व्यवसाय स्थिर होण्यास काही काळ लागतो आणि त्या नंतर जसा तो स्थिरावतो, तसे त्यातून मिळणारे उत्पन्न हे उत्तम प्रकारे वाढण्यास सुरुवात होते. वाढत असलेल्या उत्पन्नाचा फायदा करून घेऊन जो त्याचा योग्य असा विनियोग करतो, तो व्यावसायिक पुढे यशस्वी होईल यात शंकाच नाही.
एखाद्या व्यावसायिकाशी बोलताना तो असे सांगतो, की अमुक अमुक वर्षांपूर्वी माझे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे आजच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक होते. तेव्हा योग्य गुंतवणूक केली असती, तर बरे झाले असते. जेव्हा याच गोष्टीची आपण आकडेमोड करतो, तेव्हा असे लक्षात येते, की व्यवसाय छान सुरू असताना एखाद्या व्यावसायिकाने भरघोस अशी गुंतवणूक केली, तर त्याचा त्याला आणि त्याच्या परिवाराला नक्कीच फायदा होईल. ही गुंतवणूक म्हणजे व्यवसायातील नव्हे, तर वैयक्तिक अशी गुंतवणूक असायला हवी.
प्रत्येक व्यावसायिक हा आपला व्यवसाय वाढवण्यास प्रयत्नशील असतो, त्यासाठी तो बरेच नियोजन करतो आणि ते नियोजन करून त्या प्रमाणे एखादे धोरण राबवत असतो. धोरण राबवले जात आहे किंवा नाही याकडे त्याचे लक्ष असते. त्यात काही अडचण येत असेल, तर ती दूर करण्याचा प्रयत्न तो करत असतो. सतत आपल्या व्यवसायातील ध्येये साध्य करण्यासाठी तो कष्ट करत राहतो आणि दिवस-रात्र आपली व्यवसायाशी निगडीत स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत राहतो. आपण नीट विचार केला, तर एखादा व्यावसायिक हे सगळे का करत असेल? नाव कमवायला? प्रतिष्ठा मिळवायला? कदाचित असेलही. त्याही पेक्षा मूलभूत अशी त्याची स्वतःच्या परिवाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो सतत मेहनत घेत असतो.
प्रत्येक व्यावसायिकाने हा विचार करायला हवा, की आपण आपली व्यवसायातील ध्येये पूर्ण करण्यासाठी किती नियोजन करतो? आपण आपले सहकारी, कर्मचारी यांच्या बरोबर अनेक बैठका घेऊन व्यवसायाची ध्येये ठरवतो, ती ध्येये कशी गाठायची त्याचे नियोजन करतो; शिवाय या नियोजनाची अंमलबजावणी कशी करायची तेही ठरवतो. पुढे सतत ही अंमलबजावणी होते आहे का? त्यात काही फरक करायची गरज आहे का? अपेक्षित असे परिणाम मिळण्यासाठी आपली ठरलेली ध्येये साधण्यासाठी आपले धोरण योग्य आहे का? त्यात काही बदल करायची गरज आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारात असतो, त्यासाठी सतत काम करत असतो.
एवढे सगळे करत असताना 'आपण हे का करत आहोत,' याचा विसर पडता कामा नये. आपण जे पैसे कमावतो आहोत ते आपल्या परिवाराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या आरामदायक निवृत्तीसाठी तजवीज करणे, वैयक्तिक आणि परिवाराची स्वप्ने, ध्येये साध्य करण्यासाठी जेव्हा आपण एवढी मेहनत घेत असतो, तेव्हा हे पाहणे खूप आवश्यक आहे, की ही ध्येये साध्य करण्यासाठी आपण योग्य गुंतवणूक करत आहोत का? योग्य गुंतवणूक याचा अर्थ आपली ध्येये गाठण्यासाठी मार्गदर्शन घेऊन, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे, योग्य रकमेची गुंतवणूक करणे. नुसती गुंतवणूक करून उपयोग नाही, ती व्यवस्थित करणे म्हणजे आपण कष्टाने कमावलेल्या लक्ष्मीला मान देणे होय.
आपला गुंतवणूक या विषयात काही अभ्यास नसताना, आपल्याला त्यातले फारसे कळत नसताना मात्र आपल्याला केवळ वाटते म्हणून एखादी गुंतवणूक करणे अथवा एखादी गुंतवणूक खूप जास्त परतावा देते म्हणून किंवा अमुक अमुक गुंतवणूक सुरक्षित आहे म्हणून, मित्र-मैत्रिणी सांगत आहेत म्हणून गुंतवणूक करणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कष्टाची किंमत नाही असे समजावे. गुंतवणूक हा विषय इतर विषयासारखा आहे. डॉक्टर, वकील यांचा सल्ला घेतल्याने आपला फायदा होतो. असे, का तर ते त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ असतात आणि त्या क्षेत्रातील आपले ज्ञान तोडके असते. हाच विचार गुंतवणूक करताना केला, तर तुम्हाला फायदा नक्की होईल. जसे वकील, डॉक्टर यांच्यापासून काही लपवू नये, त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे अनुसरण करावे तसेच आर्थिक सल्लागार हा तुमचा मित्र, मार्गदर्शक असतो. त्याच्याशी मैत्री करा व आपली ध्येये साध्य करा.
(लेखक प्रमाणित अर्थसल्लागार आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट