Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

स्वत:ला शोधणार काय?

$
0
0

भावना भालेराव

मोनालिसा, एक गूढ चित्र. आजवर कित्येक चित्रकार, कलाकार मंडळी आणि सामान्य लोकांना सुद्धा या चित्राची भुरळ पडते. अजूनही या चित्राचा अभ्यास केला जातोय. त्याविषयी संशोधनं होत आहेत. या मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे भाव नेमके कसे आहेत, याबाबतचा तर्क अनेक अभ्यासक आपापल्या पद्धतीने लावत असतात. या चित्राची कथा अशी सांगितली जाते, की चौदाव्या शतकात एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याच्या पत्नीला भेट देण्यासाठी तिचे चित्र 'लिओनार्दो-द-विन्सी' नावाच्या चित्रकाराकडून काढून घेतले. पण पुढे मात्र त्या व्यापाऱ्याला काही कारणास्तव त्या चित्राचे पैसै देता आले नाहीत, म्हणून ते चित्र तसेच बाजूला पडले. कालांतराने त्या चित्राची प्रसिद्धी झाली आणि मग त्याविषयी चर्चा सुरू झाली. या चित्रातले मोनालिसाचे गूढ स्मितहास्य आणि कधी-कधी अंधुकशी जाणवणारी खिन्नताही बऱ्याच जणांना विचारात पाडते. त्यातील नाजूक भाव आणि रंग-संगतीची जादू यामुळे सगळ्यांनाच ते चित्र भावते. असं म्हणतात की मोनालिसाच्या चित्राकडे आपण ज्या नजरेने किंवा भावनेने बघतो, तशीच भावना त्या चित्रात प्रतीत होते. म्हणजे आपण जर खिन्न मनाने ते चित्र पाहत असू, तर त्यातली मोनालिसा पण खिन्न असल्याचे भासते. पण त्याच वेळी जर आपण प्रसन्न चित्ताने तिच्याकडे निरखून बघितले, तर तीसुद्धा आपल्याला हसताना भासते. या चित्रातला हा विरोधाभास प्रत्येकालाच भावतो. हे चित्र मला संपूर्ण स्त्री जगताच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारे असावे असे वाटते.

स्त्री कुणालाच समजत नाही असे म्हणतात. सहजासहजी तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. तिच्या मनातले भावही पटकन समजतीलच असे नाही. पण तिच्या मनातल्या भावविश्वाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम मात्र आजूबाजूच्या वातावरणात होत असतो, हे सुद्धा तितकेच खरे. चाळीशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांमध्ये ही गोष्ट जास्त प्रमाणात जाणवते. दिवसभर छान असणारा मूड संध्याकाळी अचानक बिघडतो. बेचैनी जाणवते, कोणाशीच बोलावेसे वाटत नाही, काही करायची इच्छा होत नाही, सगळे निरर्थक आहे असे वाटायला लागते. आपले आयुष्यातले नेमके ध्येय काय, आपण कोणासाठी आणि कशासाठी काय करतोय, असे प्रकारचे अनेक विचार मनात येऊन थैमान घालत असतात. कधी-कधी मात्र अचानक उत्साह जाणवतो. खूप धम्माल मस्ती करावी, धुंदीत जगावे, आयुष्य भरभरून जगावे, मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जावे, भटकावे, मनाला येईल ते खावे-प्यावे, स्वत:ला वेळ द्यावा असे वाटायला लागते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जाणवणारे हे बदल कधी अचानक उद्भवलेल्या संकटामुळे, आजारामुळे किंवा परिस्थितीमुळे होतात. स्वत:ला अचंबित करून जातात आणि मग या बदलांचे किंवा वृत्तीचे परिणाम आजूबाजूच्या माणसांवर, कुटुंबावर व्हायला लागतात. मोनालिसाच्या त्या चित्रासारखे आपले जगण्याचे गूढ मग आपल्यालाच उमजत नाही. पण म्हणून निराश होण्यापेक्षा आपण आपल्यातली मोनालिसा ओळखून तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.

आपण मोनालिसाला जर आपले आयुष्य म्हणून प्रतीत केले, तर ज्या नजरेने आपण त्याकडे बघणार आहोत तेच आपल्याला जाणवते. म्हणूनच मग रोज सकाळी मोनालिसाच्या चित्राकडे हसून बघत एकदा ठरवावं की आजचा दिवस खूप छान, सकारात्मक आणि सुंदर असणार आहे. आपण जर कुठल्याही ज्ञात किंवा अज्ञात कारणांमुळे दुखी होत असू, निराश असू किंवा निरुत्साही वाटत असेल, तर त्याचे कारण शोधून त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मोनालिसाच्या त्या चित्रासारखे आयुष्य कितीही अद्भुत आणि गूढ असले तरी आपण मात्र त्याकडे हसून बघायला शिकले पाहिजे. सरते वर्ष आपल्या सगळयांसाठीच खूप कसोटीचे गेले. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर आपण अनेक लढाया लढतोय. त्यातही घरात असणारी स्त्री आणि नोकरी करणारी स्त्री यांच्यावर दुहेरी जबाबदारी येऊन पडलेली असते. स्वत:ची योग्य ती काळजी घेत घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जपत, लहान मुलांचे लॉकडाऊन काळातील अवघड होऊन बसलेले संगोपन करीत आणि बाहेर जाणाऱ्यांची काळजी घेत एकेक दिवस पार पडावा लागतो. आता मात्र ही सगळी आव्हानं पेलत आपण न्यू नॉर्मल स्वीकारले आहे. अजूनही येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो. तेव्हा येणाऱ्या नवीन वर्षात आपण अधिक सजगतेने जगण्याचा प्रयत्न करायला हवा. ईश्वराने प्रत्येकाला एक अद्भुत शक्ती प्रदान केली आहे. तिचा पुरेपूर उपयोग करता यायला हवा. जास्तीत जास्त कल्पक पद्धतीने, शरीर आणि मन:स्वास्थ्य राखत, छंद जोपासत आयुष्य जगायला हवे. म्हणजे मग आपल्यातली हसरी मोनालिसा आपल्याला नक्की गवसेल आणि तसाच प्रतिसादही देईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles