुसणे, जाळे काढणे, कपड्यांना स्टार्च करणे, फराळाचे जिन्नस घरीच करणे, आरसे पुसणे, बुटांना पॉलिश करणे, गाड्या पुसणे इतकेच नाही, तर झाडांना पाणी घालणे, झाडांची कटाई करणे, कुंड्यांची माती बदलणे, झाडांवर कलम करणे ही कामे आता घरच्या सदस्यांची राहिलेली नाहीत. या साऱ्यांसाठी त्यातले 'एक्स्पर्ट' आपल्या घरांमध्ये विराजमान होतात आणि ते काम करून जातात, त्यामुळे झाडांवर दुसऱ्या रंगाच्या फुलाचे कलम करता येते वगैरे हे विचार स्वप्नातही येण्यासारखे नाही.

आताची मुले या सगळ्या गोष्टींपासून दूर जात आहेत. मुळात घरी मुलांना दिसणारी सुबत्ता ही एखाद्या वस्तुंचा पुनर्वापर करावा लागतो ही संकल्पनाच रुजू देत नाही. चपलेचा अंगठा तुटला, तर अंगठा शिवून चप्पल घालता येते हेच मुळी मुलांना मान्य नाही आणि चुकून त्यांच्या पालकांनी अशी शिवलेली पादत्राणे घातली, तर 'पालकांना काहीच मॅनर्स नाहीत' वगैरे भाषा मुलांच्या तोंडी सर्रास येऊन जाते. या सुबत्तेच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेत घरात आलेली एक वस्तू सगळ्यांनी मिळून वापरायची हे तर अशक्यच. म्हणजे घरात आधी एक टॉवेल असायचा आणि सगळ्यांनी तोच वापरून कुणाचीही तक्रार नसायची. आता प्रत्येकाचे टॉवेलच काय; पण बाथरूमही वेगळे आहे. प्रत्येकाचा शाम्पू वेगळा, साबण वेगळा. असे असूनही एखाद्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांकडून चुकून तो साबण वापरला गेला, तर तेही मुलांना मान्य होत नाही. साबण जाऊ द्या, घरात टीव्हीही घरातल्या सदस्याइतके असलेले बघितले आहेत मी. म्हणजे अवाजवी सुबत्ता मुलांना आज मिळत आहे, त्यामुळे वस्तूंची किंमत त्यांच्या लेखी फार कमी झाली आहे. असे कुणीतरी म्हटलेलेच आहे, की जिथे खूप सुबत्ता तिथे अधोगती ठरलेलीच असते.

पालकांनो, या वाक्याचा जरा विचार करा. मुलांना वेळेच्या आणि वयाच्या आधी खूप मिळतेय किंवा तुम्ही देत आहात. अधोगतीची ही सुरुवात तुम्हीच करून देताय का? या सगळ्या सुबत्तेच्या कल्पनेत पैशाची किंमत कमी होत चालली आहे. पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट, अक्कल आणि वेळ द्यावा लागतो हे मुलांच्या बुद्धीला अजून शिवलेलेच नाही, कारण सुबत्ता असणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना काय देऊ आणि काय नको असे झालेले असते. ज्यांची आर्थिक सुबत्ता नाही त्यांचेही जगण्याचे शिवाय समाधानाचे निकष बदलले आहेत. या अति देण्याच्या भानगडीत खूप गमावतोय, की काय असा विचार प्रत्येक पालकांच्या मनात डोकवायलाच पाहिजे; पण दुर्दैवाने हाही विचार डोकावत नाही.

हे चित्र फक्त आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांच्याच घरी आहे असे नाही, तर वस्तीत राहणाऱ्या मुलांचीही मानसिकता आता तीच झाली आहे. त्यांना चौकातून डोक्यावर पाण्याचा हंडा घेणेही नकोसे वाटते. म्हणजे आताची पिढी चमकधमकतेच्या तंद्रीत जगते आहे आणि पालकांनीही ते जगणे मान्य केले आहे. मला अजून आठवते, माझी आई साड्यांचे पडदे शिवायची. पडद्याच्या पिशव्या व्हायच्या, मग त्याची पायपुसनी व्हायची आणि त्या कापडाचा फरशी पुसायचे फडके होऊन शेवट व्हायचा. आता आपण जो 'रिसायलिंग'सारखा गोंडस शब्द किंवा फंडा वापरतो, तो पूर्वी घरोघरी राबवला जायचा. जगण्यासाठी किती गोष्टींची किमान गरज आहे हे लक्षात घेतले, तर निदर्शनास येईल, की लागतेय महिन्याचे आणि आहे घरात वर्षाचे असे चित्र सहज घराघरांत दिसेल.

असो, मुद्दा असा आहे, की वस्तूंची, त्याला लागणाऱ्या पैशाची किंमत मुलांना कळावी. तीच वस्तू पुन्हा वापरणे, डागडुजी करून वापरणे यात काही गैर नाही हे शिकवण्याची वेळ आली आहे. घरातली सगळी छोटी छोटी कामे तुच्छ नाहीत हेही सांगण्याची वेळ आली आहे, एकदा घातलेला ड्रेस पुन्हा पुनहा घालावा लागतो हे मुलांना कळणे गरजेचे आहे अशी बरीच उदाहरणे आहेत. उद्या या शानशौकीच्या नादात 'आई-बाबा तुम्ही फेसबुकवर कायमच माझ्यासोबत दिसता. जरा 'चेंज' हवाय म्हणून आता कपड्यांप्रमाणे तुम्हालाही बदलायची वेळ आली आहे,' हे ऐकण्याची वेळ पालकांवर येऊ नये, इतक्यासाठीच हे लिहिण्याचा अट्टाहास!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>