प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट... हे वाक्य खरं करून दाखवणारी गोष्ट म्हणजे फोटो आणि या फोटोतून तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक व्यक्त करणारी गोष्ट म्हणजे फोटोसाठी दिली जाणारी पोझ, अर्थात मुद्रा. हे समीकरण सिद्ध करण्यात आपल्या कन्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. ही गोष्ट काही आजची नाही, तर इतिहासही याचा साक्षीदार आहे.
पुरातन चित्रे, पेंटिंग्ज किंवा लेण्यांमध्ये स्त्रियांच्या सुंदर निश्चल मुद्रा कोरल्या आहेत. तेव्हा कदाचित चित्रकारापुढे, शिल्पकारापुढे पोझ देऊन उभे राहताना स्त्रियांकडे मुद्रेची मुबलकता असावी असं वाटतं. काळानुसार चित्रकारासमोर उभे राहताना पूर्वी हात, पाय, मान आणि चेहरा यांच्यासोबत पदलालित्याच्या विविध व्हर्जन्समध्ये चित्रे काढली जात. जसजसा काळ पुढे गेला, तशी हातातील हातोड्याची, छिन्नीची, ब्रशची जागा कॅमेराने घेतली आणि एका क्षणासाठी काहीतरी पोझ देण्यासाठी महिलांची कसरत सुरू झाली. तेव्हाच्या स्त्रिया डावा हात खाली आणि उजवा हात कोपरात दुमडलेला अशी तिरक्या मानेने स्मित हास्यासह पोझ देत. महिलांची सुंदर, शालीन अशी वर्णनं केल्या जाणाऱ्या जमान्यातले ते फोटो! 'बायकांनी इतंकच हसावं' या गोष्टीला ते फोटोही न्याय द्यायचे. या क्लासिक पोझचा जमाना जवळपास नव्वदीच्या दशकापर्यंत होता. स्टुडिओमध्ये जाऊन, ठेवणीतल्या साड्या नेसून फोटो काढण्याची हौसही त्या महिलांनी पुरविली. आपली फोटो काढण्याची हौस कोणीतरी पुरवतंय, हेच मोठं भाग्य त्यांना वाटत असे.
नव्वदच्या काळात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ही जोडगोळी जिन्सच्या कडांमध्ये (ज्या कडांचा मूळ उद्देश कमरेला पट्टा बांधणे हा आहे) अंगठे घुसवून उभं राहून 'शायनिंग' मारत फोटोसाठी पोझ देत असे. आधीच्या काळापेक्षा थोडं मोकळं अवकाश मिळालेल्या तरुणींनी ही स्टाईल फोटोसाठी चोरली. स्त्री-पुरूष समानतेच्या वाऱ्याने वेग धरण्याचा तो काळ! त्यामुळे सहाजिकच जिन्स घालून अशी पोझ देण्याऱ्या कित्येक तरूणींचे त्या काळातले असे फोटो आपल्याला पाहायला मिळतील. त्याकाळात मुलींचा अॅटिट्यूड, बेबाकपणा दर्शवणारी हीच स्टाईल होती. पण पंजाबी ड्रेसमध्ये, स्कर्टमध्ये असे अंगठे रुतवायची सुविधा नाही, हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या पोझची शोधाशोध सुरू झाली. इथून शोध लागला अर्ध रखुमाई पोझचा. तोवर बॉलिवूडचा प्रभावही वाढला होता. बॉलिवूडच्या नट्यांनी फोटोसाठी, एक हात कंबरेवर ठेऊन मान किंचित वाकवून पोझ देण्यास सुरुवात केली. मुळात फॅशन शोच्या रॅम्पपासून आलेली ही हस्तकटीकासन पोझ इतकी फेमस झाली, की आजही मुली एकटीने फोटो काढताना सहजच ही अर्ध रखुमाई पोझ देतात. खरंतर तोपर्यंत ही पोझ, हे फोटो आपल्यापुरते आणि आपल्या वर्तुळापुरते मर्यादित होते, जसं की आपलं व्यक्तिमत्व. तोवर कॅमेरा हा प्रकारही रोल, निगेटिव्ह, डेव्हलपिंग यामध्ये अडकलेला होता.
पंधरा वर्षांपूर्वी मात्र सोशल माध्यमांचा आपल्या आयुष्यात झालेला शिरकाव बऱ्याच गोष्टींचा परीघ विस्तारणारा ठरला. तोपर्यंत फोटोसाठी पोझ देणं हे अवघडलेपण न बनता मुलींसाठी ती हौस बनली होती. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छबी दाखविण्यासाठी, अभिव्यक्तीसाठी मिळालेल्या या व्यासपीठावर तरुणींना अनेक पोझ सापडल्या. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आलेला सेल्फी प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. त्यामागोमाग आला पाऊट, ओष्ठ व्यायामाचा प्रकार. सर्वसाधारणपणे चुंबनसदृष्य क्रियांमध्येच अपेक्षित असणाऱ्या या ओठांच्या मुद्रेतील फोटो मुली धडधडीत सोशल मीडियावर शेअर करू लागल्या. माय लाईफ, माय रूल्स असं टेचात सांगणाऱ्या पिढीतील मुलींना ही मुद्रा अजिबात वावगी किंवा अवघडलेपणा देणारी वाटली नाही. मुलीच नाही तर मध्यमवयीन महिलांनीही या पोझला आपलंसं केलं. अर्थात त्यावरही बॉलीवूडचा प्रभाव होताच. पण त्याहीपेक्षा अधिक प्रभाव होता तो, विशिष्ट अपेक्षांच्या चौकटी मोडल्याचा. याचदरम्यान शोध लागला एका प्रांजळ फोटो प्रकाराचा, कॅण्डिडचा. मुलींचा सगळ्यात आवडता आणि बहुतेक करून मॅनिप्युलेट केलेला फोटो प्रकार, असं म्हणता येईल. लक्ष नसताना सहज काढलेला फोटो सुंदर येतो. नैसर्गिक भाव टिपलेला असतो. आपलं लक्ष नाही असं भासवून, ठरवून फोटो काढायला लावून सोशल मीडियावर कॅण्डिडचं कॅप्शन देणाऱ्या आणि 'येडा बनके पेढा' खाणाऱ्याही अनेकजणी आहेत.
आपण कसे आहोत, यापेक्षा आपल्याला कसं असायला आवडेल याची अभिव्यक्ती म्हणजे फोटो, असं आज नक्कीच आपण म्हणू शकतो. आजकाल तरी सोशल मीडियावर झळकणाऱ्या फोटोंमधून अनेकांबद्दलची मतं बनविली जातात. त्यामुळे फोटोसाठी कोणती पोझ द्यायची, हा विचारही अधिक केला जातो. या पोझ देण्यात निर्विवादपणे मुली आघाडीवर आहेत. फोटोची पोझ हे त्यांच्या वेगवेगळ्या काळातील परिस्थितीचं डॉक्युमेंटेशन आहे, असंच म्हणवं लागेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट