एखाद्या मॅट्रिमोनियल साइटच्या किंवा वधू-वर सूचक मंडळातील विवाहेच्छुक उपवर मुला-मुलींच्या स्थळांच्या संदर्भात वापरला जाणारा 'अनुरूप' हा शब्द सर्वज्ञात आहे. साधारणत: एकमेकांना किंवा त्या दोन कुटुंबांना एकमेकांशी समजून घेणे सोपे जावे, इतकाच त्याचा उद्देश असावा; पण आज काल 'अनुरूप' या 'लेबल'खाली दोन्ही पक्षांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सगळे बदलले, तर मुलीपेक्षा अधिक कमावणारा मुलगा हवा, या अपेक्षा 'अनुरूप' शब्दाचा वेगळाच अर्थ प्रतीत करतात.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध अर्थाने अनुरूप मुलगा किंवा मुलगी शोधण्याचा कार्यक्रम गेली वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मात्र अनुरूप शब्दाखाली सांगितल्या जाणाऱ्या अपेक्षांच्या यादीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकेकाळी मुलीच्या लग्नाचा घोर असलेल्या पित्याला रात्रभर झोप लागत नसे. मुलगी वयात येते ना येते तोच तिच्यासाठी स्थळ शोधण्याची मोहिम सुरू होत असे. वरपक्षाच्या अपेक्षा पूर्ण करता करता मेटाकुटीला येणारा बाप, हे कथा कादंबऱ्यांमधील किंवा चित्रपटातील पात्र नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने बदलत आहे.
स्त्रियांच्या शिक्षणामुळे आणि सबलीकरणामुळे या अनुरूप नावाच्या शब्दाला आणखी भल्या बुऱ्या छटा प्राप्त होत आहेत. जिथे पूर्वी वधूचा पिता दीनवाणा वाटत होता तिथे आता उपवर मुलांची स्थिती दयनीय झाली आहे. सद्यस्थितीत महिला आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक झाल्याने तिच्या महत्त्वाकाक्षांना मोकळीक देऊ शकणारा अर्थात तिला 'स्वतःची स्पेस देणारा' नवरा अपेक्षित असतो. या ठिकाणी अनेकदा सांसारिक बाबींशी तडजोड करावी लागते. केवळ सुशिक्षितच नव्हे, तर अल्पशिक्षित मुलीही अनुरूप शब्दाच्याआड सरकारी नोकरीतल्याच किंवा उच्चशिक्षित नवऱ्याची अपेक्षा करतात. पाच आकडी पगार, चारचाकी, घर या अपेक्षा असणाऱ्या मुली आज आजूबाजूला अधिक आहेत. मुलांच्या बरोबरीने पगार घेणाऱ्या मुलींना आजही आपल्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगाच नवरा म्हणून हवा असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजही मुलींच्या मनावर तू शिकलीस, चांगले कमावलेस तर तुला अधिक चांगले कमावणारा नवरा मिळेल ही घरातून, समाजातून बिंबविली जाणारी गोष्ट. म्हणजे बायकोपेक्षा नवऱ्याने अधिक कमावणे हा वर्षानुवर्षे चालत आलेला एक अलिखित नियम आजही कायम आहे. याला अपवादही अनेक आहेत; पण त्याचे प्रमाण खूपच अल्प आहे.
अनेकदा नवऱ्यापेक्षा जास्त कमावणारी मुलगी मुलाच्या घरच्यांनाही नको असते; कारण आर्थिक स्वावलंबन म्हणजे सत्तेचा मार्ग. मुलगी अधिक कमावती असेल, तर तो तिच्या हातात जाईल, अशी भीती मुलाकडच्यांना वाटत असते. या सगळ्यामध्ये अनुरूप जोडीदार शोधण्याचा आटापिटा करणाऱ्या मुली बऱ्याचदा आर्थिक बाबींना अधिक महत्त्व देत असल्याचे समोर येते आणि पुरुषही आपल्यापेक्षा कमी कमावणारी मुलगी असेल, तर ती ताब्यात राहील असाच विचार करताना दिसतात. एकीकडे स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या अपेक्षा करत असताना दुसरीकडे तिने घरातच स्वतःला मर्यादित ठेवावे ही अपेक्षा जशी गैर आहे, तशीच स्वावलंबी असतानाही आपल्यापेक्षा आर्थिक स्तर उच्च असणाराच नवरा हवा ही अपेक्षाही चुकीची वाटते.
आपल्याकडे 'हाउसवाइफ'प्रमाणे 'हाउसहजबंड' ही संकल्पना अद्यापही रुजलेली नाही. शिक्षणातून प्राप्त झालेले आत्मभान आणि नोकरीतून मिळालेले स्वावलंबत्व याच्याशी तडजोड करण्याची इच्छा निश्चितच कोणत्याही मुलीची नसते; पण हा बदल स्वीकारताना नवऱ्याच्या अर्थिक कमाईबाबतच्या अपेक्षा मात्र त्याच का, हा प्रश्न नक्कीच पडतो.
उच्चशिक्षणाची आस, अधिक चांगल्या संधीचा शोध, जागतिकीकरणामुळे विस्तारलेली क्षितिजे या सर्वांचा परिपाक म्हणून समाजातील लग्नाचे सरासरी वय वाढत आहे. त्यालाही घरच्यांनी, समाजाने आता स्वीकारले आहे. पूर्वीसारखे पंचविशीच्या आत लग्न आणि तिशीच्या आत मूल, असा हट्टही घरांमध्ये पाहायला मिळत नाही; पण या बदलांसोबत दोन्ही पक्षांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये मात्र फारसा बदल झालेला नाही. त्यातल्या त्यात आपल्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा हवा, ही अपेक्षा तर दिवसेंदिवस अधिक तीव्र झाल्याची पाहायला मिळते. महिलांना निर्णय स्वातंत्र्य देणे गरजेचे आहेच; पण ते करत असताना अपेक्षांचा डोंगर मात्र अनेकदा कायम असल्याचे दिसून येते.
असे म्हणतात, की संसाराचा गाडा नवरा-बायकोने मिळून हाकायचा असतो; पण ही दोन चाके विजोड न होता परस्पर पूरक असणे गरजेचे आहे. मुलीपेक्षा अधिक कमावणाराच नवरा हवा किंवा मुलापेक्षा अधिक कमावणारी बायको नकोच या दोन्ही अपेक्षा वर्षानुवर्षे कायम आहेत. त्या बदलता आल्या, तर समानतेच्या दिशेने अजून एक सकारात्मक पाऊल पडेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट