Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गाडी बंद पडलीय?

$
0
0

लॉकडाऊनमुळे अनेकांनी चारचाकी पार्किंगमधून बाहेर काढली नसेल. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या गाडीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करुन गाडीची काळजी कशी घ्यावी, याविषयी...

००००

दिगंबर यादव

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून चारचाकी बंद आहेत. अशा वेळी गाडीची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करत असालच, तरीही काही गाड्या सुरु व्हायचं नाव घेत नसतील. त्यामुळे आता गाडीची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही गाड्या बॅटरी डाऊन झाल्यानं सुरु होत नसतील. सध्याच्या परिस्थितीत बॅटरी चार्ज करणारे सापडणं अवघड आहे, पण क्लच असणाऱ्या गाड्यांना दोन-तीन जणांच्या मदतीनं धक्का मारल्यास सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या गाड्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टिप्स...

० बॅटरी वॉटर- सगळ्यात आधी बॅटरीतल्या पाण्याची पातळी तपासा. कमी असल्यास बॅटरी चार्ज होणार नाही. डीस्टील वॉटर मिळालं तर ठीक नाहीतर साधं पाणी ही वापरायला हरकत नाही.

० धक्का स्टार्ट- गाडी सेकंड गीअरमध्ये ठेवून इग्निशन ऑन करा. मीटरमधले बॅटरी, ऑइल, सीट बेल्ट असे सगळे लाइट लागले पाहिजेत. लाइट लागले नाहीत तर इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे असं समजावं. त्यामुळे धक्का मारून गाडी सुरु होणार नाही. जर लाइट लागले तर क्लच पूर्ण दाबून धक्का मारणाऱ्यांना मागून धक्का मारायला सांगा. गाडीनं थोडा वेग घेतल्यास क्लच सोडत अॅक्सेलेटर द्या. गाडी झटके देत सुरु होईल. एखाद दुसऱ्या धक्क्यानं गाडी सुरु न झाल्यास धक्क्या बरोबर स्टार्टरची मदत घ्या. गाडी नक्की सुरु होईल. पण एकदा ती सुरु झाली की कमीत कमी अर्धा तास तरी जागेवरच सुरु ठेवा. त्याशिवाय बॅटरी चार्ज होणार नाही किंवा सोसायटीच्या आवारात चालवून बॅटरी चार्ज करता येईल.

० ऑटोमॅटिक कार- ऑटोमॅटिक गाडीची बॅटरी उतरली असल्यास धक्का मारून सुरु करता येत नाही. तिला बॅटरी जम्प स्टार्ट करावी लागते. त्यासाठी बॅटरी केबल लागते. आजकल बरेच लोक त्यांच्या कार किटमध्ये केबल ठेवतात. अशा मंडळींना शोधून त्यांच्याकडून मदत घ्या. बॅटरी डाऊन असलेल्या गाडीच्या बाजूला व्यवस्थित चालू असणारी गाडी पार्क करून दोन्ही गाडीच्या बॅटरीला + ला + आणि - ला - केबल लावून बंद गाडीचा स्टार्टर देऊन सुरु करता येते.

० नवीन बॅटरी- बॅटरी तीन ते साडे तीन वर्षांहून जास्त जुनी असल्यास वरील सगळे प्रयत्न अयशस्वी ठरु शकतात. अशा वेळेस बॅटरी बदलणं फायद्याचं असतं.

० पॉवर सेव्हिंग- गाडी जागेवर किंवा चालवून चार्ज करण्याचा प्रयत्न करत असताना गाडीतले एसी, फॅन, म्युझिक प्लेअर, लाइट्स वापरू नयेत. त्यामुळे चार्ज होत असलेली बॅटरी डाऊन होण्याची शक्यता असते. गाडी बंद आणि लॉक केल्यानंतर एखादा लाइट सुरु राहत असल्यास सरळ बॅटरी टर्मिनल काढून ठेवा. लाइट सुरु राहिल्यास दोन-चार तासात बॅटरी पूर्णपणे उतरते. अशा वेळी धक्का मारून काही उपयोग होणार नाही.

० टायर प्रेशर- टायरमधील हवा कमी झाली असल्यास आसपास पोर्टेबल टायर प्रेशर पंप आहे का याची चौकशी करावी. गाडीतल्या चार्जिंग जॅकमध्ये कनेक्ट करून हवा भरता येते. सध्या सायकल पंपमध्येसुद्धा चारचाकीत हवा भरायचा वॉल देण्यात येतो. बऱ्याच वेळेस वस्तू आपल्या घरीच असते, पण वापरायची वेळ येत नाही म्हणून कोपऱ्यात पडून राहते.

० रंगाची काळजी- अनेक कारणांमुळे गाडीचा रंग खराब होतो. विशेष करुन पक्ष्यांच्या विष्ठेनं रंग खराब होतो. अशा वेळी गाडी पाण्यानं धुऊन काढा. सुकलेली विष्ठा खरडून काढल्यास ओरखडे पडण्याची शक्यता असते. धूळ झटकून कव्हरनं झाकून ठेवा.

० इंटिरिअर केअर- गाडी आतूनही स्वच्छ असल्याचं तपासा. गाडीत राहिलेल्या खाद्यपदार्थांमुळे झुरळ, मुग्या किंवा उंदीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

० पार्किंगची जागा बदलणं- उंदरांचा त्रास असणाऱ्यांनी पार्किंगची जागा बदलत राहावी.

० रिमोट लॉक- गाडीचं रिमोट लॉक एकदा तपासावं. बटण दाबूनही दरवाजे न उघडणं, सायरन वाजणं, गाडी चालू न होणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. तसंच रिमोटची बॅटरी उतरली असल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. अशा वेळेस चावीचा वापर करुन गाडी उघड-बंद करावी. रिमोटची बॅटरी उतरलेली असल्यास त्याचा वापर करणं टाळा

० इतर मुद्दे- गाडीमधील ऑइल आणि कुलंटची पातळी व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घ्या. गाडी १५ मिनिट सुरु ठेवा. बऱ्यापैकी बॅटरी चार्ज झाली असल्यास गाडी सुरु ठेवूनच सगळं तपासा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>