बेशक पिता लोरी नहीं सुनाते
माँ की तरह आसू नहीं बहातें
पर दिनभर की थकान के बावजूद
रात का पहेरा बन जाते हैं
और जब निकलते हे सुबह
तिनकों की खोज में, किसी के खिलोंने
किसी की किताब, किसी की मिठाई, किसी की दवाई
परवाज पर होते हैं घर के सपने
पिता कब होते हैं खुद के अपने?
वडील हे नातेच मुळात एक गूढ आहे. समजून घेऊ तितके या नात्याचे नि:स्वार्थ पैलू उलगडत जातात. आपली भरलेली ओंजळ कुटुंबाच्या कल्याणासाठी कायम रिते करणारे हे व्यक्तित्त्व. मोकळे स्वतंत्र आकाश आणि त्या उंच खुल्या आकाशात भरारी घेण्याची ताकद, जर कोण मुलीला देत असेल, तर ते वडीलच असतात! या आकाशातून पुन्हा सुखरूप घरी येण्यासाठी जी आवश्यक संस्कारांची, विश्वासाची शिदोरी असते, तीही वडिलांनीच दिलेली असते. खरे तर, कोणत्याही मुलीसाठी ही गगनभरारी केवळ पित्याने दाखवलेल्या विश्वासाने आणि मुलीने तो विश्वास सार्थ केल्यामुळेच होत असते. वडिलांचा विश्वास संपादन करण्याची पहिली जबाबदारी ही निश्चितच मुलीची असते. वडील आणि मुलीची ही 'केमिस्ट्री' जिथे जिथे जुळते, तिथे तिथे कर्तृत्ववान मुलगी तयार होते, यात तिळमात्रही शंका नाही. येणाऱ्या प्रत्येक परिणामाचा विचार करून ढालीसारखा जेव्हा पिता उभा असतो, तेव्हाच मुलीची गगनभरारी शक्य होते. ती ढाल असते विश्वासाची, संस्कारांची आणि नीतिमूल्यांची.
'जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धरी,' असे म्हटले जाते. हाती पाळण्याची दोरी येण्याआधी तिच्या आयुष्याची दोरी ही गगनभरारी घेण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी, स्वत:ला एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यासाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वडिलांनीच संस्कार आणि विश्वासाने पक्की केलेली असते; म्हणूनच कुटुंबाच्या आणि स्वतःच्या क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या ती लीलया पार पाडू शकते, हे मी अनुभवावरून सांगते. पित्याच्या विश्वासाने मुलींचे आयुष्य कसे वळण घेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध कुस्तीपटू फोगट भगिनी. दुर्योधनाला जसे आईच्या फक्त एका नजरेने अभेद्य बनवले होते, तसे पित्याचा विश्वास आणि तो सार्थ करण्याची मुलीची तयारी असेल, तर कुठलेही संकट मुलीवर येऊ शकत नाही आणि ते यश केवळ तिचेच असेल. जेव्हा एक पिता मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिला खंबीर पाठिंबा देतात, तेव्हा ती सक्षम, सशक्त बनतेच; शिवाय तिच्यामध्ये अनेकांना आधार देण्याची ताकदही निर्माण होते. याचे उत्तम उदाहरण आहे, एअर होस्टेस नीरजा. मळलेल्या वाटेवरून न जाता जेव्हा एखादी आपला वेगळा मार्ग निवडते, तेव्हाही ती हे धाडस केवळ पित्याच्या पाठिंब्यावरच करू शकते; कारण समाजाचे अनेक प्रश्न पित्याच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने हवेतच विरून जातात. मॉडेलिंग, अभिनय या क्षेत्रांत काम करणाऱ्या मुलींना तर हा अनुभव कायमच येतो. खेळात करिअर करणाऱ्या मुलींसाठी तर पिता एक प्रकारचा देव असतो. तिच्या वेळा सांभाळणे, स्पर्धेसाठी तिचे बाहेरगावी जाणे, सरावामध्ये तिने स्वतःला झोकून देणे हे पित्याच्या भक्कम पाठिंब्यावरच तर शक्य होते. यासाठी क्रीडा क्षेत्रांतली अनेक उदाहरणे आहेत.
माझ्या ओळखीत एक नवोदित मॉडेल मैत्रीण आहे. 'असले कसले हे करिअर? संस्कारी घरालीत मुलींना ते शोभत नाही,' असे सवाल तिला अनेकांनी केले. मात्र, जेव्हा या प्रश्नांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी तिचा बाबा तिच्या बाजूने उभा राहिला, तेव्हा सारे प्रश्न, शंका कुशंका हवेतच विरून गेल्या. तिच्यापर्यंत त्या प्रश्नांची नकारात्मकता अजिबात पोहोचली नाही. कालांतराने असे खोचक प्रश्न येणे आपसूकच बंद झाले. घरातला पुरुष मुलीच्या करिअरला पाठिंबा देतोय, म्हणजे ते बरोबर असावे, त्यात काहीच वावगे नाही अशी प्रश्नकर्त्यांची भावना झाली असावी, असे मला वाटते. येथेच वडिलांची नेमकी भूमिका अधोरेखित होते.
पित्याचा विश्वास काय असतो आणि मुलीवर त्या विश्वासाचा प्रेमळ लगामही असतो, त्याचे एक उदाहरण माझ्या आयुष्यात आहे. मी कॉलेजला होते तेव्हाची गोष्ट. त्या वेळी फक्त बीएसएनएलचे दूरध्वनी होते. असेच एकदा माझ्यासाठी फोन आला. तो नेमका वडिलांनी उचलला. समोरचा म्हणाला, 'मी तुमच्या मुलीला पळवून नेणार आहे.' अर्थात ही धमकी होती. त्या धमकीला माझे वडील अजिबात बधले नाहीत. वडील त्याला करारी आवाजात म्हणाले, की किती वाजता येणार? चारचाकी घेऊन ये. माझ्या मुलीला दुचाकीची सवय नाही. तोपर्यंत आम्ही बॅगा भरून ठेवतो.' हे ऐकताच समोरच्याने फोनच ठेऊन दिला. उत्तर देताना बाबा अजिबात डगमगले नाहीत. विशेष म्हणजे, या फोननंतर त्यांनी माझ्यावर कोणते दडपण आणले नाही, की बंधने घातली नाहीत आणि आजपर्यंत त्या मुलाबाबत, फोनबाबत एकही सवाल केला नाही! किती विश्वास होता वडिलांचा माझ्यावर! हा विश्वास मी कधीच मोडला नाही; त्यामुळेच मला भरारी घेण्यासाठी, करिअर करण्यासाठी एक मोकळे आकाश मिळाले.
आणखी एक गोष्ट मला आठवते. मी चौथीत असताना म्हणजे आजपासून २७ वर्षांपूर्वी ते मला स्टॅम्प घ्यायला पाठवायचे. ते व्यवसायाने वकील; त्यामुळे ही कामे नित्याचीच होती. कित्येक हजाराची रक्कम मी चेनच्या पिशवीत घेऊन जायचे. तिथे मोजून द्यायचे आणि समोरचा मोजतानाही त्या पुन्हा मोजायचे. स्टॅम्पही बरोबर मोजून आणायचे. एक तर, वडिलांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली, मला त्यासाठी तयार केले. का तर, त्यांना 'प्रज्ञा करू शकेन,' हा आत्मविश्वास होता. मीही त्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायचे. त्यांच्या विश्वासानेच मला आणखी जबाबदार बनवले. आई भावनिक आधार देत असते; पण जबाबदाऱ्या टाकून मुलीला भक्कम बनवण्याचे काम वडील करतो, असे माझे मत आहे. मुलीच्या प्रत्येक पावलागणिक आईचा छुपा पाठिंबा असतो; पण जिथे वडिलांचा खुला पाठिंबा मिळतो, तेव्हा मुलीच्या यशात कुणीच आड येऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत मुलीने यशस्वी व्हावे म्हणून प्रसंगी कठोर निर्णय घेऊन खलनायक होणाराही पिताच असतो; पण त्या मागेही प्रेमच असते.
निवेदनासारखे क्षेत्र मी निवडले. अगदी मी लिहिलेली स्क्रिप्ट एडिट करणे असो, त्या विषयावर चर्चा करणे असो किंवा माझी रंगीत तालीम ऐकणे असो, सगळे काही माझ्या वडिलांनी केले. यावरून समजले, की मुलीसाठी तिचे वडील हे फक्त पिता नसतात, तर मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ असे सारे काही असतात. त्यांचे एक स्मित हास्य मुलीला एक उमेद, उभारी देते. कार्यक्रम आटपून घरी येताना उशीर होतो; त्या वेळी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती न करता, कार्यक्रम कसा झाला हे उत्सुकतेने ऐकण्याकडे त्यांचा कल असतो; त्यामुळेच घराकडे परतण्याची मलाही तेवढीच ओढ असते.
मला वाटते, करिअर करणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मागे, प्रत्येक यशस्वी कर्तृत्ववान मुलीमागे तिचा पिता भावनिक, वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सगळ्याच बाजूने उभा असतो; म्हणूनच या नात्याला सुरक्षिततेचे कोंदण आहे. माझ्यासारख्या करिअर करणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि स्वत:ला सिद्ध करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या निरपेक्ष पितृत्त्वाला उद्याच्या फादर्स डेनिमित्त लाख लाख सलाम.
शेवटी काय, तर...
बापू सेहत के तू तो हानिकारक (नहीं) हैं...
(लेखिका सूत्रसंचालिका आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट