पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे आमच्या लहानपणीचा काळ. त्या काळात घरातील वडीलधाऱ्यांशी बोलताना मुले थरथर कापत असत. आठ-दहा भावंडे घरांमध्ये असत. चुलत वगैरे मिळून २५ माणसांचे कुटुंब घरात असे. त्यातल्या त्यात एखाद्या सर्वात लहान भावंडांवर वडिलांशी बोलण्याची जबाबदारी टाकली जाई. काहीवेळा आईमार्फत वशिला लावला जाई. वडील यात धन्यता मानत.
आमचे घर त्याकाळातील फारच पुढारलेले. माझे वडील माझ्याशी आणि माझ्या छोट्या बहिणीशी तासन् तास गप्पा मारीत. मैत्रिणींना तर त्याचा खूपच हेवा वाटे. आमच्या गप्पा मे महिन्यात तर रात्री १२ पर्यंत रंगत. नातेवाईकांच्या मते मुलींना एवढे डोक्यावर बसवणे बरे नव्हते. वडिलांना आम्ही आप्पा म्हणत असू. त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती सांगून आम्हाला त्यांनी घडवले. त्यांनी काढलेल्या खोड्या, शाळेतील गमती-जमती सांगताना लीलया कोणत्या गोष्टी चांगल्या आणि कोणत्या गोष्टी वाईट याची उदाहरणे आम्हाला ते सांगत. त्यात खोटे बोलल्यानंतर आजोबांनी केलेली शिक्षा असे, घरात केलेला खाऊ वाटून खाणे असे, बहिणीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी मेडिकलची अॅडमिशन सोडून धरलेली नोकरी असे. अशा असंख्य गोष्टींमधून हळूहळू माझा आपोआपच डॉक्टर बनण्याचा निर्णय पक्का होत गेला. त्याचबरोबर कुटुंबावर प्रेम करणे मी शिकले. तसेच, कुटुंबासाठी त्याग करणेदेखील मी शिकले.
जवळजवळ ८०-९० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या वडिलांना माझ्या आजोबांनी एक पत्र लिहिले होते. त्यात तू कोणाशीही लग्न कर, पण त्या मुलीला जन्मभर साथ दे अशी मोकळीक होती. वडील आणि मुलामधला हा संवाद अत्यंत हृद्य होता. असा संवाद त्या काळात क्वचितच बघण्यास मिळे. माझे वडील आणि माझे आजोबा हे खरोखरीच एक आदर्श पिता होते. माझ्या मैत्रिणीकडे मात्र प्रचंड मोठा धाक आणि भीतीचे वातावरण असे. त्यांना घरामध्ये वडिलांशी बोलण्याचीसुद्धा मुभा नसे. आजोबांशी बोलणे तर दूरच. त्यानंतरचा काळ मात्र सर्वांसाठी थोडी मोकळीक निर्माण करणारा झाला. आई-वडिलांशी बोलणे मुलांना थोडेसे सोपे झाले. हट्ट फक्त आईजवळ न करता मुले वडिलांजवळसुद्धा करू लागली. पण तरीही बऱ्याच मुलांना वडिलांचा प्रचंड धाक असे. खाली गाडीचा आवाज येताच टीव्ही बंद करून पुस्तके उघडणारी आणि घाबरून पुस्तक उलटे धरून बसलेली खूप सारी मुले मी पाहिली आहेत. आता मात्र मुले आणि वडिलांचे नाते एकदमच मोकळे झाले आहे. मुले वडिलांना अरे कारेदेखील करतात. नावाने हाक मारण्याची आता पद्धत आहे. लहान मुलांनासुद्धा वडिलांच्या चुका दाखवण्याची मुभा आता असते. मी मागील पन्नास वर्षे आणि पुढील पन्नास वर्षे असा आढावा आता घेऊ शकते, कारण आयुष्याच्या मध्यावर मी उभी आहे. त्यात मला प्रकर्षाने नात्यांमधील मोकळेपणा जाणवतो. माझेही माझ्या वडिलांबरोबर अत्यंत मोकळे आणि सुसंवादाचे संबंध होते, पण त्यात एक आदर असे, मनाचा धाक असे. याचा सुवर्णमध्य आताच्या काळात नात्यात कोठेतरी हरवतो आहे, असे दिसून येते. माझ्याकडे कौन्सिलिंगला येणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या पालकांची पहिली तक्रार असते उद्धटपणा, उलट उत्तरे, न ऐकणे, अरे ला कारे करणे.
एका मुलाला त्याचे वडील त्यांच्या लहानपणी किती काटकसरीने वागत हे सांगत होते. त्या मुलाने वहीतील खूपच पाने फाडली होती. दोन पुस्तके आणि असंख्य पेन हरवले होते. दहा मिनिटांत त्यांना त्या मुलाने उत्तर दिले, 'बाबा, तुझे वडील गरीब होते. माझे वडील एका फॅक्टरीचे मालक आहेत. आधी हे रडगाणं बंद कर आणि चिक्कूपणा सोडून दे. मला सगळं लवकर आणून दे बघू!' क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टीने मात्र वडिलांचाही पारा चढला. त्यांनी फटका देण्यासाठी हात उचलताच तो पकडून 'आता नाटके पुरे झाली. तू आधी बाजारात जा', असे तो मुलगा म्हणाला. आता वडिलांनी अंतर्मुख होण्याची ही वेळ आलेली आहे. असे प्रसंग जर नको असतील तर काही नियम अगदी मुले लहान असल्यापासूनच त्यांना शिकवणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी एकमेकांशी आदराने बोलले पाहिजे. मुलांसमोर एकमेकांच्या चुका बोलू नयेत. लहानपणी बोबड्या बोलात उद्धटपणा गोड वाटतो, मजा वाटते. पण तिथेच वडिलांशी असे बोलू नये, ते मोठे आहेत, हे शिकवणे देखील गरजेचे आहे. ए म्हणू द्या, नाही तर नावाने हाक मारू द्या, पण वयाचा आणि नात्याचा मान जपण्याची सवय बालपणीच लावा. प्रश्न फक्त वडिलांच्या मानापानाचा नाही. किशोरवयामध्ये त्यांना शिस्त लागण्याचाही आहे.
ती मुले तुमचे कसे ऐकतील? त्यांना आयुष्यातील न दिसणाऱ्या धोक्यांची जाणीव फक्त तुम्हाला असून काय उपयोग? त्यांच्या त्या अर्धवट वयावर तुम्ही अंकुश कसा ठेवायचा याचे उत्तर आहे तुमच्याकडे? ते कालचक्रच देईल. पिता हा पिता असतो. त्यालाही आपल्या अपत्याच्या रूपात स्वतःचे निसटून गेलेले बालपण शोधावे असे वाटते. लहानपणी न मिळालेली मोकळीक त्या बालमित्राला द्यावीशी वाटते, यात काही गैर नाही. हे स्वाभाविकच आहे. परंतु मुलाला प्रेमाने शिस्त लावा. त्याचे रोल मॉडेल तुम्ही आहात हे विसरू नका. मग त्याने अहो बाबा म्हटलं काय नि डॅडू म्हणलं काय. याने नात्याच्या विणीत कोणताच फरक पडत नाही. जर तुम्हाला ठेच लागली तर त्याच्या डोळ्यात पाणी येईल, एवढं त्याला सहृदय बनवा म्हणजे झालं!
(लेखिका बालविकासतज्ज्ञ आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट