Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गोष्टींमध्ये रमणारी नृत्यकलाकार

$
0
0

शर्वरी जमेनीस

माझ्या मुलाला गोष्टी ऐकायला आवडतात. त्याला त्या सांगताना माझ्या लक्षात आले, की आपल्याकडे गोष्टींमध्ये तोचतोचपणा आहे. त्याच त्याच गोष्टी आपण मुलांना वर्षानुवर्षे ऐकवतो आहोत. यातूनच 'शर्वरीताईच्या गोष्टी' ही संकल्पना निर्माण झाली. प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या साह्याने या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. यामध्ये मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागावी, म्हणून मी कुठलेही अॅनिमेशन दाखवत नाही. मुलांना आपलेपणा वाटावा, म्हणून त्यांच्याच आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांचे गोष्टींमध्ये वर्णन करते. त्यांच्यातील छोटी-मोठी पात्र गोष्टींमधून जिवंत करते. या निमित्ताने मुलांना चांगली शिकवण मिळते, सोबत मनोरंजनही होते. या उपक्रमाला लहान मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मैत्रीण मधुराणी प्रभुलकरबरोबर केलेला 'कवितेचे पान' हा उपक्रमही माझ्या मनाच्या जवळचा आहे. कवितेचे अभिवाचन करणे, हा माझा आवडीचा छंद. खरे तर, हे काम अवघड असते. दुसऱ्या एका व्यक्तीने रचलेली रचना तुम्हाला त्याच भावनेतून लोकांसमोर मांडायची असते. काही वेळा मी त्याला कथकची जोड देते. काही रचना वाचताना प्रभावी वाटत नाहीत. नृत्य आणि संगीताची साथ दिली, तर त्यांचा प्रभाव वाढतो. हे करताना मला मनस्वी आनंद मिळतो.

नृत्य ही माझ्यासाठी छंदातूनच समोर आलेली कला आहे. माझा जन्म पुण्यातला. मला लहानपणी नृत्याची आवड नव्हती. ती आवड आई आणि माझ्या गुरू पं. रोहिणी भाटे यांनी निर्माण केली. वयाच्या सातव्या वर्षी आईने मला 'नृत्यभारती कला अकादमी'मध्ये दाखल केले आणि तेव्हापासून माझा नृत्यासोबतचा प्रवास सुरू झाला. माझ्या आईला खरे तर शास्त्रीय नृत्याची खूप आवड होती; पण तिला त्याची परवानगी नव्हती. तिने तिची आवड माझ्याद्वारे जोपासली!

नृत्य ही एक साधना आहे. त्याकडे नुसते मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहू नये, असे मला वाटते. मी गेली ३५ वर्षे कथक करते आहे. या दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपल्याकडचा प्रेक्षकवर्ग जसा शास्त्रीय संगीतासाठी दर्दी आहे, तितका तो शास्त्रीय नृत्याबाबत रसिक नाही. शास्त्रीय नृत्याला काही ठरावीक वर्गच दाद देतो, ही खंत मला सतत जाणवते. मला ही परिस्थिती बदलायची होती. शास्त्रीय नृत्यालाही प्रेक्षकवर्ग मिळवून द्यायचा होता; कारण नृत्याचा एखादा कार्यक्रम आम्ही खूप मेहनत घेऊन उभा करतो आणि त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.

या पार्श्वभूमीवर शास्त्रीय नृत्यासाठी रसिक वर्ग निर्माण करणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी 'फुटप्रिंट्स : हिंदी चित्रपटसृष्टीतील कथक नृत्याच्या पाऊलखुणा' हा विशेष कार्यक्रम सुरू केला. याचे मुख्य प्रयोजन होते, की हिंदी चित्रपटातील जुनी गाणी ऐकायला, बघायला मिळतील, म्हणून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील आणि ते आले, की मी त्यांना शास्त्रीय नृत्यातील सौंदर्य दाखवून देईल, या नृत्यशैलीचे वेगवेगळे पैलू उलगडेन. याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मी दोन मिनिटे गाजलेल्या हिंदी गाण्यांवर कथक करत असेन, तर बाकीची आठ मिनिटे फक्त शास्त्रीय नृत्यच दाखवायचे.

करोना काळात कार्यक्रम बंद झाले, तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. नृत्याच्या माध्यमातून एखादा संदेश कमी वेळात प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मी वेगवेगळे विषय निवडले आणि त्याला संगीताची साथ देऊन, तो तीस सेकंदांत मांडायचा प्रयत्न केला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कविराज भूषण यांचे काव्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून दाखवण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला. कविराज भूषण यांचे निवडक साहित्यच लोकांना माहीत आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांचे जास्तीत जास्त साहित्य, नृत्य आणि संगीताच्या जोडीने लोकांपर्यंत पोहोचवले. नवरात्रीत 'नमामी दुर्गे' नावानेही एक सीरीज केली, यामध्ये नृत्यातून नवदुर्गा साकारल्या.

नृत्यामुळे मी अभिनयाकडे वळले. मी पुणे विद्यापीठातून एम. ए. कथक केले आहे. एम. ए.च्या शेवटच्या वर्षात मी 'रंगपंचालिक' या नाटकात 'उत्तरा' नावाची मध्यवर्ती भूमिका साकारली; कारण त्यात मला नृत्य करायची संधी मिळणार होती. त्या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यातूनच मला 'बिनधास्त' मिळाला. आजही मला 'बिनधास्त गर्ल' म्हणून ओळखतात, तेव्हा छान वाटते. मी स्वतः 'वैजू'सारखी आहे, असे मला वाटते. मी निवडक, विचारपूर्वक, वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. 'बिनधास्त'मधील वैजू निर्भीड होती, 'मिशन चॅम्पियन'मधली आई हळवी, तर 'देऊळ बंद'मध्ये मी बेदरकार अतिरेक्याची भूमिका साकारली.

नृत्यातच माझा प्राण आहे. त्यात वेगवेगळे प्रयोग करणे, शास्त्रीय नृत्यशैली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, हा माझा मानस आहे. नृत्य ही साधना आहे. आजही एखादी अदा अचूक जमण्यासाठी तास न् तास रियाज करावा लागतो. करोना काळात कार्यक्रम बंद असले, तरी शरीरावर; तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तास न् तास रियाज करत होते. एखादी कला आपण साकारत असतो, तेव्हा त्या कलेवर श्रद्धा ठेवणे, तिचा आदर करणे; तसेच कलेची साधना करत राहणे, हे सगळ्यांत महत्त्वाचे असते, बाकी गोष्टी आपोआप घडत राहतात.

(लेखिका प्रसिद्ध कथक नृत्यकलाकार आणि अभिनेत्री आहे.)

शब्दांकन : निशिगंधा क्षीरसागर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Latest Images

Trending Articles