Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

एकाग्रता टिकून राहण्यासाठी...

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

वर्क फ्रॉम होम करताना ऑफिसला लागणारा प्रवासाचा वेळ आणि दगदग या गोष्टी वाचतात. त्यामुळे अनेकांना हे खूप सोपं वाटतं. पण हे सोपं निश्चितच नाही. लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला असतात. त्यामुळे कामाचा वेग मंदावतो अशी अनेकजण तक्रार करताना दिसतात. घरून काम करताना एकाग्रता टिकून राहण्यासाठी काही टिप्स...

निवडा योग्य जागा

ऑफिसमधील कामाचं डेस्क आणि घरून काम करताना निवडलेली जागा यांच्यामध्ये खूप फरक असतो. काम करताना ऑफिसमधील ठरलेली जागा अनेकांच्या सवयीची असल्यामुळे घरून काम करताना बरेचजण गोंधळून जातात. म्हणून घरून काम करताना योग्य जागा निवडल्यास गोंधळ न उडता एकाग्रता टिकून रहाण्यास मदत होते. चुकीची जागा निवडल्यास आजूबाजूचा गोंधळ, कुटुंबीयांचा वावर यामुळे कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वर्क फ्रॉम होमसाठी जागा निवडताना ती योग्य आणि घरातील शांत कोपऱ्यात असेल याची काळजी घ्या.

पोशाख महत्त्वाचा

तज्ज्ञांच्या मते तुमच्या वागणुकीवर आणि कामाच्या वेगावर पेहरावाचा परिणाम होत असतो. जर तुम्ही घरी घालायचे कपडे घालून काम करायला बसत असाल तर तुमच्या कामाचा वेग मंदावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे घरून काम करताना ऑफिससारखा पेहराव करा. त्यामुळे आपोआपच तुमच्या मेंदूला एकाग्रतेने काम करण्याचा संदेश मिळतो आणि कामाचा वेग देखील वाढतो.

ब्रेकचा नियम पाळा

अनेक यशस्वी व्यक्ती ५२ आणि १७ चा नियमाचं पालन करतात, असं एका अभ्यासांती सिद्ध झालं आहे. या नियमानुसार ५२ मिनिटं सलग काम केल्यानंतर १७ मिनिटांचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. हा ५२ आणि १७ चा नियम पाळून काम केल्यास तुमची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कामाच्या गडबडीत ब्रेक घेणं विसरत असाल, तर तुम्ही अलार्म लावू शकता; जेणेकरून योग्य वेळी ब्रेक घेतला जाईल आणि कामाचा वेग वाढेल.

टाळाटाळ नको

घरून काम करताना काम सुरु करण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. संपूर्ण दिवस हातात असल्यामुळे कामाची टाळाटाळ किंवा कामात दिरंगाई होऊ शकते. पण दिरंगाईमुळे तुमच्या कामाचा वेग आणि कार्यक्षमता मंदावून डेडलाइनच्या आत काम पूर्ण होत नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना कामाचं नियोजन करून त्यानुसार काम करणं महत्त्वाचं आहे.

संवाद साधा

ऑफिसमध्ये असताना थोड्या-थोड्या वेळानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधत असतो. मीटिंग्स, झालेली कामं या सर्वांसंबंधीचे अपडेट्स एकमेकांना दिल्यामुळे काम करण्यास अधिकाधिक प्रोत्साहन मिळतं. वर्क फ्रॉम होम करताना सहकारी तुमच्या आसपास नसतात. अशा वेळी विविध ऑनलाइन माध्यमांच्या मदतीनं सहकाऱ्यांसोबत नियमित चर्चा केल्यास, कामाचे अपडेट दिल्यास, मोकळेपणानं संवाद साधल्यास प्रोत्साहन मिळून कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल.

संकलन- केतकी मोडक, विद्यावर्धिनीज कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>