ताणाला करा बाय-बाय! मुंबई टाइम्स टीम जगातील आणि देशभरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता तणाव जाणवणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. अनेक गोष्टींचा ताण येऊ शकतो. पण सध्याच्या काळात लोकांना फक्त आरोग्याची चिंता भेडसावत नसून जीवनमान आणि एकंदरच भविष्याची चिंता सतावत आहे. यामुळे निर्माण झालेला तणाव आजारास कारणीभूत ठरू शकतो. हा तणाव कमी करताना सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावेल. याच तणावाचा वापर तुम्ही तुमचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी देखील करू शकता. संशोधनानुसार सिद्ध झालं आहे की, तणावाची तीव्रता ही त्याचे परिणाम ठरवत नसते तर तुमची मानसिकता हे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असतं. तणाव किंवा त्याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्याच्या दोन सोप्या पायऱ्या असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परिस्थितीचा स्वीकार करा! तणावपूर्ण स्थिती हाताळताना त्या मागची कारणं समजून घेणं गरजेचं असतं. हीच तणाव कमी करण्यासाठीची पहिली पायरी आहे. तुम्ही जर तणाव निगडित विचार जाणीवपूर्वक आणि सारखा करत असाल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या मज्जासंस्थेच्या कार्यावर होतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, जेव्हा तुम्ही तणावपूर्वक परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा दुसरीकडे मनावर आलेला ताण, दडपण, तणाव दूर करण्याचं काम सुरु असतं. अशा वेळी तुम्ही जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करुन ताण कमी करु शकता. पण खरं तर कठीण परिस्थितीत आपला मेंदू आपल्याला सतत नकारात्मक गोष्टींची जाणीव करून देत असतो. त्यामुळे गुंतागूत वाढत जाते. अशा वेळी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. आवडत्या कामांना प्राधान्य तणावात देखील तुमचं ध्येय गाठताना मूल्यांना धरून राहा. हा तणावच तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरु शकतो. कारण अनेक संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, एखादं काम करण्यास तणावपू्र्ण परिस्थिती प्रोत्साहन देत असते. पण तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाची काळजी वाटत असेल, तुम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकत नाही. मग या तणावाचा वापर तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कशाप्रकारे करू शकाल याचा विचार करा. सध्याच्या घडीला तणाव जाणवतोय, हे मान्य आहे. ही परिस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. पण तुम्हाला आलेल्या तणावाला सकारात्मक प्रेरणा किंवा मूल्यांची जोड द्या. जर ताण आलेलं नाकारत किंवा टाळत असाल तर ते योग्य नव्हे. या तणावाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट