करिअरमधील ब्रेक म्हणजे एक मोठा बदल आणि त्यासोबत येणारे अनेक अनुभव. करिअरमध्ये ब्रेक घेणाऱ्यांकडे हल्ली भुवया उंचावून बघणे कमी झालेले असले, तरी असा ब्रेक घेणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नोकरी करणाऱ्या, करिअर ऐन भरात असणाऱ्या स्त्रिया ब्रेक घेतात. काहींसाठी हा ब्रेक फलदायी ठरतो, तर काहींसाठी तापदायक, त्यामुळे हा ब्रेक घेताना पूर्ण विचारांअंती निर्णय घेणे गरजेचे आहे.
२०-२२ वर्षे मनुष्यबळ (एचआर) विभागात उच्च पदावर काम केल्यानंतर, निधीने (नाव बदलले आहे) करिअरमध्ये ब्रेक घ्यायचे ठरवले. तिचे काम तिला अतिशय प्रिय होते. खूप चांगल्या संधी, सारे सहकारी समजून घेणारे, चांगला पगार अशा सर्व बाबी जमेच्या असतानाही निधीने ब्रेक घेतला. 'मी माझे काम आनंदाने करत होते. तिथे मला काही कमतरता जाणवत नव्हती; पण एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढत होत्या. अशा वेळी मला काही तरी एक निवडून त्याकडे नीट लक्ष द्यावे, असे जाणवले. मुले लहान असताना मी त्यांच्या सोबत नाही, हे मला नेहमी जाणवत राहायचे. त्यांच्यासोबत राहणे मला माझ्या कामाइतकेच प्रिय होते; त्यामुळे मी करिअर ब्रेक घेण्याचे ठरवले,' असे निधी सांगते.
वयाच्या १९व्या वर्षापासून स्वतःच्या पायावर उभी असलेली अंतरा (नाव बदलले आहे) सांगते, 'मी ग्रॅज्युएट होता होताच नोकरी करू लागले. उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च मी केला. एमबीए झाल्यानंतर मला लगेच नोकरी मिळाली आणि मी मागे वळून कधी पाहिलेच नाही. दरम्यान लग्न झाले. नोकरीच्या ठिकाणी वेगळी जबाबदारी घ्यावी लागणार होती. ते काम माझ्या विशेष आवडीचे नव्हते आणि याचदरम्यान मी आई होणार हे लक्षात आले व मी ब्रेक घेतला. सुरुवातीला जरा जड गेले; पण फ्रिलान्सिंगचे काम सुरू केले आणि मला ते आवडू लागले. मुख्य म्हणजे, माझ्या आर्थिक बाजूवर काही परिणाम झाला नाही. नोकरी करून जेवढे मी कमावत असे, तेवढेच आताही कमवते. त्याशिवाय मला मुलीला, घरासाठी खूप वेळ देता येतो.'
निधी आणि अंतरा दोघींना कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव आले. आर्थिक बाबतीत फारशी तसदी पडली नाही; पण सारेच अनुभव चांगले नसतात. कधी तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या एकट्या स्त्रीवर ढकलून, तिचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून, तिच्यापुढे नोकरी सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक ठेवला जात नाही. एका नामवंत शाळेत अनेक वर्षे शिक्षिकेची नोकरी केल्यावर, पुढे दोन-चार वर्षांत मुख्याध्यापिका म्हणून संधी मिळत असताना, शिल्पाने (नाव बदलले आहे) नोकरी सोडली, तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले. पतीला शिल्पाचे सतत कामात असणे, घरात मुलांना (पतीच्या दृष्टीने) कमी वेळ देणे रुचत नव्हते. शेवटी पतीची सततची नाराजी ओढवून घेणे शिल्पाला असह्य झाले व तिने आपले आवडीचे काम सोडले.
शिल्पासारख्या अनेक जणी घरात ताण नको, वाद नको, म्हणूनही करिअरमध्ये ब्रेक घेतात. नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या गैर वागणुकीमुळेही अनेकदा स्त्रियांना इच्छेविरुद्ध नोकरी सोडावी लागते. अशा वेळी कुटुंबातील सदस्यांचा, विशेषतः पतीचा, मुलांचा पाठिंबा असेल, तर ते सुसह्य होते. तसे नसेल, तर स्त्रिया एकट्याच झगडत राहतात, एकाकी पडतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात.
करिअरमध्ये ब्रेक घेणे स्त्रियांसाठी अनेकदा अपरिहार्य असते, तर कधी स्त्रिया कौटुंबिक कारणांव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी ब्रेक घेतात. कोणाला काही नवीन शिकायचे असते, काही नवीन करायचे असते, स्वतःच्या छंदाची जोपासना करायची असते, प्रवास करायचा असतो, अशी अनेक कारणे असतात. करिअरमध्ये ब्रेक घेऊन स्वतःच्या आवडीने जगण्यासाठी मात्र आर्थिक बाजूचा विचार आधी करावा लागतो. स्वतःची कमाई व बचत असल्यास उत्तमच; पण तसे नसल्यास, पतीवर किंवा वडिलांवर आर्थिक बाबींसाठी अवलंबून राहावे लागते आणि कधी कधी हा अनुभव सुखद नसण्याची शक्यता असते.
स्त्रियांचे करिअर दुय्यम न समजता, त्यांचे करिअर त्यांच्या मनासारखे घडणे फारसे दिसून येत नाही. असे व्हायचे असेल, तर मुख्यतः कुठल्या कारणांमुळे स्त्रिया ब्रेक घेतात, याचा सखोल विचार व्हायला हवा.
कौटुंबिक जबाबदारी, लहान मुले; तसेच वृद्धांची काळजी घेणारी कार्यक्षम यंत्रणा नसल्यामुळे अनेक कार्यकुशल स्त्रिया ब्रेक घेतात. साहजिकच, म्हणणारे म्हणतील, 'करिअरच करायचे तर मग तेच करा, उगाच कुटुंब, नवरा, मुलेबाळे असे गळे काढू नका, विसरून जा.' जाणत्या व्यक्तींनी हे लक्षात घ्यावे, की हा सल्ला आपण केवळ स्त्रियांनाच देतो. पुरुष करिअर, नोकरी करणारच. त्यांनी अशा जबाबदाऱ्या घेणे किंवा त्यासाठी करिअरमध्ये ब्रेक घेणे, आजही अभावाने आढळते. ब्रेक घेणे अथवा न घेणे हा निर्णय अपरिहार्यतेतून नव्हे, तर आनंदातून असावा. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. घरात कोणी आजारी पडले, मुलांच्या शाळेतील पालक-शिक्षक मीटिंग, नातलगांकडील निमंत्रण, हे सारे करिअर, नोकरी सांभाळून करणे सोपे नाही. ऑफिसमधील अतिशय महत्त्वाच्या मीटिंगच्या दिवशीच मुलांच्या शाळेची मीटिंग आली व जाता आले नाही, तर अनेकदा स्त्रियांना अपराधी वाटते. कधी कधी टोमणे ऐकून घ्यावे लागतात; त्यामुळे त्या स्वतःलाच सर्व बाबतीत दोष देऊ लागतात. 'जेव्हा चहूबाजूने आपल्या करिअरवर ताशेरे ओढले जातात, तेव्हा मनात शंका येते, का करतोय आपण हे? अशा वेळी जवळचे सहकारी, मैत्रिणी दिलासा देतात. मला माझे करिअर प्रिय आहे, माझ्या कुटुंबाइतकेच. थोडा आधार मिळाला, तर मी दोन्ही छान सांभाळू शकेन. इतके अवघड आहे का, करिअर करणाऱ्या स्त्रियांना समजून घेणे?' वनिता (नाव बदलले आहे) विचारते.
स्त्रियांच्या करिअरकडे दुय्यम म्हणून बघू नये. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी तिचे करिअर, नोकरी करणे ही काळाची गरज आहे. ब्रेक घेतला, तरी आज अनेक आस्थापना स्त्रियांना परत रुजू होण्यासाठी प्रोत्साहन देतात. वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम वर्कची संधी देतात. स्त्रियांच्या कामाची गुणवत्ता आणि त्यांची निष्ठा उल्लेखनीय असते, म्हणूनच आज 'ब्रेक के बाद करिअर' करण्याकडे स्त्रियांचा वाढता कल आहे. या वर्षी करोनाच्या उद्रेकामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. करिअर ब्रेक लादला गेला; पण हार न मानता, स्वतःच्या कौशल्यांचा उपयोग करून, नवीन काही करत, कुटुंबाला सावरण्यास स्त्रिया पुढे सरसावल्या आहेत. ब्रेकनंतर परत जोमाने कामाला लागलेल्या अशा विजीगिषु वृत्तीच्या सर्व स्त्रियांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट