प्रश्न : मला पाठोपाठ दोन मुली झाल्याने माझ्या नवऱ्याने मला मुलींसह माहेरी पाठवून दिले. गेली दहा वर्षे आम्ही वेगळे राहत आहोत. त्याने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. मध्यंतरी, मला असे कळले, की त्याने एका विधवा महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. तिच्या आधीच्या लग्नातून जन्मलेल्या मुलाला माझा नवरा दत्तक घेणार आहे. असे तो करू शकतो का? तसे झाल्यास माझ्या मुलींचे काय होईल?
उत्तर : तुमच्या या एका प्रश्नात किमान तीन प्रश्न आहेत; पण त्यांची उत्तरे देण्याअगोदर मला हे माहीत करून घ्यायला आवडेल, की गेल्या दहा वर्षांत तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध नांदवण्यासाठी किंवा किमान मुलींच्या पोटगीसाठी काही मागणी किंवा खटला दाखल केला होता का? मुलींच्या पालकत्वासाठी न्यायालयात मागणी केली होती का? सामाजिक पातळीवर विभक्ती मूकपणे मान्य केली, तरी न्यायालयात खटला दाखल केल्यास किंवा एखाद्या खटल्यात उत्तर देताना हे प्रश्न कळीचे ठरू शकतात.
नवऱ्याने तुम्हाला नांदायला न्यावे असा खटला तुम्ही दाखल केला, तर तुम्हाला तुमच्या संमतीशिवाय आणि काही कारण नसताना नवऱ्याने सोडून दिले आहे आणि तुमची परत नांदायची इच्छा आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुमचा नवरा तीच मला सोडून गेली असे म्हणून दहा वर्षांच्या विभक्तीचे कारण दाखवून घटस्फोट मागू शकणार नाही. अर्थातच तुम्हाला घटस्फोट हवा असला, तरी वैवाहिक जबाबदाऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे, कारणाशिवाय पत्नीचा त्याग करणे या कारणांवर तुम्ही घटस्फोटाचा अर्ज करू शकता.
दुसरे म्हणजे, पोटगीची कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या मुलींना गरज नसेलही; पण वडील म्हणून मुलींची किमान आर्थिक जबाबदारी घेणे हे तुमच्या नवऱ्याचे जसे कर्तव्य आहे, तसाच आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य हा मुलींचा हक्क आहे. तुम्हाला हातखर्च नको असल्यास पोटगी म्हणून मिळणारा पैसा किंवा पोटगी मिळाल्याने तुमच्या वाचलेल्या पैशाची मुलींच्या नावे सुरक्षित गुंतवणूक करणे योग्य ठरेल. काही वेळा न्यायालयाने पोटगीबरोबरच मुलांच्या नावे मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायचेही आदेश दिलेले आहेत. याचा जरूर विचार करावा.
आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळताना वकील म्हणून अनुभवातून वाटणारी एक शंका व्यक्त केल्याशिवाय राहावत नाही. तुम्ही तुमच्या पतीने एका विधवा स्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे सांगितले आहे. कधी कधी असे निदर्शनास आले आहे, की बऱ्याच काळाच्या विभक्तीनंतर कायद्यातील काही तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेऊन, खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करून अर्जदार घटस्फोटाची एक्स पार्टी डीक्री घेऊन दुसरे लग्न करून मोकळे होतात आणि नवरा/बायकोला पत्ताही लागत नाही. तसे काही झाले नाही ना, हेही तपासून बघा.
मुलाच्या दत्तकविधानाबद्दल कायद्यात अशी स्पष्ट तरतूद आहे, की विवाहित दाम्पत्यास/दाम्पत्यापैकी एकास मूल दत्तक घ्यायचे असेल, तर त्याला आपल्या वैवाहिक जोडीदाराची परवानगी/ मान्यता असावी लागते. एकदा विवाह झाला, की जोवर कायदेशीर न्यायालयीन आदेशाने घटस्फोट होत नाही, तोवर व्यक्ती विवाहितच समजली जाते. नुसते विभक्त राहणे म्हणजे घटस्फोट नव्हे. तुम्ही दोघेही विभक्त राहत असला तरीही विवाह कायम आहे. त्यामुळे तुमच्या नवऱ्याला मूल दत्तक घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुमची मान्यता असणे कायद्याने आवश्यकच आहे. दत्तकविधान झाल्याने तुमच्या मुलींवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाते अबाधित राहते. तसेच, मुलींचे सर्व कायदेशीर हक्क व अधिकारही अबाधित राहतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट